श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक १७ वा

तत्तस्थूषश्च जगतश्च भवानधीशो । यन्माययोत्थगुणविक्रिययोपनीतान् ।

अर्थाञ्जुषन्नपि हृषीकपते न लिप्तो । येऽन्ये स्वतः परिहृतादपि बिभ्यति स्म ॥१७॥

चरें आणि अचरें । जंगमें आणि स्थावरें ।

या जगाचा स्वामी तूं निर्धारें । केलें खरें गतश्लोकीं ॥९८॥

तेंचि स्वामित्व कैसें घडे । हें जरी पुससी धडफुडें ।

तरी तेहीविखीं रोकडें । वचन गाढें अवधारीं ॥९९॥

निजमायेचेनि योगें । नाना विषय भोगिसी अंगें ।

तें भोगिलेपण अंगीं न लगे । अकर्तात्मसंगें अलिप्त ॥२००॥

तोचि अकर्तात्मबोधु कैसा । जरी म्हणशी हृषीकेशा ।

ते आगमनिगमां अतर्क्य दशा । परम पुरुषा परियेसीं ॥१॥

भोग्य-भोग-भोक्ता । या तिहींतें तूं प्रकाशिता ।

जेवीं घटीं बिंबोनि सविता । अलिप्तता स्वभावें ॥२॥

घट-जळ-प्रति-बिंबासी । स्वयें सविता प्रकाशी ।

प्रकाशूनि अलिप्त त्यांसी । तेवीं तूं भोगासी श्रीकृष्णा ॥३॥

अथवा कर्म-कार्य-कर्ता । या तिहींमाजीं निजात्मता ।

देखे तो अभोक्ता । भोगोनि तत्वतां निजभोग ॥४॥

दर्पणींच्या प्रतिबिंबासीं । जो प्रवर्तला भोगासी ।

व्यभिचाराचा आळ त्यासी । केवीं अंगासी लागेल ॥५॥

जगचि हें अवघें । जो होऊनि ठाके अंगें ।

त्यासी बाधावें कोणें भोगें । निजात्मयोगें योगिया ॥६॥

ऐशिया बोधाचेनि बळें । तो विषयावरी जरी लोळे ।

तरी विषयाचेनि विटाळें । बोधु न मैळे तयांचा ॥७॥

तो घेणें देणें करी । पाहतां दिसे व्यवहारी ।

नांदतांही घरदारीं । त्यामाझारीं तो नाहीं ॥८॥

नेणोनि बोधाची मागी । भोगत्याग केला योगीं ।

तरी कांपताति सर्वांगीं । वासना अंगीं उरलीसे ॥९॥

स्वप्नीं विषय देखती । जागे जाहल्या प्रायश्चित घेती ।

नाहीं मावळली अहंकृती । यालागीं भीती सर्वदा ॥२१०॥

ऐशिया जी विषयभेडा । नाहीं निजबोधु धडफुडा ।

तैसा नव्हेसी तूं निधडा । दिसे रोकडा निजबोधु ॥११॥