श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ६० वा

तासां पतत्रैः सुस्पर्शैः कूजितैर्मुग्धचेष्टितैः ।

प्रत्युद्‍गमैरदीनानां पितरौ मुदमापतूः ॥६०॥

त्यांचेनि आलिंगनचुंबनें । मृदू मंजुळ कलभाषणें ।

दों पक्षांचेनि स्पर्शनें । दोघे जणें निवताति ॥५८०॥

माता पिता दोघें बैसती । सन्मुख अपत्यें धांवती ।

लोल वक्र वोवंगती । वेगें दाविती येरयेरां ॥८१॥

मग देवोनियां खेवे । दूरी जाती मुग्धभावें ।

तेथूनि घेऊनियां धांवे । वेगें यावें तयांपासीं ॥८२॥

मायबापांच्या पाखोव्यापासीं । हीनदीनता नाहीं बाळांसी ।

जे जन्मोनि त्यांचे कुशीं । त्या दोघांसी सभाग्यता ॥८३॥

लाडिकीं लडिवाळ बाळें । लाडेंकोडें पुरविती लळे ।

देखोनि निवती दिठी डोळे । स्नेह आगळें येरयेरां ॥८४॥

ऐसी खेळतां देखोनि बाळें । दोघें धांवती एक वेळे ।

उचलूनियां स्नेहबळें । मुख कोवळें चुंबिती ॥८५॥