श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ३१ वा

न ह्येकस्माद् गुरोर्ज्ञानं सुस्थिरं स्यात्सुपुष्कलम् ।

ब्रह्मैतदद्वितीयं वै गीयते बहुधर्षिभिः ॥३१॥

गुरूनें सांगितलें निजज्ञान । हृदयीं प्रकाशलें चिद्भान ।

तें विद्युत्प्राय चंचळ जाण । स्थैर्यपण त्या नाहीं ॥३॥

जें मूळींचि चंचळ । तें कदा नव्हे पुष्कळ ।

क्षणां भासे क्षणां चपळ । तेणें तळमळ साधका ॥४॥

जैसें मुखींचें आमिष जाये । तेणें सर्प डंखला राहे ।

तैसी वेदना साधकां होये । वियोगु न साहे सर्वथा ॥५॥

येरवीं ब्रह्म अद्वितीय नित्य । हें सकळ ऋषींचें संमत ।

त्यांसीही पुसों जातां बहुत । विक्षेप तेथ उठती ॥६॥

एक म्हणती ब्रह्म सगुण । एक म्हणती तें निर्गुण ।

ऐसे वाद करिती दारुण । युक्तिखंडण अभिमानें ॥७॥

एक म्हणती ब्रह्म सप्रपंच । एक म्हणती निष्प्रपंच ।

मिळोनियां पांचपांच । शब्दकचकच वाढविती ॥८॥

प्रपंचदर्शन विक्षेपता । तेथ साधावया निज‍ऐक्यता ।

सुबुद्धीनें नाना पदार्था । गुणग्राहकता गुरुरूपें ॥९॥

तेथ साधकांचे प्रश्न । सहसा न पवती समाधान ।

यालागीं पुसावया मन । न रिघे जाण ते ठायीं ॥४१०॥

जेथूनि विक्षेपता वाढे । तेथेंचि ऐक्यता जोडे ।

तें नानागुरुत्वें रोकडें । साधन चोखडें योजिलें ॥११॥

जीं जीं सांगितलीं गुरुलक्षणें । तीं तीं निजबुद्धीचीं साधनें ।

समूळ विक्षेपू तेणें । तीव्र धारणें छेदिला ॥१२॥

तेणें चंचलत्वें निश्चल । फावलें निजबोधाचें मूळ ।

दृश्य देखतां केवळ । भासे सकळ चिन्मात्र ॥१३॥

जें माझ्या निजगुरूंनीं । पूर्वी दिधलें होतें बोधुनी ।

तेंचि नाना गुरुत्वें साधूनी । विक्षेप छेदुनी पावलों ॥१४॥

निजगुरु तो एकुचि जाण । इतर गुरु साधकत्वें साधन ।

हें यथातथ लक्षण । तुज निरूपण म्यां केलें ॥१५॥

येथ प्रपंचाचें भानाभान । कर्म करितां न कळे जाण ।

लाधली निजबोधाची खूण । समदर्शन सर्वदा ॥१६॥

दृश्य देखतां दृष्टीं । नव्हे दृश्येंसीं भेटी ।

हारपली कर्मत्रिपुटी । बोधकसवटी अभिनव ॥१७॥

यथेष्ट करितां भोजन । उष्टेना निराहारलक्षण ।

जगेंसीं वागतां जाण । एकलेपण मोडेना ॥१८॥

तरंग सागरामाजीं क्रीडतां । न मोडे उदकाची एकात्मता ।

तेवीं जगामाजीं वर्ततां । दुजी वार्ता मज नाहीं ॥१९॥

नवल सद्‍गुरूची नवायी । सर्वी सर्व तोचि पाहीं ।

गुरूवेगळें रितें कांहीं । उरलें नाहीं सर्वथा ॥४२०॥

आतां माझें जें मीपण । तें सद्‍गुरु जाला आपण ।

बोलतें तुझें जें तूंपण । तेंही जाण सद्‍गुरुचि ॥२१॥

याहीपरी पाहतां । माझा गुरु एक एकुलता ।

तेथें दुजेपणाची वार्ता । नाहीं सर्वथा यदुराया ॥२२॥

ऐशी सद्‍गुरुकथा । तुज सांगितली परमार्था ।

हरिखें आलिंगिलें नृपनाथा । दोघां ऐक्यता निजबोधें ॥२३॥

जीवीं जीवा पडली मिठी । आनंदें वोसंडली सृष्टी ।

