श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ७० वा

सोऽहं शून्ये गृहे दीनो मृतदारो मृतप्रजः ।

जिजीविषे किमर्थं वा विधूरो दूःखजीवितः ॥७०॥

नासिली स्त्री नासिल्या प्रजा । येथ म्यां रहावें कवण्या काजा ।

दुःखें प्राण जाईल माझा । लोकलाजा निंदित ॥२१॥

एवढें अंगीं वाजलें दुःख । काय लौकिकीं दाखवूं मुख ।

भंगलें संसाराचें सुख । जितां मूर्ख म्हणतील ॥२२॥

जळो विधूराचें जिणें । सदा निंद्य लाजिरवाणें ।

न ये श्राद्धींचें अवतणें । सदा बसणें एकाएकी ॥२३॥

ऐसेनीं वसतां ये लोकीं । शून्य गृहीं एकाकी ।

धडगोड न मिळे मुखीं । परम दुःखी मी होईन ॥२४॥