श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


अध्याय सातवा - आरंभ

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥

ॐ नमो सद्‍गुरु चतूरक्षरा । चतूरचित्तप्रबोधचंद्रा ।

जनार्दना सुरेंद्र‍इंद्रा । ज्ञाननरेंद्रा निजबोधा ॥१॥

तूझी करितांचि गोठी । प्रगटसी पाटीपोटीं ।

सन्मुख ठसावसी दृष्टी । हृदयगांठी छेदूनी ॥२॥

छेदूनि विषयवासना । स्वयें प्रगटसी जनार्दना ।

भव‍अभवभावना । नेदिसी मना आतळों ॥३॥

आतळतां तूझे चरण । आकळलें राहे मन ।

सहज देसी समाधान । आनंदघन अच्युता ॥४॥

ऐशिया जी गुरुनाथा । समसाम्यें चरणीं माथा ।

पुढील परिसावी जी कथा । जेथ वक्ता श्रीकृष्णु ॥५॥

उद्धवें विनविलियावरी । कृपा कळवळला श्रीहरी ।

निजघान अतिविस्तारीं । बोध कुसरीं सांगतू ॥६॥

होतें कृष्णाचे मानसी । मज गेलिया निजधामासी ।

माझें निजज्ञान कोणापासीं । अतियत्नेंसीं ठेवावें॥७॥

तंव देखिली उद्धवाची अवस्था । सुख जाहलें श्रीकृष्णनाथा ।

वैराग्ययुक्त उपदेशिता । होय सर्वथा निजज्ञान ॥८॥

एवं वांचवावया उद्धवासी । कृष्ण ब्रह्मज्ञान उपदेशी ।

शाप न बाधी ब्रह्मवेत्यांसी । हें हृषीकेशी जाणतू ॥९॥

ब्रह्म‍उपदेशाची हातवटी । उपदेशूं जाणे जगजेठी ।

वैराग्य उपजवी उठाउठीं । जेणें पडे मिठी निजतत्वीं ॥१०॥

नव्हतां वैराग्य दारुण । उपदेशु केला तो वृथा जाण ।

हे श्रीकृष्णचि जाणे खूण । वैराग्यविंदान बोलतू ॥११॥

पहिलें उद्धवाच्या बोलासी । अनुमोदन दे हृषीकेशी ।

तेणें अन्वयें सावकशीं । ज्ञानवैराग्य त्यासी बोलतू ॥१२॥