श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक १० वा

ज्ञानविज्ञानसंयुक्त आत्मभूतः शरीरिणाम् ।

अत्मानुभवतूष्टात्मा नान्तरायैर्विहन्यसे ॥१०॥

शास्त्रश्रवणें दृढ ज्ञान । मननाभ्यासें होय विज्ञान ।

या दोंहींची जाणोनि खूण । ब्रह्मसंपन्न तूं होईं ॥२॥

ऐसिया स्वार्थाचेनि लवलाहें । अविश्रम भजावे तूझे पाये ।

म्हणसी वोढवतील अंतराये । त्यासी काये करावें ॥३॥

सांडोनि दांभिक लौकिक । त्यजोनियां फळाभिलाख ।

जो मज भजे भाविक । विघ्न देख त्या कैंचें ॥४॥

त्याच्या विघ्ननाशासी देख । करीं चक्राची लखलख ।

घेऊनि पाठिसी अचुक । उभा सन्मुख मी असें ॥५॥

यापरी गा उद्धवा । जो मज भजे निजभावा ।

त्यासी विघ्न करावया देवां । नव्हे उठावा मज असतां ॥६॥

एवं ब्रह्मसंपन्न जाहलियावरी । आत्मा तूंचि चराचरीं ।

जंगमीं आणि स्थावरीं । सुरासुरीं तूंचि तूं ॥७॥

तूजहूनि कांहीं । अणुभरी वेगळें नाहीं ।

तेथ विघ्न कैंचें कायी । तूझ्या ठायीं बाधील ॥८॥

ब्रह्मादिकांसी जो ग्रासी । त्या काळाचा तूं आत्मा होसी ।

पाठी थापटून हृषीकेशी । उद्धवासी सांगतू ॥९॥

ऐशी बाध्यबाधकता फिटली । संकल्पकल्पना तूटली ।

ब्रह्मानंदें पाहांट फुटली । वाट मोडली कर्माची ॥११०॥

ऐसा ब्रह्मानुभवी जो देख । कर्म तेथ होय रंक ।

वेद तयाचे सेवक । विधिविवेक कामारे ॥११॥

हेंचि किती सांगो कायी । मी त्याचा आज्ञाधारक पाहीं ।

प्रतिष्ठिती जे जे ठायीं । तेथ पाहीं प्रगटतू ॥१२॥

वचनमात्रासाठीं । प्रगटलों कोरडे काष्ठीं ।

दूर्वासा वाइला पाठीं । त्वांही दिठीं देखिलें ॥१३॥

म्हणसी देव ज्याचा आज्ञाधारु । कर्म त्याचें होय किंकरु ।

तरी ज्ञाते यथेष्टाचारु । विषयीं साचारु विचरती ॥१४॥

ज्ञात्यासी स्वेच्छा विषयाचरण । सर्वथा न घडे गा जाण ।

तेही विषयींचें लक्षण । सावधान परियेसीं ॥१५॥

ज्यासी दग्धपट‍अभिमान । मिथ्या प्रपंचाचें भान ।

मृषा विषयांचें दर्शन । विषयाचरण त्या नाहीं ॥१६॥

जयासी प्रपंचाची आवडी । विषयाची अतिगोडी ।

यथेष्टाचरणाची वोढी । पडे संसारसांकडी तयासी पैं ॥१७॥

ज्ञातयाच्या ठायीं । सत्यत्वें विषयो नाहीं ।

मा भोगावया कायी । अभिलाषी पाहीं तो होईल ॥१८॥

आतां ज्ञातयाचें कर्म । ऐक सांगों त्याचें वर्म ।

नाशतां मनोधर्म । क्रियाकर्म आचरती ॥१९॥