श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ४४ वा

स्वच्छः प्रकृतितः स्निग्धो माधूर्यस्तीर्थभूर्नृणाम् ।

मुनिः पुनात्यपां मित्रमीक्षोपस्पर्शकीर्तनैः ॥४४॥

लक्षणें पाहतां जळ । स्वभावें अतिनिर्मळ ।

प्रकृतीस्तव कोमळ । मधूर केवळ सर्वांसी ॥४६०॥

पवित्र व्हावया प्राणियांसी । तीर्थीं तीर्थत्व उदकासी ।

इतुकीं लक्षणें योगीयासी । अहर्निशीं असावीं ॥६१॥

उदकीं रिघाले जे समैळ । ते स्वभावें करी निर्मळ ।

परी न धरी अहंबळ । जे म्यां हे मळ क्षाळिले ॥६२॥

तैसें योगियासी भजनशीळ । भावें भाविक जे केवळ ।

त्यांचे निरसूनि कळिमळ । न धरी बळ गुरुत्वें ॥६३॥

प्राणु गेला तरी प्राणियांसी । कठिणत्व उपजेना मानसीं ।

जें जें भेटे तयासी । मृदुता कैसी वर्तत ॥६४॥

जेवीं चंद्रकिरण चकोरांसी । पांखोवा जेवीं पिलियांसी ।

जीवन जैसें कां जीवांसी । तेवीं सर्वांसी मृदुत्व ॥६५॥

जळ वरिवरी क्षाळी मळ । योगिया सबाह्य करी निर्मळ ।

उदक सुखी करी एक वेळ । योगी सर्वकाळ सुखदाता ॥६६॥

उदकाचें सुख तें किती । सवेंचि क्षणें तृषितें होती ।

योगिया दे स्वानंदतृप्ती । सुखासी विकृती पैं नाहीं ॥६७॥

उदकाची जे मधुरता । ते रसनेसीचि तत्त्वतां ।

योगियांचें गोडपण पाहतां । होय निवविता सर्वेंद्रियां ॥६८॥

लागल्या योगियांची गोडी । अमृताची चवी थोडी ।

ब्रह्मेंद्रादि पदें बापुडीं । अर्धघडीमाजीं करीत ॥६९॥

तापले आले उदकापासी । अंगस्पर्शे निववी त्यांसी ।

तैसीचि दशा योगियासी । स्पर्शें तापासी निवारी ॥४७०॥

उदकें निवविलें ज्यासी । परतोनि ताप होय त्यासी ।

योगी कृपेनें स्पर्शें ज्यासी । त्रिविध तापांसीं निर्मुक्त ॥७१॥

योगी ज्यासी निववी जीवेंभावें । त्यासी जीवु गेलियाही तापू नव्हे ।

निवालेपणें तो वोल्हावे । स्वानुभवें डुल्लत ॥७२॥

मेघमुखें अधःपतन । उदकाचें देखोनि जाण ।

अधःपाते निवती जन । अन्नदान सकळांसी ॥७३॥

तैसें योगियासी खालतें येणें । जे इहलोकीं जन्म पावणें ।

जन निववी श्रवणकीर्तनें । निजज्ञानें उद्धरी ॥७४॥

पर्जन्योदक देखतां जाण । जेवीं निवती सकळही जन ।

कां गंगादिकांचें दर्शन । करी मोचन पापाचें ॥७५॥

तैसें योगियाचें दर्शन । भाग्येंवीण नव्हे जाण ।

ज्याने देखिले त्याचे चरण । करी मोचन भवरोगा ॥७६॥

न घडे दर्शन स्पर्शन । तरी करावें त्याचें नामस्मरण ।

इतूकेनि भवमूळ जाण । करी छेदन तें नाम ॥७७॥

सांडूनि भगवंताचें कीर्तन । केल्या भक्ताचें नामस्मरण ।

केवीं तूटेल भवबंधन । ऐसें न म्हणा सर्वथा ॥७८॥

देवासी पूर्वी नामचि नाहीं । त्यासी भक्तीं प्रतिष्ठूनि पाहीं ।

नामरूपादि सर्वही । नानाविलास अर्पिले ॥७९॥

ऐसा भक्तीं देव थोर केला । आणूनि वैकंठीं बैसविला ।

भक्त‍उपकारें दाटला । मग त्याच्या बोलामाजीं वर्ते ॥४८०॥

देवो भक्तवचनेंकरी । झाला नर ना केसरी ।

प्रगटला खांबामाझारीं । शब्द करी भक्ताचा ॥८१॥

आतांही प्रत्यक्ष प्रमाण । दासांचेनि वचनें जाण ।

पाषाणप्रतिमे देवो आपण । आनंदघन प्रगटे पैं ॥८२॥

भक्तभावें आभारला । देवो उपकारें दाटला ।

यालागीं नुलंघवे बोला । पांगें पांगला भक्तांच्या ॥८३॥

एवं जेथ भक्तांचें नाम घेणें । तेथ अवश्य देवें धांवणें ।

भक्त‍उपकारा उत्तीर्ण होणें । वेगें पावणें यालागीं ॥८४॥

यालागीं भक्ताचें नाम घेतां । तूटती भवबंधनव्यथा ।

ऐसें सांगतां अवधूता । प्रेम सर्वथा न संडे ॥८५॥

आतां अग्नि गुरु जो करणें । त्याचीं सांगेन लक्षणें ।

काना मना एक करणें । सावधपणें परियेसीं ॥८६॥