श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक १९ वा

श्रीभगवानुवाच ।

प्रायेण मनुजा लोके लोकतत्त्वविचक्षणाः ।

समुद्धरन्ति ह्यात्मानमात्मनैवाशुभाशयात् ॥१९॥

भूत संचरलियापाठीं । सुटती जल्पवादगोठी ।

त्यातें गुणिया पाहोनि दिठीं । अक्षता त्राहाटी मंत्रोनी ॥६॥

पाहतां पांचभौतिक संसारु । सहजें झाला असे थोरु ।

माजीं झोंबलासे कृष्णवियोगखेचरु । उद्धव लेंकरूं झडपिलें ॥७॥

मिसें उद्धवाची झडपणी । अहंम्हैसासुर लागला झणीं ।

त्यासी करावया झाडणी । कृष्ण गुणी चालिला ॥८॥

तेथ झाडणीलागीं आतां । यदूअवधूतसंवादकथा ।

त्याचि मंत्रूनि मंत्राक्षता । होय झाडिता श्रीकृष्णु ॥९॥

श्रीकृष्ण म्हणे उद्धवासी । सावध होईं निजमानसीं ।

येऊनियां मनुष्यलोकासी । आप‍आपणांसी उद्धरिती ॥२१०॥

पाहतां यया परमार्था । साह्य नव्हे माता पिता ।

पुत्र भ्राता दूहिता कांता । साह्य सर्वथा हे नव्हती ॥११॥

साह्य परमार्था नव्हे व्याही । शेखीं साह्य नव्हे जांवयी ।

आपणिया आपण साह्य पाहीं । जो निजदेहीं विवेकी ॥१२॥

मुमुक्षुमार्गींचे सज्ञान । लोकतत्वविचक्षण ।

विचारूनि कार्यकारण । स्वबुद्धीं जाण उद्धरले ॥१३॥

नित्यानित्यविवेकें । अनित्य सांडिती त्यागमुखें ।

नित्य तें यथासुखें । हित संतोखें अंगीकारिती ॥१४॥

नित्यत्वें जें उरलें जाण । तें स्वरूप माझें चिद्धन ।

तेंचि साधकांचे साधन जाण । अनन्यपणें चिंतिती ॥१५॥

भावितां माझी दृढ भावना । मीचि ते होती जाणा ।

कीटकीभृंगीचिया खुणा । आप आपणियां उद्धरिती ॥१६॥