श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ७ वा

आत्मानमन्यं च स वेद विद्वानपिप्पलादो न तु पिप्पलादः ।

योऽविद्यया युक् स तु नित्यबद्धो विद्यामयो यः स तु नित्यमुक्तः ॥७॥

जो कर्मफळातें न सेविता । जो स्वरूपाचा जाणता ।

द्रष्टा हे प्रपंचांचा तत्त्वतां । अलिप्तता निजज्ञानें ॥७॥

जीवु प्रपंचाचा ज्ञाता । परी परमात्मा नेणे तत्त्वतां ।

यालागीं भोगी भवव्यथा । कर्मफळें खातां अतिबद्धु ॥८॥

जो कर्मफळें सेवी बापुडा । तो अंधपंगु जाहला वेडा ।

मी कोण हें नेणे फुडा । पडिला खोडां देहाचे ॥९॥

देहसंबंधाआंतु । प्रतिपदीं होय आत्मघातू ।

नाहीं जन्ममरणांसी अंतू । दुःखी होतु अतिदुःखें ॥२१०॥

नश्वर विषयांचा छंदू । तेणें जीवु जाहला अतिबद्धू ।

हा अविद्येचा संबंधू । लागला सुबद्धु देहवंतां ॥११॥

जितुकी विषयाची अवस्था । तितुकी जीवासी नित्यबद्धता ।

जो विषयातीत सर्वथा । नित्यमुक्तता ते ठायीं ॥१२॥

जो विद्याप्राधान्यें नित्यमुक्तु । जो ज्ञानशक्तीनें शक्तिमंतु ।

सर्वव्यापकू सर्वीं अलिप्तु । तो नित्यमुक्तु बोलिजे ॥१३॥

सांगितली जीवाची नित्यबद्धता । प्रगट केली शिवाची मुक्तता ।

जीवाची जे बद्धमुक्तता । तेही आतां सांगतू ॥१४॥

उद्धवाप्रती श्रीकृष्ण । बद्धमुक्तांचें लक्षण ।

दोघांचीही ऊणखूण । विचित्र जाण सांगेल ॥१५॥