श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक १७ वा

सत्यस्य ते स्वदृश आत्मन आत्मनोऽन्यं वक्तारमीश विबुधेष्वपि नानुचक्षे ।

सर्वे विमोहितधियस्तव माययेमे ब्रह्मादयस्तनुभृतो बहिरर्थभावाः ॥१७॥

पुसों जावें ब्रह्मयासी । तो गुंतला सृष्टिकर्मासी ।

प्रजाउत्पत्ति मानसी । अहर्निशीं चिंतितू ॥७६॥

जो आपुल्या निजस्वभावीं । सदा संसारु वाढवी ।

तो केवीं संसारु तोडवी । केलें न बुडवी सर्वथा ॥७७॥

वाढों नेदी संसारासी । कोपु आला प्रजापतीसी ।

शापु दिधला नारदासी । ब्रह्म उपदेशी म्हणौनी ॥७८॥

ऐसे संसारी आसक्त । नित्य संसारयुक्त ।

त्यांसी पुसों न मनी चित्त । जाण निश्चित श्रीकृष्णा ॥७९॥

पुसों जावें ऋषींप्रती । तंव ते सदा आपमती ।

आपुलें मत प्रतिष्ठिती । अन्यथा देती शापातें ॥१८०॥

जीवीं धरोनि अर्थासक्ती । शिष्यांतें उपदेशिती ।

विषयो धरोनियां चित्तीं । जीविकावृतीं उपदेशु ॥८१॥

गुरूसीच विषयासक्ती । तेथ शिष्यासी कैंची विरक्ती ।

ऐशियासी जे पुसती । ते भ्रंशती स्वार्थातें ॥८२॥

सत्यस्वरूप स्वप्रकाश । आत्मा तूं अविनाश ।

युक्तिप्रयुक्तीं उपदेश । विकल्पनिरास जाणसी ॥८३॥

ब्रह्मज्ञानाचा वक्ता । तूजवेगळा श्रीकृष्णनाथा ।

न दिसे गा सर्वथा । मज पाहतां त्रिलोकीं ॥८४॥

एवं आत्मा तूं तत्वतां । तूंचि आत्मज्ञानदाता ।

आत्मबोधीं संस्थापिता । कृष्णनाथा तूं एकु ॥८५॥