श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक १४ वा

नस्योतगाव इव यस्य वशे भवन्ति । ब्रह्मादयस्तनुभृतो मिथुरर्द्यमानाः ।

कालस्य ते प्रकृतिपूरुषयोः परस्य । शं नस्तनोतु चरणः पुरुषोत्तमस्य ॥१४॥

निजसुखातें विस्तारिता । तुझा चरण जी अच्युता ।

काळादिकर्माचा शास्ता । आत्मा नियंता देवाचा ॥६६॥

तूं काळाचा निजनियंता । काळासी अकाळें न करवे सत्ता ।

देवांसी अधिकारीं स्थापिता । देवनियंता तूं कृष्णा ॥६७॥

कर्मस्वामी तूं कृष्णनाथा । इंद्रियक्रिया समस्ता ।

कोणा न करवे अन्यथा । कर्मनियंता श्रीकृष्णा ॥६८॥

ब्रह्मादि शरीरधारी । तुज आधीन गा श्रीहरी ।

जैसे नाथिले बैल नांगरीं । कृषीवळू धरी स्वामित्वें ॥६९॥

तेथ जो राहे मागें पुढें । तो झोडिजे आसुडें ।

तुझे आज्ञेवरी रोकडे । वर्तती गाढे कळिकाळादिक ॥१७०॥

संसारलक्षण शेतासी । अधिकारीं जुंपोनि सर्वांसी ।

निजकर्में क्षेत्रासी । तूं वाहविसी निजाज्ञा ॥७१॥

रोंवोनि अहंकाराची मेढी । महत्तत्वांचें खळें झाडी ।

त्रिगुणदोरें बापुडीं । बांधिशी कडोविकडी जीवपशूंतें ॥७२॥

उदोअस्तांचेनि झणत्कारें । देतां निजकर्मांचे फेरे ।

जो खांदा चुकवोनि वोसरे । तोचि मारें मारिजे ॥७३॥

हा बोल जरी म्हणसी वायां । 'सृष्टिकर्त्री धरिती माया ।

मजसी संबंध नाहीं यया ' । देवराया हें न म्हणें ॥७४॥

मायेसी तूं अधिष्ठान । यालागीं तूं परम कारण ।

तुझिये मांडीवरी जाण । क्रीडास्थान प्रकृतिपुरुषां ॥७५॥

तूं मायेहूनि अपारु । प्रकृतिपुरुषांहूनि परु ।

काळाचा काळ तूं दुर्धरु । सर्वसंहारुकर्ता तूं ॥७६॥

आमुच्या निजसुखा उत्तमा । तुझा चरणविस्तार मेघश्यामा ।

हेंचि मागों पुरुषोत्तमा । कृपा आम्हांवरी कीजे ॥७७॥