श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ४३ वा

तेजोऽबन्नमयैर्भावैर्मेघाद्यैर्वायुनेरितैः ।

न स्पृश्यते नभस्तद्वत्कालसृष्टैर्गुणैः पुमान् ॥४३॥

नभ पृथ्वीरजें न गदळे । उदकेंकरीं न पघळे ।

अग्नीचेनि ज्वाळें न जळे । वायुबळें उडेना ॥४८॥

कडकडीत आभाळें । येऊनि आकाश झांकोळे ।

त्या समस्तां नभ नातळे । अलिप्त बळें संस्थित ॥४९॥

तैसेंचि योगियासी । असतां निजात्मसमरसीं ।

काळें सृजिलिया गुणांसी । वश्य त्यांसी तो नव्हे ॥४५०॥

काळाचें थोर सामर्थ्य जाण । देहासी आणी जरामरण ।

योगी देहातीत आपण । जन्ममरण न देखे ॥५१॥

स्वप्नीं चिंतामणी जोडला । सवेंचि अंधकूपीं पडला ।

जागा जाहल्या न म्हणे नाडला । तैसा घडला देहसंगु ॥५२॥

जो ब्रह्मादि देहांसी खाये । तो काळू वंदी योगियाचे पाये ।

जो काळाचाही आत्मा होये । निधडा पाहें महाकाळू ॥५३॥

विजू कडकडूनि आकाशीं । तेजें प्रकाशी गगनासी ।

गगन नातळे ते विजूसी । असोनि तिशीं सबाह्य ॥५४॥

तैसा सत्त्वगुण प्रकाशी ज्ञान । त्यासी योगिया नातळे जाण ।

ज्ञानस्वरूप निखळ आपण । वृत्तिज्ञान मग नेघे ॥५५॥

जालिया सूर्यउदयासी । दीपप्रभा नये उपेगासी ।

तेवीं सहज आलिया हातासी । वृत्तिज्ञानासी कोण पुसे ॥५६॥

सत्त्वें प्रकाशिलें ज्ञान । तें आवडोनि नेघे जाण ।

अथवा खवळल्या रजोगुण । कर्मठपण त्या न ये ॥५७॥

हो कां तमोगुणाचेनि मेळें । क्रोधमोहांसी नातळे ।

गुणातीत जाला बळें । बोधकल्लोळें स्वानंदें ॥५८॥

उदकासी गुरुपण । आलें तें ऐक लक्षण ।

अवधूत म्हणे सावधान । नृपंनदना यदुवीरा ॥५९॥