श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक १ ला

श्रीब्राह्मण उवाच ।

परिग्रहो हि दुःखाय यद्यत्प्रियतमं नृणाम् ।

अनन्तं सुखमाप्नोति तद्विद्वान् यस्त्वकिञ्चनः ॥१॥

ब्राह्मण म्हणे रायासी । परिग्रहो जयापाशीं ।

वाढतें दुःख तयासी । अहर्निशीं चढोवढी ॥२३॥

कुटुंबपरिग्रहाचे आसक्ती । कपोता निमाला दुर्मती ।

आतां एकाकी परिग्रहो करिती । तेही पावती दुःखातें ॥२४॥

गृहपरिग्रहें गृहस्था । पाषाणमृत्तिकेची ममता ।

काडीकारणें कलहो करितां । सुहृदता सांडिती ॥२५॥

निःसंगा परिग्रहो लागला कैसा । शिष्यसंप्रदायें घाली फांसा ।

शास्त्रपुस्तकसंग्रहवशा । वाढवी आशा मठाची ॥२६॥

त्या मठशिष्यांचें सांत्वन । करितां अत्यंत होय दीन ।

मग परिग्रहाचें उपशमन । अपरिग्रही जाण करिताति ॥२७॥

त्या मठाचिया आशा । शिष्यसंप्रदायवशा ।

कलहो लागे आपैसा । विरोधु संन्यासा परिग्रहें ॥२८॥

परिग्रहो जिणोनि गाढा । लंगोटी त्यजूनि जाहला उघडा ।

नागवे माथां घेऊनि घडा । लाविल्या झाडा शिंपित ॥२९॥

त्या वृक्षाचें कोणी पान तोडी । त्यासी आक्रोशें कलह मांडी ।

थोर परिग्रहाची सांकडी । दुःखें पीडी सर्वांतें ॥३०॥

आवडीं केला जो जो परिग्रहो । तो तो उपजवी दुःखकलहो ।

हा होतांही अनुभवो । वैराग्य पहा हो उपजेना ॥३१॥

ऐशी परिग्रहाची कथा । देखोनि देखणा जो ज्ञाता ।

आसक्ती सांडोनि सर्वथा । अकिंचनपंथा लागला ॥३२॥

प्रपंच अनित्य नाशवंत । तेथील संग्रह काय शाश्वत ।

ऐसें विवंचूनि समस्त । अकिंचनचित्त ते जाहले ॥३३॥

परिग्रहामाजीं गाढा । देहपरिग्रहाचा खोडा ।

मिथ्यात्वें फोडी रोकडा । तो विवेकें गाढा ज्ञाता पैं ॥३४॥

जेथ देहपरिग्रह मिथ्या जाहला । तो अनंत सुखाच्या घरा आला ।

ज्या सुखासी अंत न वचे केला । त्या पावला निजसुखा ॥३५॥

परिग्रहो दुःखवंतू । हा कुररी गुरुत्वें वृत्तांत्तू ।

तुज सांगेन साद्यतू । उपहासें अवधूतू बोलिला ॥३६॥

तंव राजा मनीं चमत्कारला । म्हणे मी राज्यपरिग्रहें गुंतला ।

देहपरिग्रहें बंदी पडला । पाहिजे केला हा त्यागु ॥३७॥

ऐसा राजास वैराग्यु । करूं पाहे सर्व त्यागु ।

श्रवणें जाहला तो सभाग्यु । होय योग्यु निजज्ञाना ॥३८॥

करूनी गुरुत्वें जाणा । परिग्रहत्यागविवंचना ।

आणावया जी मना । सादर श्रवणा करीतसे ॥३९॥