तेणें वाचेसी पडली बेलवटी । बोलों उफराटी विसरली ॥२४॥

हरिखु न संटवे हृदयभवनी । बाहेर वोसंडे स्वेदेजोनी ।

आनंदघन वोळला नयनीं । स्वानंदजीवनीं वर्षतु ॥२५॥

तुटली अहंकाराची बेडी । पावलों भवार्णवपरथडी ।

म्हणौनि रोमांची उभविली गुढी । जिंतिली गाढी अविद्या ॥२६॥

समूळ देहभावो पळाला । यालागीं गात्रकंपू चळचळा ।

संकल्पविकल्प निमाला । मनेंसीं बुडाला मनोरथु ॥२७॥

जीवभावो उखिता । यदूनें अर्पिला गुरुनाथा ।

तें चिह्न बाहेरीं तत्त्वतां । दावी सर्वथा निजांगीं ॥२८॥

तो अवधूत जाण दत्तात्रया । तेणें आलिंगूनि यदुराया ।

निजरूपाचा बोधू तया । अनुभवावया दीधला ॥२९॥

दत्तात्रेयशिष्यपरंपरा । सहस्त्रार्जुन यदु दुसरा ।

तेणें जनार्दनू तिसरा । शिष्य केला खरा कलियुगीं ॥४३०॥

गुरुप्राप्तीलागीं सर्वथा । थोर जनार्दनासी चिंता ।

विसरला तिन्ही अवस्था । सद्‍गुरु चिंतितां चिंतनीं ॥३१॥

देवो भावाचा भोक्ता । दृढ जाणोनि अवस्था ।

येणें जालें श्रीदत्ता । तेणें हातु माथां ठेविला ॥३२॥

हातु ठेवितांचि तत्काळ । बोधु आकळिला सकळ ।

मिथ्या प्रपंचाचे मूळ । स्वरूप केवळ स्वबोधें ॥३३॥

कर्म करूनि अकर्ता । तोचि अकर्तात्मबोधु जाला देता ।

देहीं असोनि विदेहता । तेही तत्त्वतां आकळिली ॥३४॥

गृहाश्रमू न सांडितां । कर्मरेखा नोलांडितां ।

निजव्यापारीं वर्ततां । बोधु सर्वथा न मैळे ॥३५॥

तो बोधु आकळतां मना । मन मुकलें मनपणा ।

अवस्था नावरेचि जनार्दना । मूर्च्छापन्न पडियेला ॥३६॥

त्यासी सावध करूनि तत्त्वतां । म्हणे प्रेमा आहे सत्त्वावस्था ।

तोही गिळोनि सर्वथा । होयीं वर्तता निजबोधें ॥३७॥

पूजाविधी करोनियां । जंव जनार्दनु लागला पायां ।

तंव अदृश्य जाला दत्तात्रेया । योगमायाचेनि योगें ॥३८॥

कथेसी फांकलों सर्वथा । तो कोपु न मनावा श्रोतां ।

प्रसंगें गुरुविवंचना होतां । मीही गुरुकथा बोलिलों ॥३९॥

मज तंव चुकी पडिली मोठी । चुकूनि सांगितली गुरुगोठी ।

तेही संस्कृत नव्हे मराठी । वृथा चावटी न म्हणावी ॥४४०॥

जो असेल गुरुभक्त । तो हें जाणेल मनोगत ।

जो गुरुस्मरणीं सदोदित । त्यासी हें हृद्‍गत कळेल ॥४१॥

ज्यांसी गुरुचरणीं श्रद्धा गाढी । ज्यांसी गुरुभजनीं अतिआवडी ।

जिंहीं गुरुप्रेम जोडिलें जोडी । ते हे गोडी जाणती ॥४२॥

ज्या सद्‍गुरूचें नांव घेतां । चारी मुक्ती वोडविती माथा ।

मुक्ति नावडे गुरुभक्तां । नित्यमुक्तता गुरुचरणीं ॥४३॥

ज्याचें घेतां चरणतीर्थ । चारी मुक्ती पवित्र होत ।

पायां लागती पुरुषार्थ । धन्य गुरुभक्त त्रिलोकीं ॥४४॥

चैतन्य नित्य निराधार । निर्धर्मक निर्विकार ।

त्याचा केला जीर्णोद्धार । सत्य साचार जगद्‍गुरु ॥४५॥

सद्‍गुरुकृपा नव्हतां । नव्हती देवाची कथावार्ता ।

देवासी देवपणीं स्थापिता । सत्य सर्वथा सद्‍गुरु ॥४६॥

