श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ६ वा

समृद्धकामो हीनो वा नारायणपरो मुनिः ।

नोत्सर्पेत न शुष्येत सरिद्‌भिरिव सागरः ॥६॥

वर्षाकाळीं सरिता सकळ । घेऊनि आल्या अमूप जळ ।

तेणें हरुषेजेना प्रबळ । न चढे जळ जळाब्धीं ॥६३॥

ग्रीष्मकाळाचिये प्राप्ती । सरितांचे यावे राहती ।

ते मानूनियां खंती । अपांपती वोहटेना ॥६४॥

तैसेंचि योगियांच्या ठायीं । नाना समृध्दि आलिया पाहीं ।

अहंता न धरी देहीं । गर्वु कांहीं चढेना ॥६५॥

समृध्दि वेंचिलिया पाठीं । खंती नाहीं योगिया पोटीं ।

तो नारायणपरदृष्टीं । सुखसंतुष्टी वर्ततू ॥६६॥

संपत्तीमाजीं असतां । मी संपन्नु हें नाठवे चित्ता ।

दरिद्र आलिया दरिद्रता । नेणे सर्वथा योगिया ॥६७॥

दरिद्र आणि संपन्नता । दोन्ही समान त्याचिया चित्ता ।

नाहीं प्रपंचाची आसक्तता । नारायणपर तत्त्वतां निजबोधें ॥६८॥

या प्रपंचाचा कठिण लागु । नाशासी मूळ स्त्रीसंगु ।

येचिविषी गुरु पतंगू । केला चांगु परियेसीं ॥६९॥