श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ७४ वा

यः प्राप्य मानुषं लोकं मुक्तिद्वारमपावृतम् ।

गृहेषु खगवत्सक्तस्तमारूढच्युतं विदूः ॥ ७४ ॥

इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां एकादशस्कन्धे सप्तमोऽध्यायः ॥७॥

येवोनियां कर्मभूमीसी । जो पावला उत्तम देहासी ।

त्याहीमाजीं उत्तमता कैशी । अग्रवर्णासी पैं जन्म ॥३५॥

आलिया मनुष्यदेहासी । मुक्तीचा दारवंटा मुक्त त्यासी ।

लव निमिष सर्व दिशीं । यावज्जन्मेंसीं मोकळा ॥३६॥

इतरां वर्णांची हे गती । मा ब्राह्मण तरी पुण्यमूर्ती ।

ते सदा मुक्तचि असती । वृथा आसक्तीं गुंतले ॥३७॥

विद्वांस आणि वैराग्य । तें ब्रह्मादिकां न लभे भाग्य ।

वृथा आसक्तीं केले अभाग्य । शिश्नोदरा सांग वेंचले ॥३८॥

मनुष्यदेहीं गृहासक्तू । तो बोलिजे आरूढच्युतु ।

कपोत्याचे परी दुःखितु । सिद्ध स्वार्थु नासिला ॥३९॥

विषयीं सर्वथा नाहीं तृप्ति । ऐसें श्रुतिपुराणें बोलती ।

करितां विषयाची आसक्ती । थित्या मुकती नरदेहा ॥६४०॥

नवल नरदेहाची ख्याती । रामनामाच्या आवृत्तीं ।

चारी मुक्ती दासी होती । तो देहो वेंचिती विषयासी ॥४१॥

विषयसुखाचिये आसक्ती । कोणा नाहीं झाली तृप्ती ।

मृगजळाचिये प्राप्ती । केवीं निवती तृषार्त ॥४२॥

यालागीं जाणतेनि मनुष्यें । नरदेहींचेनि आयुष्यें ।

विषयांचेनि सायासें । व्यर्थ कां पिसे कष्टती ॥४३॥

नरदेहाऐसें निधान । अनायासें लाधलें जाण ।

सांडीं सांडीं अभिमान । तेणें समाधान पावसी ॥४४॥

पुढती नरदेहाची प्राप्ती । होईल येथ नाहीं युक्ति ।

यालागीं सांडूनि विषयासक्ती । भावें श्रीपति भजावा ॥४५॥

कलियुगीं सुगम साधन । न लगे योग याग त्याग दान ।

करितां निर्लज्ज हरिकीर्तन । चारी मुक्ति चरण वंदिती ॥४६॥

इटेसाठीं परीस पालटे । येतां कां मानिती वोखटें ।

तैसा कीर्तनाचेनि नेटेंपाटें । देवो भेटे प्रत्यक्ष ॥४७॥

एका जनार्दनु म्हणे । नश्वर देहाचेनि साधनें ।

जनीं जनार्दनु होणें । हे मुद्रा तेणें लाविली ॥४८॥

एका जनार्दना शरण । तंव जनार्दनु जाला एक एकपण ।

जैसें सुवर्ण आणि कंकण । दों नांवीं जाण एक तें ॥४९॥

तोचि एका एकादशीं । श्रीकृष्ण सांगे उद्धवासी ।

अवधूत सांगे यदूसी । गुरूपदेशीं उपदेशु ॥६५०॥

इति श्रीमद्‍भागवते महापुराणे एकादशस्कंधे श्रीकृष्णोद्धवसंवादे यद्ववधूतेतिहासे

एकाकारटीकायां सप्तमोऽध्यायः ॥७॥ श्रीकृष्णार्पणमस्तू ॥ मूळश्लोक ॥७४॥ ओव्या ॥६५०॥