श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक १९ व २० वा

केवलात्मानुभावेन स्वमायां त्रिगुणात्मिकाम् ।

सङ्क्षोभयन्सृजत्यादौ तया सूत्रमरिन्दम ॥१९॥

तामाहुस्त्रिगुणव्यक्तिं सृजन्तीं विश्वतोमुखम् ।

यस्मिन्प्रोतमिदं विश्वं येन संसरते पुमान् ॥२०॥

तेणें निजात्मकाळसत्तें । अवलोकिलें निजमायेतें ।

ते क्षोभोनि तेथें । निजसूत्रातें उपजवी ॥९॥

तेचि बोलिली 'क्रियाशक्ती' । करिती झाली त्रिगुणव्यक्ती ।

अहंकारद्वारा स्रजिती । जग‍उत्पत्तीतें मूळ ॥२१०॥

तेथें गुणागुणविभाग । सुर नर आणि पन्नग ।

अध ऊर्ध्व मध्यभाग । रचिलें जग तत्काळ ॥११॥

ब्रह्मांडीं सूत्र जाण । पिंडू वर्तवी प्राण ।

पिंडब्रह्मांडविंदान । कर्त्री जाण 'क्रियाशक्ति' ॥१२॥

जीव करावया संसारी । षड्‌विकार वाढवी शरीरीं ।

षडूर्मी त्यामाझारीं । जीव संचारीं संचरवी ॥१३॥

एवढी संसार‍उत्पत्ती । करावया इची व्युत्पत्ती ।

यालागीं नांवें 'क्रियाशक्ती' । सांख्यसंमतीं बोलिजे ॥१४॥

या क्रियाशक्तिसूत्राचे ठायीं । जग ओतिलें असे पाहीं ।

आडवेतिडवे ठायींचे ठायीं । गोंवून लवलाहीं वाढत ॥१५॥

दृढबंध देहाभिमाना । देऊन संसारी करी जना ।

उपजवी अनिवार वासना । योनीं नाना जन्मवी ॥१६॥

पित्याचेनि रेतमेळें । रजस्वलेचेनि रुधिरबळें ।

उकडतां जठराग्निज्वाळें । बहुकाळें गोठलें ॥१७॥

तेथ निघाले अवयवांकुर । करचरणादिक लहान थोर ।

देह जाला जी साकार । तरी अपार यातना ॥१८॥

जठरीं गर्भाची उकडतां उंडी । नाना दुःखांची होय पेडी ।

रिघे विष्ठा कृमी नाकींतोंडी । तेणें मस्तक झाडी पुरे पुरे ॥१९॥

थोर गर्भींची वेदना । आठवितां थरकांपू मना ।

भगद्वारें जन्म जाणा । परम यातना जीवासी ॥२२०॥

ऐसें जन्मवूनि जनीं । घाली स्वर्गाच्या बंदिखानीं ।

कां पचती अधःपतनीं । देहाभिमानेंकरूनियां ॥२१॥

ऐसी सुखदुःखांची कडी । घालोनि त्रिगुणीं दृढ बेडी ।

भोगवी दुःखांच्या कोडी । तरी न सोडी अविद्या ॥२२॥

हा थोर मायेचा खटाटोपू । राया तुज नाहीं भयकंपू ।

तुवां दृढ धरोनि अनुतापू । अभिमानदरर्पू छेदिला ॥२३॥

तुझी पालटली दिसे स्थिती । हृदयीं प्रगटली चिच्छक्ती ।

मावळली अविद्येची राती । बोधगभस्ति उगवला ॥२४॥

जेथ छेदिला अभिमान । तेथें कामादि वैरी निमाले जाण ।

जेवीं शिर छेदिल्या करचरण । सहजें जाण निमाले ॥२५॥

यापरी तूं 'अरिमर्दन' । बोलिलों तें सत्य जाण ।

ऐकोनि अवधूतवचन । सुखसंपन्न नृप झाला ॥२६॥

म्हणे धन्य धन्य मी सनाथ । मस्तकीं ठेविला हस्त ।

प्रेमें वोसंडला अवधूत । हृदयीं हृदयांत आलिंगी ॥२७॥

दोघां निजात्मबोधें जाहली भेटी । यालागीं खेवा पडली मिठी ।

तेणें आनंदें वोसंडे सृष्टी । सभाग्यां भेटी सद्‍गुरूसी ॥२८॥

बालका कीजेति सोहळे । तेणें निवती जननीचे डोळे ।

शिष्यासी निजबोधु आकळे । ते सुखसोहळे सद्‍गुरूसी ॥२९॥

करितां दोघांसी संवादु । वोसंडला परमानंदु ।

पुढील कथेचा संवादु । अतिविशदु सांगत ॥२३०॥