श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ३७ वा

भूतैराक्रम्यमाणोऽपि धीरो दैववशानुगैः ।

तद्विद्वान्न चलेन्मार्गादन्वशिक्षं क्षितेर्व्रतम् ॥३७॥

परमार्थी मुख्य शांती । साधकांसी पाहिजे निश्चितीं ।

यालागीं प्रथम गुरु क्षिती । निजशांतीलागूनी ॥३६०॥

पृथ्वी गुरु त्रिविध पाहीं । पर्वत वृक्ष आणि मही ।

यांचीं लक्षणें धरितां देहीं । गुरुत्व पाहीं पृथ्वीसी ॥६१॥

अंतरनिग्रहो ते शांती । बाह्येंद्रियनिग्रहो ते दांती ।

उभयसहिष्णुता ते क्षांती । क्षांतीसी क्षिति गुरु केली ॥६२॥

पृथ्वीते नानाभूतीं । माझी माझी म्हणौनि झोंबती ।

नाना भेदीं भिन्न करिती । निजवृत्तिव्यवहारें ॥६३॥

त्या भूतांचे भिन्न वर्तन । पृथ्वी संपादी आपण ।

मोडों नेदी अभिन्नपण । अखंड जाण सर्वदा ॥६४॥

तैसें योगियांचे लक्षण । करितां कर्म भिन्नभिन्न ।

वृत्ति अखंडदंडायमान । सर्वदा जाण असावी ॥६५॥

देहासी अदृष्टयोगें गती । भूतें अदृष्टयोगें आक्रमिती ।

भूतीं निजात्मता भाविती । द्वंद्वें न बाधिती साधकां ॥६६॥

येथ भूतीं पृथ्वी पूजिली । नातरी विष्ठामूत्रीं गांजिली ।

हर्षविषादा नाहीं आली । निश्चळ ठेली निजक्षांती ॥६७॥

भूतें पार्थिवेंचि तंव झालीं । तिंहीं पृथ्वी पूजिली ना गांजिली ।

ऐक्यें द्वंद्वभावा मुकलीं । निश्चळ झाली निजरूपें ॥६८॥

तैसाचि योगियाही जाणा । भूतवैषम्यें डंडळेना ।

सर्वभूती निजात्मभावना । विषमीं समाना भावितां ॥६९॥

आतां पृथ्वीची अभिनव शांति । ते सांगेन राया तूजप्रती ।

जे शांति धरोनि संती । भगवद्‍भक्ती पावले ॥३७०॥

पृथ्वी दाहेंकरूनि जाळिली । नांगर घालूनि फाळिली ।

लातवरीं तूडविली । तोडिली झाडिली पैं भूतीं ॥७१॥

तो अपराधू न मनूनि क्षिती । सवेंचि भूतांतें प्रसन्न होती ।

तेथेंचि पिकवूनि नाना संपत्ती । तृप्ति देती भूतांतें ॥७२॥

ऐस‍ऐशिया निजशांती । लागीं गुरु म्यां केली क्षिती ।

ऐक सभाग्या भूपती । शांतीची स्थिति अभिनव ॥७३॥

एकें अपराधु केला । दूजेनि उगाचि साहिला ।

इतूकेनि शांतु केवीं झाला । उपेक्षिला अपराधी ॥७४॥

ऊंसु मोडी त्या गोड भारी । छेदितें शस्त्र गोड करी ।

पिळिलियाआळिलियावरी । स्वादाचिया थोरी अपकार्‍यां देतू ॥७५॥

अपराध साहोनि अंगी । त्याच्या प्रवर्ते हितालागीं ।

तेचि शांति पैं जगीं । होय दाटुगी निर्द्वंद्व ॥७६॥

अपराध साहोनि अंगावरी । अपराध्या होईजे उपकारी ।

हें शिकलों पृथ्वियेवरी । परोपकारीं पर्वत ॥७७॥