सद्‍गुरु कृपेवीण पाहीं । देवो असतुचि झाला होता नाहीं ।

त्यासी देवपणे ठेवूनि ठायीं । भजविता पाहीं गुरुरावो ॥४७॥

त्या सद्‍गुरूची कथा । चुकोनि जालों बोलता ।

थोर अपराधु हा माझे माथां । क्षमा श्रोतां करावी ॥४८॥

वृथा बोलिलों नाहीं जाण । झालें बोलावया कारण ।

दत्तात्रेयशिष्यकथन । करितां जनार्दन आठवला ॥४९॥

मी जरी नाठवीं जनार्दनासी । परी तो विसरों नेदीच आपणासी ।

हटें देतसे आठवणेंसी । अहर्निशीं सर्वदा ॥४५०॥

जिकडे जिकडे मी पाहे । तिकडे तिकडे तोचि होऊनि राहे ।

मी जरी त्याजकडे न पाहें । तें न पाहणें होये तो माझें ॥५१॥

जिकडे मी विसरोंनि जायें । तिकडेचि तो येऊनि राहे ।

मी जरी त्याजकडे न पाहें । तें न पाहणें होये तो माझें ॥५२॥

घटु सांडूं पाहे आकाशासी । तंव आकाश न सांडी घटासी ।

तेवीं जनार्दनु आम्हांसी । अहर्निशीं लागला ॥५३॥

मी न करीं त्याची कथा । तंव तोचि होये मुखीं वक्ता ।

ऐसेंनि बलात्कारें बोलविता । काय म्यां आतां करावें ॥५४॥

दृश्य मी देखावया बैसें । तंव दृश्या सबाह्य जनार्दनु दिसे ।

श्रवणीं ऐकतां सौरसें । शब्दीं प्रवेशे जनार्दनू ॥५५॥

आतां नाइकें न पाहें । म्हणौनि मी उगा राहें ।

तंव उगेपणाचेनि अन्वयें । जनार्दनु पाहे लागला ॥५६॥

ऐसा अडकलों त्रिशुद्धी । जनार्दनू उघडो नेदी ।

श्रोता सांगावी जी बुद्धी । मी अपराधी सर्वथा ॥५७॥

श्रोते म्हणती नवलावो । येथ न देखों अहंभावो ।

पाहतां बोलाचा अभिप्रावो । प्रेम पहा हो लोटत ॥५८॥

येथील विचारितां बोल । क्षीराब्धीहून सखोल ।

नवल प्रेमाची वोल । येताती डोल स्वानंदें ॥५९॥

जें त्वां केलें गुरुनिरूपण । तें सप्रेम ब्रह्मज्ञान ।

थोर निवविलों जाण । नाहीं दूषण निरूपणा ॥४६०॥

नित्य करावें गुरुस्मरण । तें गुरूप्रेमें केलें कथन ।

करितां अमृताचें आरोगण । पिरे कोण म्हणेल ॥६१॥

जनार्दनीं दृढ भावो । हाही कळला अभिप्रावो ।

निरूपणाचा नवलावो । रसाळ पहा हो वोडवला ॥६२॥

तूं मूळकथा निरूपिसी । अथवा आडकथा सांगसी ।

परी गोडी या निरूपणाऐसी । न देखों आणिकांसी सर्वथा ॥६३॥

शुद्ध निरूपणें गुरु वर्णिसी । वर्णूनि अपराधी म्हणविसी ।

ऐक्यें घोळली बुद्धी कैसी । मानु श्रोत्यांसी वाढविला ॥६४॥

तुझी जे अपराधबुद्धी । ते प्रवेशली भगवत्पदीं ।

जाहली अपराधाची शुद्धी । देखणा त्रिशुद्धी तूं होसी ॥६५॥

गुरुस्तवनीं रतसी । तेव्हां मूळकथा विसरसी ।

प्रेमाची जाती ऐसी । कळलें आम्हांसी सर्वथा ॥६६॥

श्रोते म्हणती आतां । विस्मयो दाटला चित्ता ।

वेगीं चालवावें ग्रंथा । पूर्वकथा मूळींची ॥६७॥

हें संतवचन मानूनि माथां । चरण वंदूनि तत्त्वतां ।

सावधान व्हावें चित्ता । पुढील कथा सांगेन ॥६८॥

यापरी तो अवधूतू । यदूसी सांगे परमार्थू ।

संवादें निवाला परमाद्‍भूतू । मग निवांतु राहिला ॥६९॥