श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक १४ वा

एकचार्यनिकेतः स्याद्प्रमत्तो गुहाशयः ।

अलक्ष्यमाण आचारैर्मुनिरेकोऽल्पभाषणः ॥१४॥

सर्प सांघातु न राहे । एकाकी सुखें विचरत जाये ।

सदा सावधान राहे । श्वासू वाये जावों नेदी ॥१६०॥

तैसीच योगियाची गती । न साहे द्वैताची संगती ।

एकाकी वसे एकांतीं । जनांप्रती अलक्ष्य ॥६१॥

विषमाचा संगु न करी । परी समाचाही संगू न धरी ।

निघे देह संगाबाहेरी । त्वचेचे परी सर्पाचे ॥६२॥

सदा सावधानबुद्धी । लवनिमेष वायां जावों नेदी ।

अनुसंधान त्रिशुद्धी । तुटों नेदी सर्वथा ॥६३॥

सर्प बिळामाजीं रिघें बळें । मार्गीं मागू देखती सकळें ।

धाला भुकेला हें त्यां न कळे । गेला कळे सर्वांसी ॥६४॥

तैसाचि योगियाही योगबळें । न राहे जनांमाजीं जनमेळें ।

गुहेमाजीं पडिला लोळे । एकला खेळे एकपणीं ॥६५॥

हो का योगियांचा आचार । करितां देखती लहान थोर ।

सविकल्पनिर्विकल्प विचार । न कळे साचार कोणासी ॥६६॥

एक म्हणती कर्मठ । एक म्हणती कर्मभ्रष्ठ ।

एक म्हणती आत्मनिष्ठ । कळेना स्पष्ट कोणासी ॥६७॥

सर्पास बोलणेंचि नाहीं । बोले तरी अल्प कांहीं ।

तैसाच योगिया पाहीं । वाग्वादीं नाहीं सादर ॥६८॥

आंतुले कृपेचेनि बळें । बोले मृदु मंजुळ कोंवळें ।

श्रवणासी दोंदें एक वेळे । तेणें वचनमेळें निघालीं ॥६९॥

बोलणें तरी अतिअल्प । परी छेदी संकल्पविकल्प ।

त्याच्या बोलाचे स्वरूप । सत्यसंकल्प जाणती ॥१७०॥

जो एकाकी उदास । ज्याचें परमार्थीं मानस ।

तेणें गृहारंभाची आस । वृथा प्रयास न करावे ॥७१॥