श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक १३ वा

वैशारद्येक्षयासङ्ग शितया छिन्नसंशयः ।

प्रतिबुद्ध इव स्वप्नान् नानात्वाद् विनिवर्तते ॥१३॥

विवेंकें बुद्धि अतिसंपन्न । त्यासी उपजे नित्यानित्यज्ञान ।

परी तें खिरंगटलें असे जाण । वैराग्येंवीण वाढेना ॥२७॥

विवेकेंवीण वैराग्य गहन । तें केवळ आंधळें जाण ।

तेणें आपुलें निजात्मपतन । अंधकूपीं जाण तें पडे ॥२८॥

मातलें हातिरूं अंध । सैरा धांवे सुबद्ध ।

नेणें निजात्मपतनबाध । तेवीं वैराग्य मंद विवेकेंवीण ॥२९॥

जेथ विवेकवैराग्यसंयोग । तेथ नित्यसंग्रहो अनित्यत्याग ।

तेंचि सद्विद्यालक्षण खड्ग । झळकत चांग नैराश्यें ॥४३०॥

तेंचि गुरुवचनसाहाणेसी । लावूनि अतितीक्ष्ण केलें त्यासी ।

घायें छेदिलें संशयासी । संकल्पविकल्पेंसीं समूळ ॥३१॥

असंभावना विपरीतभावना । निःशेष तुटलिया वासना ।

निजस्वरूपीं तेव्हां जाणा । जागेपणा तो आला ॥३२॥

जो अविद्यालक्षण दीर्घ स्वप्न । नानात्वें भोगिता आपण ।

तो अद्वैतीं जागा जाला जाण । कृपा थापटन गुरुवचनें ॥३३॥

तेव्हां नानात्वासीं नाहीं ठावो । मी माझें हें झालें वावो ।

फिटला अविद्याभेद संदेहो । आत्मानुभवो तो भोगी ॥३४॥

जागा झाल्या स्वप्न भासे । परी तें मिथ्या झालें अनायासें ।

मुक्तासी जग तैसें दिसे । यालागीं तेणें दोषें अलिप्त ॥३५॥

एवं मुक्ताचें जें जें वर्तन । तें अलिप्तपणें ऐसें जाण ।

कथं वर्तते हा प्रश्न । प्रसंगें लक्षण सांगितलें ॥३६॥

कथं विहरेत् या प्रश्नाचें । उत्तर ऐकावया साचें ।

उदित मन उद्धवाचें । जाणोनि जीवींचें हरि बोले ॥३७॥