श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


आरंभ

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥

ॐ नमो सद्‍गुरु धन्वंतरी । ज्याची दृष्टीचि निरुज करी ।

त्यावांचोनि संसारीं । भवरोगु दुरी न करवे ॥१॥

ज्या भवरोगाचेनि दर्पें । फुंफात तापलीं त्रिविध तापें ।

'मी माझे' येणें संकल्पें । वाग्जल्पें जल्पती ॥२॥

पडिलीं द्वैताचिया दुखणा । तोंडींची चवी गेली जाणा ।

मुखा आला कडवटपणा । कटु वचना बोलतु ॥३॥

जेथें व्याधीचेनि सन्निपातें । विवेक हाणोनियां लातें ।

उमरुडूनि धैर्य हो ते । वासनावनातें हिंडती ॥४॥

मनोरथकर्दमीं चरफडित । संकल्पमृगजळीं बुडत ।

वेगीं निसरोनियां पडत । टेंक चढतां स्वर्गाचें ॥५॥

वोरबडत स्नेहाची आराटी । गोंवीत लोभाची बोरांटी ।

खिळिला प्रपंचाचिया कंठीं । मारितां नुठी तेथूनि ॥६॥

भवरोगभ्रमें भ्रमले कैसे । खावों नये तें खावों बैसे ।

करूं नये तें करितां दिसे । योषितांसरिसें धांवत ॥७॥

तेथ धनभयाचे शारे येत । तेणें थरथरां कांपत ।

धाकें धाकें घामेजत । दडी देत गुप्तत्वें ॥८॥

भोगाभिमानु चढे देहीं । तेव्हां न राहे खाटे भुईं ।

विधीचें पांघरूण टाकी पाहीं । डोळा ठायीं लागेना ॥९॥

उभें न राहवे ऐक्यवृत्ती । क्षीण झाली ज्ञानशक्ती ।

पडलीं जडत्वें लोळती । पाणी मागती विषयांचे ॥१०॥

अल्प‍अल्प देतां तें जळ । कडकडूनि झोंबती प्रबळ ।

आम्हांसी फार द्या गा जळ । तृषा केवळ वोळेना ॥११॥

कुपथ्य करितां निरंतर । तंव तो झाला जीर्णज्वर ।

क्षयो लागला जी थोर । क्षीण शरीर पडियेलें ॥१२॥

क्षणाक्षणां अतिक्षीणता । विकार संचरले जीविता ।

तेणें प्रबळ वाढली चिंता । सुख सर्वथा बुडालें ॥१३॥

नवल रोगाचा पडिपाडू । गोड परमार्थ तो जाला कडू ।

केवळ विषप्राय विषय कडू । तोचि गोडु पैं झाला ॥१४॥

ते व्याधीचिया उफाडा । देतां सत्कथाकाढा ।

श्रवणमुखींच्या भावार्थदाढा । पाडी पुढां दांतखिळी ॥१५॥

देतां तुलसीमकरंद नसू । वरता जावों नेदी श्वासू ।

मस्तक झाडी मानी त्रासू । रोगें बहुवसु व्यापिला ॥१६॥

ऐसा रोग देखोनियां गाढा । वैद्य आचार्य धडफुडा ।

कृपा पाहे याजकडा । तो रोकडा वांचवी ॥१७॥

निधडा वैद्य तो सुबुद्धि । जीवु गेलिया मरों नेदी ।

जीवेंवीण वांचवी त्रिशुद्धि । अगाध सिद्धि तयाची ॥१८॥

शुद्धभाग्येंकरूनि जाण । तो करी कृपाकूर्मावलोकन ।

तेंचि रोगिया अमृतपान । होय सावधान तत्काळ ॥१९॥

एवं जालिया सावधान । रोगी आपणिया आपण ।

नित्यानित्याचें पाचन । करी सेवन साक्षेपें ॥२०॥

तेणें न फिटेचि जीर्णज्वरु । न तुटे क्षयाचा महामारु ।

हें देखोनियां वैद्यसद्‍गुरु । रसोपचारु मांडिला ॥२१॥

तेणें अक्षररस अर्धमात्रा । देतां क्षयाचा थारा ।

