श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक १२ वा

न तथा बध्यते विदद्वांस्तत्र तत्रादयन् गुणान् ।

प्रकृतिस्थोऽप्यसंसक्तो यथा खं सवितानिलः ॥१२॥

जिंहीं इंद्रियीं कर्म करितां । मूर्खासी जाली दृढ बद्धता ।

तिंहीं इंद्रियीं वर्ततां ज्ञाता । नित्यमुक्तता अनिवार ॥९४॥

मूर्खासी कर्मीं अभिमान । ज्ञाता सर्व कर्मीं निरभिमान ।

बंधमोक्षाचें कारण । अहंकारू जाण जीवांसी ॥९५॥

अहं कर्ता अहं भोक्ता । हेचि मूर्खाची दृढ बद्धता ।

तें प्रकृतिकर्म आपुले माथां । नेघे ज्ञाता अभिमानें ॥९६॥

तेचि ज्ञात्याची निरभिमानता । तुज म्यां सांगितली आतां ।

इंद्रियां विषयो भोगवितां । आपुली अभोक्तृता तो जाणे ॥९७॥

आपुली छाया विष्ठेवरी पडे । अथवा पालखीमाजीं चढे ।

तो भोगु आपणियां न घडे । तैसेंचि देह कोरडे मुक्तासी ॥९८॥

मज होआवी विषयप्राप्ती । हेंही ज्ञाते न वांछिती ।

विषय मिथ्यात्वें देखती । जेवीं कां संपत्ती चित्रींची ॥९९॥

यालागीं असोनियां देहीं । तो नित्यमुक्त विदेही ।

ज्यासी प्रकृतिगुणांच्या ठायीं । अभिमानु नाहीं सर्वथा ॥४००॥

म्हणसी असोनियां देहीं । कोण्या हेतु तो विदेही ।

उद्धवा ऐसें कल्पिसी कांहीं । तो दृष्टांतु पाहीं सांगेन ॥१॥

आकाश सर्वांमाजीं असे । सर्व पदार्थीं लागलें दिसे ।

परी एकेंही पदार्थदोषें । मलिन कैसें हों नेणे ॥२॥

त्या गगनाचेपरी पाहीं । ज्ञाता असोनियां देहीं ।

देहकर्माच्या ठायीं । अलिप्त पाहीं सर्वदा ॥३॥

प्रचंड आणोनि पाषाणीं । आकाश न चेंपे चेंपणीं ।

तेवीं क्षोभलियाही प्रकृतिगुणीं । ज्ञाता जडपणीं न बंधवे ॥४॥

आकाश असोनियां जनीं । कदा रुळेना जनघसणीं ।

तैसा प्रकृतिकर्मी वर्तोनी । प्रकृतिगुणीं अलिप्त ॥५॥

गगन जळीं बुडालें दिसे । परी तें जळामाजीं कोरडें असे ।

तेवीं पुत्रकलत्रीं ज्ञाता वसे । तेणें दोषें अलिप्त ॥६॥

आकाशा मसी लावूं जातां । मसीं माखे तो लाविता ।

तेवीं मुक्तासी दोषी म्हणतां । दोष सर्वथा म्हणत्यासी ॥७॥

शीत उष्ण पर्जन्यधारा । अंगीं न लागती अंबरा ।

तेवीं नाना द्वंद्वसंभारा । मुक्ताचा उभारा निर्द्वंद्व ॥८॥

येऊनि नाना मेघपटळें । विगडगर्जनें गगन झांकोळे ।

त्यामाजीं असोनिया वेगळें । गगन नातळे मेघातें ॥९॥

तेवीं मोहममतेच्या कडाडी । मुक्तासी करिती ताडातोडी ।

ते तंव त्यास न लगे वोढी । परापरथडी अलिप्तु ॥४१०॥

गगनासी आगी लावूं जातां । अग्नि विझोनि जाय सर्वथा ।

तेवीं त्रिगुणीं मुक्तासी बांधतां । गुणीं सगुणता निमाली ॥११॥

प्रळयवायूचेनि झडाडें । आकाश निजस्वभावें नुडे ।

सगळा वायू गगनीं बुडे । पाहतां नातुडे गगनींही ॥१२॥

तेवीं अविद्या निजस्वभावतां । मुक्तासी न करवेचि बद्धता ।

अविद्या नांवें मिथ्या वार्ता । मुक्त तत्त्वतां देखेना ॥१३॥

गगनाच्या ऐसी अलिप्तता । सर्व कर्मीं वर्ते तो ज्ञाता ।

जनीं अलिप्त वर्ते सविता । तेवीं मुक्तता अवधारीं ॥१४॥

घृतमद्यजळांआंतौता । बिंबोनि अलिप्त सविता ।

तेवीं बाल्य तारुण्य वृद्धता । वयसा चाळितां अलिप्त ॥१५॥

नातरी सूर्याचेनि प्रकाशें । शुभाशुभ कर्म वाढलें असे ।

सविता अलिप्त तेणें दोषें । निजप्रकाशें प्रकाशकू ॥१६॥

तेवीं आश्रमधर्मीं असतां । नित्यादि कर्में आचरितां ।

मुक्तासी नाहीं कर्मबद्धता । अकर्तात्मता निजबोधें ॥१७॥

सूर्यकांतीं सविता । अग्नि उपजवूनि अकर्ता ।

तैसा निजतत्त्वाचा ज्ञाता । करोनि अकर्ता कर्मांचा ॥१८॥

जळीं सविता प्रतिबिंबला । परी तो नाहीं वोला झाला ।

तैसा स्त्रीसंगें प्रजा व्याला । नाही मुकला ब्रह्मचर्या ॥१९॥

सवित्याचें अलिप्तपण । तें निरूपिलें निरूपण ।

आतां देहीं असोनि अलिप्तपण । तेंही लक्षण अवधारीं ॥४२०॥

जेवीं देहामाजीं असे प्राण । प्राणास्तव देहचलन ।

देहदोषा नातळे प्राण । अलिप्त जाण सुखदुःखां ॥२१॥

तैसा मुक्त असोनि संसारी । संसारव्यवहार सर्व करी ।

परी संसारदोषु अंगावरी । तिळुहीभरी लागेना ॥२२॥

वायु सर्वांतें स्पर्शतु । परी स्पर्शदोषांसी अलिप्तु ।

तेवीं अहंममता नातळतु । मुक्त वर्ततु देहगेहीं ॥२३॥

वायूसी जेवीं सर्वत्र गमन । परी कोठेंही आसक्त नव्हे जाण ।

तेवीं विषयी नहोनि आपण । विषयसेवन मुक्ताचें ॥२४॥

वायूसी एके ठायीं नाहीं वस्ती । मुक्तासी देहगेहीं नाहीं आसक्ती ।

वायूसी नभामाजीं विश्रांती । मुक्तासी गुणातीतीं विश्राम ॥२५॥

एवढें जें अगाधपण । तें मुक्ताचें मुक्तिकारण ।

उद्धवासी म्हणे श्रीकृष्ण । प्रथम जाण विवेकु ॥२६॥