श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक १ ला

श्रीभगवानुवाच ।

यदात्थ मां महाभाग तच्चिकीर्षितमेव मे ।

ब्रह्मा भवो लोकपालाः स्वर्वासं मेऽभिकाङ्‌क्षिणः ॥१॥

जो वेदांचा वेदवक्ता । जो ज्ञानियांचा ज्ञानदाता ।

तो श्रीकृष्णु म्हणे भाग्यवंता । ऐकें निजभक्ता उद्धवा ॥१३॥

जें तूं बोलिलासी भावयुक्त । तें वचन तूझें सत्य सत्य ।

तेचिं माझें मनोगत । जाण निश्चित निर्घारें ॥१४॥

माझी अवस्था जाश्वनीळा । ब्रह्मादिदेवां सकळां ।

येथ आले होते मिळोनि मेळा । लोकपाळांसमवेत ॥१५॥

येऊनि माझी घेतली भेटी । अपेक्षा जे होती पोटी ।

पुशिली माझ्या प्रयाणाची गोठी । जेणें तूज मोठी अवस्था ॥१६॥

म्यां वेगीं यावें वैकुंठा । हे समस्तांसी उत्कंठा ।

आदिकरून नीळकंठा । सुरवरिष्ठां जालीसे ॥१७॥