श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ३२ वा

श्रीभगवानुवाच ।

इत्युक्त्वा स यदुं विप्रस्तमामन्त्र्य गभीरधीः ।

वन्दितोऽभ्यर्थितो राज्ञा ययौ प्रीतो यथागतम् ॥३२॥

जाहलें देखोनि समाधान । मग पुसोन निघाला ॥४७०॥

राजा धांवोनि लागला चरणां । परम प्रेमें करीं पूजना ।

करोनियां प्रदक्षिणा । मागुता चरणां लागला ॥७१॥

जाय ऐसें न बोलवे सर्वथा । राहे म्हणतां दिसे सामिता ।

वियोगु न साहवे तत्त्वतां । बोलु सर्वथा खुंटला ॥७२॥

ते देखोनि अवस्था । कृपा उपजली श्रीदत्ता ।

हात ठेवूनि माथां । प्रसन्नता उपजली ॥७३॥

येथूनि तुज मज आतां । वियोगु नाहीं सर्वथा ।

ऐसें आश्वासोनि नृपनाथा । होय निघता श्रीदत्त ॥७४॥

जेणें सुखें होता आला । तेणेंचि सुखें निघता जाला ।

राजा अतिप्रीतीं निमाला । सुखी झाला निजबोधें ॥७५॥