श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ३ रा

सुप्तस्य विषयालोको ध्यायतो वा मनोरथः ।

नानात्मकत्वाद् विफलस्तथा भेदात्मधीर्गुणैः ॥३॥

स्वप्न आणि मनोरथ । मनोमात्रविलासित ।

ते निद्रितासी सत्य पदार्थ । मिथ्या होत जागृतीं ॥८६॥

तैसें कामनेचेनि उल्हासें । इंद्रियांचेनि सौरसें ।

उभय भोगपिसें । नाथिलें वसे बुद्धीसी ॥८७॥

शिंपी शिंपपणें असे । धनलोभ्या रुपें भासे ।

तेवीं विषयाचेनि अभिलाषें । भेदपिसें नसतेंचि ॥८८॥

स्वप्नीं देखिलें आत्ममरण । जागृतीं मिथ्या म्हणे आपण ।

तैसा स्वरूपीं जागा जाल्या जाण । जन्ममरण त्या नाहीं ॥८९॥

जंववरी भेदाची भेदसिद्धी । तंववरी जन्ममरण बाधी ।

भेदु मिथ्या जालिया त्रिशुद्धी । अभेदीं बाधी तें नाहीं ॥९०॥

तो भेदु कैसेनि तुटे । निजस्वरूप कैसेनि भेटे ।

ते अर्थी साधन गोमटें । ऐक चोखटें विभागें ॥९१॥