श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ३१ वा

अहो मयाऽऽत्मा परितापितो वृथा साङ्केत्यवृत्त्यातिविगर्ह्यवार्तया ।

स्त्रैणान्नरादर्थतृषोनुशोच्यान्‍ क्रीतेन वित्तं रतिमात्मनेच्छती ॥३१॥

जारपुरुषापासोनि सुख । इच्छितें ते मी केवळ मूर्ख ।

वृथा परितापू केला देख । मज असुख म्यां दीधलें ॥२५॥

स्त्रैण पुरुष ते नराधम । वेश्यागामी त्याहूनि अधम ।

त्यांत कृपणु तो अधमाधम । तयांचा संगम मी वांच्छीती ॥२६॥

जितुक्या अतिनिंदका वृत्ती । मज आतळतां त्या भीती ।

योनिद्वारें जीविकास्थिती । नीच याती व्यभिचारु ॥२७॥

अल्प द्रव्य जेणें देणें । त्याची जाती कोण हें नाहीं पाहणें ।

याहोनि काय लाजिरवाणें । निंदित जिणें पैं माझें ॥२८॥

जया पुरुषासी देह विकणें । तें अत्यंत हीनदीनपणें ।

काय सांगों त्याची लक्षणें । सर्वगुणें अपूर्ण ॥२९॥

वित्त नेदवे कृपणता । काम न पुरवे पुरता ।

प्रीति न करवे तत्त्वतां । भेटी मागुती तो नेदी ॥२३०॥

ऐशियापासाव सुख । वांछितां वाढे परम दुःख ।

जळो त्याचें न पाहें मुख । वोकारी देख येतसे ॥३१॥

एवं जारपुरुषाची स्थिती । आठवितां चिळसी येती ।

पुरे पुरे ते संगती । चित्तवृत्ति विटली ॥३२॥