श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


आरंभ

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥

ॐ नमो सद्‍गुरु सच्चिद्‍घन । वर्षताहे स्वानंदजीवन ।

मुमुक्षु मयूर आनंदले जाण । हरिखें उड्डाण करिताती ॥१॥

तो सजल देखोनि मेहो । सोहंभावें फोडिती टाहो ।

रोमांचपिसीं पसरूनि पहा हो । सत्त्वें लवलाहो नृत्याचा ॥२॥

नाचती स्वानंदाचेनि मेळें । तेणें सर्वांगीं निघाले डोळे ।

पिसें देखणीं जाहलीं सकळें । तें शिरीं गोपाळें वाहलीं ॥३॥

तो मेघ देखोनि संमुख । आर्त चातक पसरिती मुख ।

बिंदुमात्रें पावले सुख । नित्य निर्दोख ते जाहले ॥४॥

आर्ततृषा तत्काळ वोळे । निवाले तेणें स्वानंदजळें ।

मग हरिखाचेनि कल्लोळें । सुखसोहळे भोगिती ॥५॥

सुभूमि देखोनि निर्मळ । जाणोनि वर्षती काळवेळ ।

वर्षों लागले जी प्रबळ । जळकल्लोळ अनिवार ॥६॥

तेणें वोळलेनि कृपाभरें । शिष्यसरितेसी पुरु भरे ।

विकल्पवोसणें एकसुरें । महापुरें वाहाविलीं ॥७॥

तेणें प्रवाहनिर्मळजळें । चिदैक्यसागरीं सरिता मिळे ।

मग समरसोनि तेणें जळें । राहे निश्चळें निजरूपें ॥८॥

वैराग्यरावें शुद्ध केली । पृथ्वी निजवोला वोलली ।

कठिणत्वेंवीण मार्दवा आली । नाही अंकुरली बहुबीजें ॥९॥

अखंड वर्षतां जळमेळीं । वासनेचीं ढेपें विरालीं ।

सद्‍भावाची वोल जाली । वाफ लागली बोधाची ॥१०॥

तेथें न पेरतांचि जाण । सहज निजबीजें परिपूर्ण ।

अंकुरली आपणिया आपण । सिद्ध संपूर्ण स्वभावें ॥११॥

ते परम कृपेचिये पुष्टीं । स्वानंदें पिकली समदृष्टी ।

परमानंदें कोंदली सृष्टी । ऐक्यें संवसाटी जीवशिवां ॥१२॥

फिटला दुःखाचा दुष्काळू । पाहला सुखाचा सुकाळू ।

वोळळा सद्‍गुरु कृपाळू । आनंदकल्लोळू सच्छिष्यां ॥१३॥

वरूषतां निजपर्जन्यधारा । वर्षला नाना अवतारगारा ।

कार्यानुरूपें तदाकारा । विरोनि निराकारा त्या होती ॥१४॥

त्या पर्जन्याचा वोसडा । दैवें लागला जडामूढां ।

तो सरता होय संतांपुढां । अवचटेंसी तोंडा जैं लागे ॥१५॥

तो महामेघ श्रीहरी । सद्‍गुरुकृपा वोळे जयावरी ।

तोचि धन्य चराचरीं । पूज्य सुरनरीं तो कीजे ॥१६॥

गुरुनामें अति घनवटु । शिष्य तारूनि अतिहळुवटु ।

ज्याचा आदि मध्य शेवटु । न कळे स्पष्टु वेदांसी ॥१७॥

तो सद्‍गुरु श्रीजनार्दनु । वोळलासे आनंदघनु ।

तेणें एका एकु केला पावनु । सांडवोनु एकपण ॥१८॥

एक तेंचि अनेक । अनेक तेंचि एक ।

हेंही केलें निष्टंक । स्वबोधें देख बोधोनी ॥१९॥

बोधोनियां निज‍ऐक्यता । ऐक्यें लाविलें भक्तिपंथा ।

मज प्रवर्तविलें श्रीभागवता । निजकथा गावया ॥२०॥

तेचि श्रीभागवतींची कथा । दशमाध्यावो संपतां ।

ते बद्धमुक्तांची व्यवस्था । उद्धवें कृष्णनाथा पूसिली ॥२१॥

सखोल उद्धवाचा प्रश्न । ऐकोनियां श्रीकृष्ण ।

निजहृदयींचें गुह्यज्ञान । उद्धवासी जाण सांगेल ॥२२॥

येणें प्रश्नोत्तरश्रवणें । उठे जन्ममरणांचे धरणें ।

संसाराचें खत फाडणें । फिंटलें लाहणें विषयांचें ॥२३॥

मोक्षमार्गींचे कापडी । साधनीं शिणती बापुडीं ।

तिहीं शीघ्र यावें तांतडी । जिणावया वोढी बंधमोक्षांच्या ॥२४॥

जे कष्टती जपतपसाधनें । शिणती ध्येयध्यानअनुष्ठानें ।

ते ते शीघ्र या विंदानें । ज्ञानाज्ञानें जिणावया ॥२५॥

ऐशी कथा आहे गहन । श्रोतीं व्हावें सावधान ।

एका विनवी जनार्दन । स्वानंदघन तुष्टला ॥२६॥

अकरावे अध्यायीं जाण । इतुकें सांगेल श्रीकृष्ण ।

बद्धमुक्तांचें वैलक्षण्य । आणिक लक्षण साधूचें ॥२७॥

तेणेंच प्रसंगें जाण । सांगेल भक्तीचें लक्षण ।

अकराही पूजेसी अधिष्ठान । इतुकें निरूपण हरि बोले ॥२८॥