श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ४६ वा

क्वचिच्छन्नः क्वचित्स्पष्ट उपास्यः श्रेय इच्छताम् ।

भुङ्क्ते सर्वत्र दातृणां दहन्‌ प्रागुत्तराशुभम् ॥४६॥

भीतरीं तेजस्वी वरी झांकिला । होमकुंडीं अग्नि पुरिला ।

कां यज्ञशाळे प्रज्वळला । याज्ञिकीं केला महायागू ॥९८॥

जो जो उपासका भावो जीवीं । त्या त्या श्रेयातें उपजवीं ।

पूर्वोत्तर अशुचित्वें आघवीं । जाळूनि हवी सेवितु ॥९९॥

तैशीचि योगियाची लीळा । भाविकां प्रकट दिसे डोळां ।

एकां गुप्तचि होऊनि ठेला । न दिसे पाहिला सर्वथा ॥५००॥

ऐसियाच्याही ठायीं । भावबळे भाविक पाहीं ।

अर्चिती जें जें कांहीं । तेणें मोक्ष पाहीं मुमुक्षां ॥१॥

तें पडतांचि योगियांच्या मुखीं । संचित क्रियमाणें असकीं ।

क्षाळोनियां एकाएकीं । करी सुखी निजपदीं ॥२॥

आणीकही अग्नीचें लक्षण । राया तूज मी सांगेन जाण ।

जेणें सगुण आणि निर्गुण । दिसे समान समसाम्यें ॥३॥