मोडूनियां शरीरा । पूर्वपरंपरा अक्षय केलें ॥२२॥

दारुण चुकवावया कुपथ्य । वैराग्य राखण ठेविलें नित्य ।

लावूनि अनुसंधानाचें पथ्य । निर्दाळिला तेथ भवरोगू ॥२३॥

रोगी उपचारिल्यावरी । प्रबळ क्षुधा खवळे भारी ।

चित्तचिंतेच्या लाह्या करी । क्षणामाझारीं खादल्या ॥२४॥

काळे गोरे चतुर्वर्णचणे । आश्रमेंसीं भाजिले फुटाणे ।

अहं सोहंगुळेंसीं तेणें । निःशेष खाणें तत्काळ ॥२५॥

फळाभिलाषेंसीं आशा । बोंडें भरलीं होतीं खसखसा ।

तींही खादलीं घसघसां । न लगतां घांसा गिळियेलीं ॥२६॥

गूळ साखरेचा पडिपाडू । खादले कर्माकर्माचे लाडू ।

खातां न म्हणे गोड कडू । लागला झोडूं स्व‍इच्छा ॥२७॥

ब्रह्माहमस्मीचीं गोमटीं । पक्वान्नें देखिलीं दिठीं ।

तींही खाऊनि उठाउठी । मायेपाठीं लागला ॥२८॥

ते धाकेंधाकेंचि निमाली । मिथ्यात्वें नासोनि गेली ।

स्वानंदें पुष्टि जाली । झाडी केली भवरोगा ॥२९॥

ऐसा सद्‍गुरु वैद्य गाढा । जेणें उपचारोनि केलों निधडा ।

शरण रिघावें तुजपुढां । तंव चहूंकडां तूंचि तूं ॥३०॥

तुजवेगळें आपणियातें । देखोनि शरण यावें तूतें ।

तंव मीतूंपण हारपलें थितें । कैसेनि तूतें भजावें ॥३१॥

ज्यांच्या सुटल्या जीवग्रंथी । झाले आत्माराम निश्चितीं ।

तेही अहेतुक भक्ति करिती । प्राप्तांची स्थिति हे जाणा ॥३२॥

गुरुभजनापरतें सुख । मोक्ष मानिती तेही मूर्ख ।

मोक्ष गुरुचरणींचा रंक । विरळा लोक हें जाणती ॥३३॥

आम्हां सद्‍गुरुदृष्टीं परम योग्य । आम्ही सद्‍गुरुकृपा सदा श्लाघ्य ।

गुरुसेवें आम्ही सभाग्य । परम योग्य गुरुस्तवनें ॥३४॥

सद्‍गुरूचें नाममात्र । तेंचि आम्हां वेदशास्त्र ।

सकळ मंत्रावरिष्ठ मंत्र । नाम सर्वत्र गुरूचें ॥३५॥

सद्‍गुरूचें तीर्थमात्र । सकळ तीर्थां करी पवित्र ।

गुरुचरण तें आमचें क्षेत्र । वृत्ति स्वतंत्र ते आम्हां ॥३६॥

तूं पुरे पुरे म्हणसी स्तवन । परी वर्णितां तुझे उदार गुण ।

अतृप्त सर्वथा नुठी मन । तुझी आण वाहातसें ॥३७॥

तुझे गुण वर्णावया तत्त्वतां । मी प्रवर्तलों श्रीभागवता ।

त्वां मज लाविलें भक्तिपंथा । निजकथाकीर्तनीं ॥३८॥

जय जय सद्‍गुरु जनार्दना । भवगजपंचानना ।

एकाकी शरण आलों जाणा । तुझ्या श्रीचरणा पावलों ॥३९॥

पावलों शास्त्र श्रीभागवत । अवधारा तेथींचा मथितार्थ ।

उद्धवासी श्रीकृष्णनाथ । परम परमार्थ सांगेल ॥४०॥

यदुअवधूतसंवादेंसीं । लक्षणोक्त चोविसां गुरूंसी ।

परिसोनियां उद्धवासी । भावना ब्रह्मेंसीं लिगटली ॥४१॥

ब्रह्म सर्वगत सत्य होये । मज सबाह्य कोंदलें आहे ।

तेंचि माझें मज ठाउकें नोहे । कोण उपाये करावे ॥४२॥

ऐसी उद्धवाची चिंता । कळों सरली कृष्णनाथा ।

तोचि उपावो सर्वथा । होय सांगता अविरोधें ॥४३॥