श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक १९ वा

जिह्वयातिप्रमाथिन्या जनो रसविमोहितः ।

मृत्युमृच्छत्यसद्‍बुधिर्मीनस्तु बडिशैर्यथा ॥१९॥

अर्थ संग्रहें जीवघातु । स्त्रिया-आसक्तीं अधःपातु ।

रसनालोलुप्यें पावे मृत्यु । त्रिविध घातु जीवासी ॥७१॥

ज्यासी रसनालोलुप्यता गाढी । त्यासी अनर्थुचि जोडे जोडी ।

दुःखाच्या भोगवी कोडी । रसनागोडी बाधक ॥७२॥

रसना आमिषाची गोडी । लोलुप्यें मीनु गिळी उंडी ।

सवेंचि गळु टाळू फोडी । मग चरफडी अडकलिया ॥७३॥

पाहतां रस उत्तम दिसत । भीतरीं रोगांचे गळ गुप्त ।

रस आसक्तीं जे सेवित । ते चडफडित भवरोगी ॥७४॥

गळीं अडकला जो मासा । तो जिता ना मरे चरफडी तैसा ।

तेवीं रोगु लागल्या माणसा । दुर्दशा भोगित ॥७५॥

जो रसनालोलुप्यप्रमादी । त्यासी कैंची सुबुद्धी ।

जन्ममरणें निरवधी । भोगी त्रिशुद्धी रसदोषें ॥७६॥

रस सेविलियासाठीं । भोगवी जन्मांचिया कोटी ।

हें न घडे म्हणसी पोटीं । राया ते गोठी परियेसीं ॥७७॥

इंद्रियांची सजीवता । ते रसनेआधीन सर्वथा ।

रसनाद्वारें रस घेतां । उन्मत्तता इंद्रियां ॥७८॥

मातली जे इंद्रियसत्ता । ते नेऊन घाली अधःपाता ।

रसना न जिणतां सर्वथा । भवव्यथा चुकेना ॥७९॥

आहारेंवीण देह न चले । सेविल्या इंद्रियवर्गु खवळे ।

रसनाजयाचें मूळ कळे । तैं दुःखें सकळें मावळतीं ॥१८०॥