श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ६ वा

सुपर्णावेतौ सदृशौ सखायौ यदृच्छयैतौ कृतनीडौ च वृक्षे ।

एकस्तयोः खादति पिप्पलान्नम् अन्यो निरन्नोऽपि बलेन भूयान् ॥६॥

सुपर्ण म्हणता पक्षी । ये वृक्षींचा जाय ते वृक्षीं ।

तैसा देही देहांतरातें लक्षी । यालागीं पक्षी म्हणिजेत ॥५९॥

पक्ष्यांच्या ऐसियाच गती । हा देह सांडूनि त्या देहा जाती ।

पक्षी म्हणावया हे उपपत्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥१६०॥

एवं आत्मा देहाहूनि भिन्न । तें सांगितलें उपलक्षण ।

देहात्मवादाचें खंडन । प्रसंगी जाण दाखविलें ॥६१॥

आत्मा देह सर्वथा न घडे । देहबुद्धी धरणें तें तंव कुडें ।

हें उद्धवासी फाडोवाडें । निजनिवाडें दावित ॥६२॥

देहबुद्धीचिया पोटी । जन्ममरणांचिया कोटी ।

स्वर्गनरकांची आटाटी । देहबुद्धि गांठी जीवशिवपणें ॥६३॥

दोघेही चिद्रूपें सारिखे । कधी नोहे अनासारिखे ।

अनादि हे दोघे सखे । अतिनेटके जिवलग ॥६४॥

काळें अकाळें सकाळें । नव्हती येरयेरांवेगळे ।

एकत्र वर्तती खेळेमेळें । निजप्रांजळें सख्यत्वें ॥६५॥

प्रभा दीपु दवडीना वेगळा । दीपु प्रभेसी नव्हे निराळा ।

तेवीं जीवशिवांचा मेळा । एकत्र स्वलीळा नांदती स्वयें ॥६६॥

जीवु इच्छी जें जें कांहीं । तें तें वासनेसरिसें पाहीं ।

ईश्वर पुरवी सर्वही । विमुख कांही हों नेणें ॥६७॥

अंतकाळीं जें जीव मागे । तें अलोट ईश्वर देवों लागे ।

आणि ईश्वर‍आज्ञेचेनि योगें । जीवु सर्वांगें वर्तत ॥६८॥

ईश्वरआज्ञा त्रिशुद्धी । जीवें जीव सर्वस्वें वंदी ।

होय नव्हे न म्हणे कधीं । अभिनव सिद्धी सखेपणाची ॥६९॥

नवल सख्यत्वाची परी । ईश्वर जैसें जैसें प्रेरी ।

जीवु तैसें तैसें करी । निमेषभरी ढळेना ॥१७०॥

निमेष आंरभोनि जन्मवरी । जीवु ईश्वराची आज्ञा करी ।

ईश्वरु जीवाचा साहाकारी । परस्परीं निजसख्ये ॥७१॥

अत्यंत अडलेपणें । ईश्वरासी धांव धांव म्हणे ।

तो तत्काळ पावे धांवणें । करी सोडवणें जीवाचें ॥७२॥

एवं शिवाचे आज्ञे जीवु राहे । जीवपण गेलिया शिवीं समाये ।

जीवालागीं हा शिवपणा वाहे । येरवीं राहे सांडूनि ॥७३॥

ऐसें सखेपण यांचें । केवीं अनुवादवे वाचें ।

उद्धवा हें मीचि जाणें साचें । या सखेपणाचें सौजन्य ॥७४॥

जीव ईश्वराआधीन । हें दृढ केलें संस्थापन ।

अनीश्वरवादाचें खंडण । प्रसंगें जाण दाविलें ॥७५॥

अनीश्वरवादु खंडितां । खंडिली कर्मपाखंडवार्ता ।

कर्मपाखंडाच्या मता । ईश्वरता न मानिती ॥७६॥

म्हणती चित्तधर्म ईश्वरासी । तंव चिद्‌रूपता स्थापूनि त्यासी ।

निराकारिलें चित्तधर्मासी । अनायासीं चिद्रूपें ॥७७॥

नानापरीचें अतिचिंतन । त्याचि नांव चित्त जाण ।

चित्तेंवीण निश्चळपण । तेंचि चैतन्य उद्धवा ॥७८॥

धर्माधर्म न विचारितां । म्हणती ईश्वरु मोक्षदाता ।

हे भक्तपाखंडी कथा । स्थापूनि चिद्रूपता निवारी ॥७९॥

टिळे माळा मुद्राधारणें । लावूनि संतांसीं निंदिलें जेणें ।

पाप राहटे भक्तपणें । त्यासी नारायणें नुद्धरिजे ॥१८०॥

अंतरींचें सर्व जाणता मी । यालागीं नांवें अंतर्यामी ।

तो शाब्दिकवचनधर्मी । चाळविला अधर्मी केवीं जाये ॥८१॥

