श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ११ वा

मन एकत्र संयुञ्ज्याज्जितश्वासो जितासनः ।

वैराग्याभ्यासयोगेन ध्रियमाणमतन्द्रितः ॥११॥

वैराग्येंवीण अभ्यासु घडे । तेथ विषयचोर उठती गाढे ।

कामाचा घाला पडे । मुद्दल बुडे निजज्ञान ॥१६॥

विवेकदीप करूनि धुरे । निरसी अज्ञानाचें अंधारें ।

वैराग्याचें बळ पुरें । महामुद्रेचेनि योगें ॥१७॥

प्राणापानाची चुकामुकी । झाली होती बहुकाळ कीं ।

ते अभ्यासबळें एकाएकीं । केली वोळखी दोघांसी ॥१८॥

वोळाखीसवेंचि जाण । पावली जुनाट पहिली खूण ।

दोघां पडिलें आलिंगन । समाधान समसाम्यें ॥१९॥

दृढ बैसोनि आसनीं । ऐशी प्राणापानमिळणी ।

करूनि लाविली निशाणी । ब्रह्मस्थानीं रिघावया ॥१२०॥

ब्रह्मगिरीचिया कडा । शमदमें घालोनियां वेढा ।

प्रत्याहाराचा झगडा । पुढिले कडां लाविला ॥२१॥

प्राणापानांच्या विवरीं । पहिली वोळखी होती खरी ।

माळ लाविली अभेदकरीं । मन एकाग्रीं राखोनि ॥२२॥

एकाग्रतेचेनि कल्लोळें । पुढारें न ढळवे चालिले बळें ।

उल्हाटयंत्राचेनि मेळें । षट्चक्रपाळें भेदिलें ॥२३॥

वैराग्याचीं वज्रकवचें । निधडे वीर लेऊनि साचे ।

एकाग्रताबळें बळाचें । झळके ध्यानाचें करीं खड्ग ॥२४॥

नवल खड्‍गांचा वाहो । लहान थोर निवटी पहा हो ।

संमुख आलिया संदेहो । न लगतां घावो छेदित ॥२५॥

निर्दाळूनि आळसासी । दासी केलें निद्रेसी ।

ऐसें सावधान अहर्निशीं । योगदुर्गासी झोंबती ॥२६॥

रणरंगींचे वीर गाढे । निजबळें चालिले पुढें ।

सत्रावीचें पाणीवाढे । जिंतिलें रोकडें महावीरीं ॥२७॥

तेथ युद्ध झालें चांग । कामादिक अरिषड्वर्ग ।

रणीं पाडिले अमोघ । सतेज खड्ग झळकत ॥२८॥

ऐसे वैरी पाडूनि रणीं । प्राशिलें सत्रावीचें पाणी ।

तंव अनुहताची सुडावणी । दुर्गामधोनि ऊठली ॥२९॥

तेथ सोहंवीराची एकाग्रता । होतां भीतरील भेदु आला हाता ।

दुर्गराखती अहंममता । मरों सर्वथा टेंकली ॥१३०॥