श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ४२ वा

श्रीब्राह्मण उवाच ।

एवं व्यवसितमतिर्दुराशां कान्ततर्षजाम् ।

छित्त्वोपशममास्थाय शय्यामुपविवेश सा ॥४२॥

अवधूत म्हणे यदूसी । धन्य भाग्य तये वेश्येसी ।

वैराग्य उपजलें तिसी । विवेकेंसी निजोत्तम ॥९३॥

एवं विवंचूनि निजबुद्धी । परपुरुषदुराशा छेदी ।

ज्याचेनि संगें आधिव्याधी । बहु उपाधी बाधक ॥९४॥

जे उपाधिचेनि कोडें । जन्ममृत्यूचा पुरु चढे ।

दुःखभोगाचें सांकडें । पाडी रोकडें जीवासी ॥९५॥

येणें वैराग्यविवेकबळें । छेदूनि दुराशेचीं मूळें ।

उपरमु पावली एके वेळे । निजात्मसोहळे ते भोगी ॥९६॥

नित्य सिद्धु सुखदाता । तो हृदयस्थु कांत आश्रितां ।

विकल्प सांडूनि चित्ता । वेगीं हृदयस्था मानली ॥९७॥

त्यासी देखतां अनुभवाचे दिठीं । ऐक्यभावें घातली मिठी ।

निजसुख पावली गोरटी । उठाउठीं तत्काळ ॥९८॥

बोलु घेऊनि गेला बोली । लाज लाजोनियां गेली ।

दृष्य द्रष्टा दशा ठेली । वाट मोडिली विषयांची ॥९९॥

सुखें सुखावलें मानस । तें सुखरूप जालें निःशेष ।

संकल्प विकल्प पडिले वोस । दोघां सावकाश निजप्रीती ॥३००॥

नाबद पडलिया उदकांत । विरोनि तया गोड करीत ।

तेवीं निराशीं पावोनि भगवंत । समरसत स्वानंदे ॥१॥

तेथ हेतूसी नाहीं ठावो । निमाला भावाभावो ।

वेडावला अनुभवो । दोघां प्रीती पाहाहो अनिवार ॥२॥

सांडूनि मीतूंपणासी । खेंव दिधलें समरसीं ।

मग समाधीचिये सेजेशी । निजकांतेंसी पहुडली ॥३॥

झणें मायेची लागे दिठी । यालागीं स्फूर्तीचिया कोटी ।

निंबलोण गोरटी । उठाउठी वोवाळी ॥४॥

ऐसी समाधिशेजेशीं । पिंगला रिघे निजसुखेंसीं ।

अवधूत म्हणे यदूसी । वैराग्यें वेश्येसी उपरमु ॥५॥

वैराग्ये छेदिले आशापाश । पिंगला जाहली गा निराश ।

निराशेसी असमसाहस । सुखसंतोष सर्वदा ॥६॥