श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक १२ वा

सर्वभूतसुहृच्छान्तो ज्ञानविज्ञाननिश्चयः ।

पश्यन्मदात्मकं विश्वं न विपद्येत वै पुनः ॥१२॥

पहिलें शास्त्रश्रवणें ज्ञान । तदनुभवें होय विज्ञान ।

ऐसा ज्ञानविज्ञानसंपन्न । निरभिमान तो होय ॥३३॥

साचचि निरभिमानता । जरी आली होय हाता ।

तरी शांति तेथ सर्वथा । उल्हासता पैं पावे ॥३४॥

दाटूनि निश्चळ होणें । कां दांत चावूनि साहणें ।

ते शांति ऐसें कोण म्हणे । आक्रोशपणें साहतू ॥३५॥

शांति म्हणिजे ते ऐशी । सागरीं अक्षोभ्यता जैसी ।

चढ वोहट नाहीं तिसी । सर्वदेशी सर्वदा ॥३६॥

नाना सरितांचे खळाळ । आणूनि घालिती समळ जळ ।

तो तिळभरी नव्हे डहुळ । अतिनिर्मळ निजांगें ॥३७॥

तैशी नानाभूतविषमता । स्वार्थविरोधें अंगीं आदळतां ।

पालटू नव्हे ज्याच्या चित्ता । ते जाण सर्वथा निजशांति ॥३८॥

ऐसी शांति ज्यासी देखा । तोचि सर्वभूतांचा सखा ।

आवडता सर्व लोकां । सुहृद तो कां सर्वांचा ॥३९॥

नवल सख्यत्वाची परी । सर्वस्व दे निजमैत्रीं ।

स्वार्थीं वंचनार्थ न करी । कृपापात्रीं उपदेशु ॥१४०॥

अतर्क्य त्याची पाहती दिठी । मद्रूपें देखे सकळ सृष्टी ।

जगासी मज अभिन्न गांठी । निजदृष्टीं बांधली ॥४१॥

मग तो जेउतें पाहे । तेउता मीचि तया आहें ।

तो जरी मातें न पाहे । तें न पाहणेंही होये मीचि त्याचें ॥४२॥

त्याची पाहती जे दिठी । ते मीचि होये जगजेठी ।

ऐशी तया मज एक गांठी । सकळ सृष्टीसमवेत ॥४३॥

अवघें जगचि मी होये । तेव्हां तो मी हे भाष जाये ।

ऐसा तो मजमाजीं समाये । समसाम्यसमत्वें ॥४४॥

सांडोनियां मनोधर्म । ऐसा ज्यासी मी झालों सुगम ।

त्यासी पुढती कैंचें जन्म । दूःख दूर्गम ज्याचेनीं ॥४५॥

मातेच्या उदरकुहरीं । रजस्वलेच्या रुधिरामाझारीं ।

पित्याचेनि रेतद्वारीं । गर्भसंचारी संसरण ॥४६॥

जे मातेच्या उदरीं । जंतू नाकीं तोंडीं उरीं शिरीं ।

विष्ठामूत्राचे दाथरीं । नव मासवरी उकडिजे ॥४७॥

जठराग्नीच्या तोंडीं । घालूनि गर्भाची उंडी ।

उकड‍उकडूनि पिंडीं । गर्भकांडीं घडिजेति ॥४८॥

ते गर्भींचे वेदना । नानापरींची यातना ।

नको नको रघुनंदना । चिळसी मना येतसे ॥४९॥

अवघ्यांच्या शेवटीं । प्रसूतिवातू जो आटी ।

सर्वांगीं वेदना उठी । योनिसंकटीं देहजन्म ॥५०॥

ऐसें अपवित्र जें जन्म । तें न पावतीच ते नरोत्तम ।

जींहीं ठाकिलें निजधाम । ते पुरुषोत्तम समसाम्यें ॥५१॥

मी असतां पाठीपोटीं । त्यांसी काइशा जन्मगोठी ।

कळिकाळातें नाणिती दिठी । आले उठाउठी मद्रूपा ॥५२॥

जेथ जन्म नाहीं जाहलें । तेथ मरण न लगतांचि गेलें ।

ऐसे भजोनि मातें पावले । भजनबळें मद्‍भक्त ॥५३॥

कृष्ण उद्धवातें थापटी । म्हणे वेगें उठीं उठीं ।

हेचि हातवशी हातवटी । जन्मतूटी तेणें होय ॥५४॥

जैसें मेघमुखींचें उदक । वरिच्यावरी झेलिती चातक ।

तैसें कृष्णवचनांसी देख । उद्धवें मुख पसरिलें ॥५५॥

कां चंद्राकिरणीं चकोर । जेवीं अत्यंत सादर ।

तेवीं उद्धवाचा आदर । दिसे थोर हरिवचनीं ॥५६॥

हो कां पक्षिणी देखोनि पिलें । जाणोनि चारयाचे वेळे ।

सांडोनियां आविसाळें । मुख कोंवळें जेवीं पसरी ॥५७॥

तेवीं देखोनि कृष्णमुख । उद्धवासी अत्यंत हरिख ।

श्रवणाचे मुखें देख । कृष्णपीयूष सेवित ॥५८॥