श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक २१ वा

तावत् जितेन्द्रियो न स्याद् विजितान्येन्द्रियः पुमान् ।

न जयेद्रसनं यावज्जितं सर्वं जिते रसे ॥२१॥

निरन्नें इंद्रियें जिंतली । तीं जिंतलीं हे मिथ्या बोली ।

अन्न घेतांचि सरसावलीं । सावध जाहलीं निजकर्मी ॥८३॥

जंव रसना नाहीं जिंकिली । तंव जितेंद्रिय मिथ्या बोली ।

जैं साचार रसना जिंकली । तैं वाट मोडिली विषयांची ॥८४॥

विषयाआंतील गोडपण । रसनेआंतील जाणपण ।

दोहींसी ऐक्य केल्या जाण । रसना संपूर्ण जिंतिली ॥८५॥

सर्वां गोडियांचें गोड आहे । ते गोडीस जो लागला राहे ।

त्यासीचि रसना वश्य होये । रसअपाये न बाधिती ॥८६॥

रसनाजितांचें वाधावणें । तेणें ब्रह्मसायुज्यीं पडे ठाणें ।

सोहळा परमानंदे भोगणें । रसना जेणें जिंतिली ॥८७॥