श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ३६ वा

नूनं मे भगवान् प्रीतो विष्णुः केनापि कर्मणा ।

निर्वेदोऽयं दुराशाया यन्मे जातः सुखावहः ॥३६॥

ये जन्मींचें माझें कर्म । पाहतां केवळ निंद्य धर्म ।

मज तुष्टला पुरुषोत्तम । पूर्वजन्मसामग्रीं ॥५६॥

मज कैंचे पूर्वजन्मीं साधन । ज्याचें नाम पतितपावन ।

कृपाळु जो जनार्दन । त्याचे कृपेन हें घडलें ॥५७॥

दुष्ट दुराशा व्यभिचारु । भगद्वारा चालवीं संसारु ।

तिसी मज वैराग्ययुक्त विचारु । विष्णु साचारु तुष्टला ॥५८॥

जरी असतें पूर्वसाधन । तरी निंद्य नव्हतें मी आपण ।

योनिद्वारा कर्माचरण । पतित पूर्ण मी एक ॥५९॥

यापरी मी पूर्ण पतित । पतितपावन जगन्नाथ ।

तेणें कृपा करून येथ । केलें विवेकयुक्त वैरागी ॥२६०॥

तेणें वैराग्यविचारें देख । दुष्ट दुराशेचें फिटलें दुःख ।

मज झालें परम सुख । निजसंतोख पावलें ॥६१॥

हे दुःख आदळतां अंगासी । वैराग्य नुपजे अभाग्यासी ।

भगवंतें कृपा केली कैसी । दुःखें निजसुखासी दीधलें ॥६२॥