श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ९ वा

अन्वशिक्षमिमं तस्या उपदेशमरिन्दम ।

लोकाननुचरन्नेतान् लोकतत्त्वविवित्सया ॥९॥

जिणोनि प्रतिस्पर्धी भूपाळ । किंकर केले राजे सकळ ।

तूं अरिमर्दन सबळ । मिथ्या केवळ तो गर्व ॥३॥

कामक्रोधादि अरिवर्ग । न जिणतां सकळ साङ्ग ।

अरिमर्दन हा बोल व्यंग । होईल चांग ये अर्थी ॥४॥

कामादिक सहा वैरी । येणें उपदेशशस्त्रधारीं ।

जिणोनि घालितां तोडरीं । मग संसारी अरि नाहीं ॥५॥

लोकांवेगळा अवधूतु । म्हणसी कुमारी ते घरांआंतु ।

तो एकांतींचा वृत्तांतु । कैसेनि प्राप्तु तुज झाला ॥६॥

राहोनियां विजनस्थानीं । विश्वासोनि गुरुवचनीं ।

दृढ बैसोनि आसनीं । निजतत्त्व ध्यानीं आकळिलें ॥७॥

त्याचि तत्त्वनिश्चयालागुनी । मी विचरतसें ये मेदिनी ।

निजात्मभावो जनीं वनीं । दृढ करोनि पाहतसें ॥८॥

होतां दृश्येंसीं भेटी । दृश्य दृश्यत्वें न पडे मिठी ।

द्रष्टेपणही घालोनि पोटीं । ऐसिया दृष्टीं विचरत ॥९॥

अंगीकारितां गुरुत्वगुण । देखतां जगाचें दर्शन ।

मज होतसे चैतन्यभान । ऐसे जाण मी विचरत ॥११०॥

ऐशिया निजदृष्टीं वीरा । मज विचरतां चराचरा ।

अवचटें कुमारीमंदिरा । त्याचि अवसरा मी आलों ॥११॥

करितां कंकणविवंचना । निजस्वार्थाचिया खुणा ।

पाहोनि घेतलें ज्या लक्षणा । ते विचक्षणा परियेसीं ॥१२॥