श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक १२ वा

सायन्तनं श्वस्तनं वा न सङ्गृह्णीत भिक्षुकः ।

मक्षिका इव सङ्गृह्णन् सह तेन विनश्यति ॥१२॥

सायंकाळ-प्रातःकाळासी । भक्ष्यसंग्रहो नसावा भिक्षूसी ।

संग्रहें पावती नाशासी । येविषीं मधुमाशी गुरु केली ॥१२॥

रिघोनि नाना संकटस्थानांसी । मधुसंग्रहो करी मधुमाशी ।

तो संग्रहोचि करी धातासी । मधु न्यावयासी जैं येती ॥१३॥

संग्रहो यत्नाचिया चाडा । मोहळ बांधिती अवघडां कडां ।

ते दुर्गमीं रिगु करिती गाढा । अर्थचाडा मधुहर्ते ॥१४॥

कां झाडितां मोहळासी । नाशु होतसे मसियांसी ।

संग्रहाची जाती ऐशी । जीवाघातासी करवितु ॥१५॥

ऐसें देखोनिया जनीं । भक्तभिक्षुकयोगीसज्जनीं ।

संग्रहो न करावा भरंवसेनी । नाशु निदानीं दिसतसे ॥१६॥

आचारावें सत्कर्म । संग्रहावा शुद्ध धर्म ।

हेंचि नेणोनियां वर्म । धनकामें अधम नाशती ॥१७॥

अर्थ विनाशाचें फळ । दुसरें एक नाशाचें मूळ ।

विशेष नाशाचें आहळबाहळ । स्त्री केवळ वोळख पां ॥१८॥

मूळ नाशासि जीविता । कनक आणि योषिता ।

जंव जंव यांची आसक्तता । तंव तंव चढता भवरोगु ॥१९॥

कनक आणि कामिनी । ज्यासी नावडे मनींहुनी ।

तोचि जनार्दनू जनीं । भरंवसेंनी ओळख पां ॥१२०॥

जो सुख इच्छील आपणासी । तेणें नातळावें स्त्रियेसी ।

येचिविषयीं मदगजासी । गुरु विशेषीं म्यां केला ॥२१॥