श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक १० वा

योऽसौ गुणैर्विरचितो देहोऽयं पुरुषस्य हि ।

संसारस्तन्निबंधोऽयं पुंसो विद्याच्छिदात्मनः ॥१०॥

ऐकें पुरुष जो पुरुषोत्तम । ज्या आधीन मायागुणग्राम ।

ज्यासी 'ईश्वर' ऐसा नामधर्म । शास्त्रानुक्रम बोलती ॥९९॥

त्या ईश्वराची जे माया । ज्या उपजविलें नाना कार्या ।

जीव संसारी करावया । भ्रमु वायां वाढविला ॥३००॥

तेथें चैतन्य जें प्रतिबिंबले । तेंचि 'जीव' पणें वाच्य झालें ।

जेवीं थिल्लरीं चंद्रबिंब बुडालें । दिसे नाथिलें मूर्खासी ॥१॥

त्या थिल्लरासी नातळत । चंद्रमा असे गगनीं अलिप्त ।

तैसा आत्मा अविद्यातीत । अविद्या नातळत प्रतिबिंबाला ॥२॥

'अहमिति' प्रथमाध्यासें । सूक्ष्म लिंगदेह मायावशें ।

नाना अनर्थकारी कैसें । वासनासौरसें उपजलें ॥३॥

जरी लिंगदेह झालें सबळ । विषयभोगा दृढ मूळ ।

तरी भोगु नव्हे स्थूळ । सूक्ष्म भूतगोळा स्थूळावला ॥४॥

स्थूळापासोनि स्थूळ देहो । पांचभौतिक घडला पहा हो ।

एवं उभयदेह अभिप्रावो । झाला निर्वाहो या रीतीं ॥५॥

ऐसा उभय देहीं वर्ततां । दृढ लागली देहात्मता ।

तेणें वाढली अहंममता । मी कोण हें तत्त्वतां विसरला ॥६॥

न कळे निजसुखाची गोडी । पडला विषयांचिये वोढी ।

पापपुण्यांचिया जोडी कोडी । पडिली बेडी सुबुद्धा ॥७॥

देहाध्यासें देहधर्म । सत्य मानी वर्णाश्रम ।

मग आचरों लागे कर्म । फळसंभ्रम वांछूनि ॥८॥

राजा चक्रवर्ती निजमंदिरीं । निजेला सुमनशेजेवरी ।

तो स्वप्नीं होऊनि भिकारी । अंत्यजाघरीं अन्न मागे ॥९॥

तेथ कुटका एकु यावया हाता । नीसाची म्हणे राजा रे तूं तत्त्वतां ।

परी मी राजा हें नाठवे चित्ता । स्वप्नीं भिक्षुकता दृढ झाली ॥३१०॥

तैसी विसरोनि निजात्मता । फळें मागे देवां देवतां ।

मी देवांचा देवो तत्त्वतां । हें त्यासी सर्वथा नाठवे ॥११॥

त्या स्वप्नाचेनि अतिअध्यासें । राजा वोसणावे 'मी भिकारी' ऐसें ।

ऐकोनि सेविकां येत हांसें । राजा स्वप्नवशें जल्पतु ॥१२॥

येथ गाढ मूळ अवस्थाघोरें । सर्वांग गडबडी निदसुरें ।

नागवें उघडें न स्मरे । निद्राभरें घोरत ॥१३॥

त्यासी थापटी पुरोहितु । जागा होतां होय विस्मितु ।

मग नागवेपणा आच्छादितु । सांगों लाजतु भिक्षुकता ॥१४॥

तेवीं अविद्या निद्रा उद्‍भटा । जल्पे मी देही मी करंटा ।

मी संपन्नु मी ज्ञाता मोठा । देहात्मनिष्ठा बडबडी ॥१५॥

तेणें निदसुरपणाचे लाहें । कर्माकर्मांचे पसरी पाये ।

हिताहित कोण पाहे । देहमोहें मोहितु ॥१६॥

तो गाढमूढ अवस्थेआंतु । होता दीर्घसंकल्पें लोळतु ।

लोभें अतिजल्पें जल्पतु । वोसणतु 'मी माझें' ॥१७॥

तेथें दैवयोगें गडबडितु । अवचटें गुरुचरणीं आदळतु ।

निकटता देखोनि कृपावंतु । थापटितु निजबोधें ॥१८॥

'ब्रह्माहमस्मि' ऐसी वाणी । एक वेळ पडली कानीं ।

अविद्या निद्रा गेली पळोनी । तो तत्क्षणीं जागिन्नला ॥१९॥

जागतांचि होय विस्मित । 'मी देह' म्हणतां लाजत ।

देहकर्म देखे निंदित । कर्मातीत ब्रह्म मी ॥३२०॥

होआवया संसारबंधन । यासी अविद्याचि गा कारण ।

तिसी छेदावया जाण । खड्‍ग तीक्ष्ण ब्रह्मविद्या ॥२१॥

अविद्या निरसी ब्रह्मज्ञान । ते अवश्य ब्रह्माहोनि भिन्न ।

मोडलें म्हणसी अद्वैतपण । तें नव्हे जाण सिद्धांतीं ॥२२॥

प्रपंचु अज्ञानें लाठा । ज्ञान‍अज्ञानाच्या सत्त्ववाटा ।

फेडिजे कांटेन कांटा । मग खटपटा निमाल्या ॥२३॥

अविद्या जीवबंधनी । ब्रह्मविद्या बंधच्छेदनी ।

या समूळ तुजलागुनी । सांगितल्या दोनी सविस्तर ॥२४॥

तेचि ब्रह्मविद्या जाणा । कैसेनि प्राप्त होय आपणा ।

ते पूर्वपीठ विवंचना । सावधमना परियेसीं ॥२५॥