श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ४५ वा

तेजस्वी तपसा दीप्तो दूर्धर्षोदरभाजनः ।

सर्वभक्षोऽपि युक्तात्मा नादत्ते मलमग्निवत् ॥४५॥

अग्नि निजतेजें देदीप्यमान । साक्षात हातीं न धरवे जाण ।

उदरमात्रीं सांठवण । सर्व भक्षण निजतेजें ॥८७॥

तैसाचि योगियाही जाण । भगवद्‍भावें देदीप्यमान ।

त्यासी धरावया आंगवण । नव्हे जाण सुरनरां ॥८८॥

हातीं न धरवे खदिरांगारू । तैसा योगिया अतिदूर्धरू ।

तयासी न शके आवरूं । मायाव्यवहारु गुणेंसीं ॥८९॥

अग्नीसी जेवीं मुखचि पात्र । तैसें योगियासी उदर मात्र ।

ठेवा ठेवणें विचित्र । नाहीं पात्र गांठीसी ॥४९०॥

अग्नीनें जें जें सेवणें । तें जाळूनि आपुल्या ऐसें करणें ।

यापरी सर्वभक्षणें । नाहीं स्पर्शणें मळासी ॥९१॥

चंदन सुवासे दूर्गंधधुरे । निंब कडू ऊंस गोडिरे ।

तें जाळूनि आकारविकारें । कीजे वैश्वानरें आपणाऐसीं ॥९२॥

तैसा योगी जें अंगीकारी । तें आत्मदृष्टीं निर्धारी ।

दोष दवडूनियां दूरी । मग स्वीकारी निजबोधें ॥९३॥

भाग्य जें भोगूं जाये । तेथ आत्मप्रतीति पाहे ।

भोक्ता तद्रूपचि होये । हा भोगु पाहे योगिया ॥९४॥

अग्नींत पडिलें जें समळ । तें अग्निमुखें होय निर्मळ ।

योगिया जें सेवी अळूमाळ । परम मंगळ तें होय ॥९५॥

अग्निमुखीं यागू घडे । तेणें अदृष्टें स्वर्गभोगु जोडे ।

योगियाचे मुखीं जें पडे । तेणें जोडे निजपद ॥९६॥

आणिक अग्नीचें चिन्ह । ऐक राया सावधान ।

तेंचि साधकासी साधन । सिद्ध लक्षण सिद्धाचें ॥९७॥