मी ज्ञानस्वरूप तत्त्वतां । सर्वद्रष्टा सर्वज्ञाता ।

तो मी धर्माधर्म न विचारतां । मोक्षदाता हें न घडे ॥८२॥

धरोनियां भक्तभावो । पाप राहाटे जो स्वयमेवो ।

याचि नामीं दांभिक पहा हो । त्यातें देवो नुद्धरी ॥८३॥

सदृशौ आणि सखायौ । धरोनि या पदांचा अन्वयो ।

पाखंडमात्रातें पहा हो । स्वयें देवो उच्छेदी ॥८४॥

निरसोनि नाना मतांतरें । स्वमत करावया खरें ।

श्लोकींचीं पदें अतिगंभीरें । शारङ्गधरें वर्णिलीं ॥८५॥

ते दोनी मिळोनियां पक्षी । नीड केलें देहवृक्षीं ।

वृक्ष म्हणिजे कोणे पक्षीं । तीहीं लक्षीं लक्षणें ॥८६॥

जननीउदर तेंचि आळ । पित्याचें रेत बीज सकळ ।

गर्भाधान पेरणी केवळ । संकल्पजळ वृद्धीसी ॥८७॥

सोहंभावाचा गुरू अंकुरु । त्रिगुणभूमीं तिवना डीरु ।

कोहंभावें वाढला थोरू । वृक्ष साकारू तेणें जाला ॥८८॥

करचरणादि नाना शाखा । प्रबळबळें वाढल्या देखा ।

अधऊर्ध्व नखशिखा । वृक्षाचा निका विस्तारू ॥८९॥

तया देहबुद्धीचीं दृढ मूळें । विकल्प-पारंब्या तेणें मेळें ।

भूमी रुतल्या प्रबळबळें । कामाचे कोंवळे फुटती कोंब ॥१९०॥

तेथ कर्मांचीं पानें । निबिड दाटलीं अतिगहनें ।

मोहममतेचे घोंस तेणें । सलोभपणें दाटले ॥९१॥

ज्या उंचावल्या थोर शाखा । त्या फळीं फळोनि सुखदुःखां ।

उतरल्या जी अधोमुखा । अधःपतनें देखा लोळती ॥९२॥

ऐशिया वृक्षामाजीं जाण । अतिगूढ गुप्त गहन ।

नीड केलें हृदयस्थान । जीवशिव आपण बैसावया ॥९३॥

जेथ जीवपरमात्मा वसती । तरी देहाची जाली सत्य प्राप्ती ।

ऐसें कोणी कोणी म्हणती । तें मत श्रीपति निराकारी ॥९४॥

पुरुषासवें लटकी छाया । तोडितां मोडितां नाडळे घाया ।

तैसी अनिर्वचनीय माझी माया । तेणें यदृच्छाया नीड केलें ॥९५॥

जेवीं स्वप्नगृहाचारु निद्रिता । तेवीं जीवात्मा नीडीं वसता ।

हें मायामय सर्वथा । नव्हे वस्तुतां साचार ॥९६॥

येणें निरूपणें गोविंदू । नैयायिक मताचा कंदू ।

समूळ केला त्याचा उच्छेदु । देहसंबंधू मिथ्यात्वें ॥९७॥

ऐसियाही या वृक्षासी । जन्मादि निमेषोन्मेषीं ।

काळु छेदीतसे अहर्निशीं । बाळादि वयसांसी छेदकू ॥९८॥

तया वृक्षाचीं फळें । तुरटें तिखटें तोंडाळें ।

पक्के अपक्के सकळें । ज्यांसी पिप्पलें म्हणताति ॥९९॥

त्या दों पक्ष्यांमाजीं तत्त्वतां । जो जीवपणें बोलिजेता ।

तो या कर्मफळांचा भोक्ता । जीं नाना व्यथादायकें ॥२००॥

जीं फळें खातां पोट न भरे । खादल्या दारुण दुर्जरें ।

जेणें भवचक्रीं पडोनि फिरे । तरी अत्यादरें सेवितू ॥१॥

दुजा फळें खातां खुणा वारी । जीवासी त्या फळाची गोडी भारी ।

अखंड जाहला फळाहारी । वारिलें न करी शिवाचें ॥२॥

फळें सेविता अहर्निशीं । तिळभरी शक्ति नाहीं जीवासी ।

अशक्त देखोनियां त्यासी । काळ पाशीं बांधितु ॥३॥

जो इयें सेवी कर्मफळें । तो तत्काळ बांधिजे काळें ।

दुजा कर्मफळा नातळे । त्यातें देखोनि पळे कळिकाळू ॥४॥

जो कर्मफळातें न सेवितू । तो ज्ञानशक्तीनें अधिक अनंतू ।

सदा परमानंदें तृप्तू । असे डुल्लतु स्वानंदें ॥५॥

उद्धवासी होय निजबोधू । यालागीं जीवशिवांचा भेदू ।

अत्यादरें सांगें गोविंदू । निजात्मबोधु प्रांजळु ॥६॥