श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक १९ वा

गां दुग्धदोहामसतीं च भार्यां देहं पराधीनमसत्प्रजां च ।

वित्तं त्वतीर्थीकृतमङ्ग वाचं हीनां मया रक्षति दुःखदुःखी ॥१९॥

दुग्धाचिया लालुप्यता । भाकड गाय दोहूं जातां ।

शिंपीभरी दूध न ये हाता । हाणे लाता तत्काळ ॥५७॥

जे कुडी कुचर डेबरी । विषयमेळवणा अतिखाविरी ।

अधर्मशीळ लातिरी । सर्वांपरी अनाढ ॥५८॥

सुटली राजागारीं भरे । धर्मदंडें मागें न सरे ।

सद्‍बुद्धि धरितां न धरे । सैर चरे सुनाट ॥५९॥

जिचें कधीं नव्हे दुभतें । जे धरूं नेणे गर्भातें ।

पोषितां ऐसिये गायीतें । पावे दुःखातें पोषकु ॥५६०॥

गृहिणी लाभल्या गृहाचार । तो अनुकूळ स्त्री नसतां नर ।

अतिदुःखें दुखिया थोर । सदा करकर कपाळीं ॥६१॥

निंदा अवज्ञा हेळण । भ्रताराचें करी जाण ।

स्वयें भक्षी मिष्टान्न । हें असंतलक्षण स्त्रियांचे ॥६२॥

खातां जेवितां द्रव्य देतां । गोड गुळसी सर्वथा ।

धर्म देखोनि फोडी माथा । तेही सर्वथा असतीचि ॥६३॥

जे न विचारी पापपुण्य । कामाचारी धर्मशून्य ।

हें असतीचें लक्षण । उद्धवा जाण निश्चित ॥६४॥

असतीचिये संगतीं । कैंची होईल सुखप्राप्ती ।

अतिदुःखें दुःखी होती । जाण निश्चितीं ते नर ॥६५॥

ज्याचें देह पराधीन । तो जीवें जितां सदा दीन ।

पराधीना समाधान । नव्हे जाण कल्पांतीं ॥६६॥

सांडोनि आपली निजसत्ता । ज्यासी लागली पराधीनता ।

तो स्वप्नींही सुखाची वार्ता । न देखे सर्वथा निश्चित ॥६७॥

पर म्हणिजे माया जाण । जो झाला तिचे आधीन ।

त्यासी सुखाचें न दिसे स्वप्न । दुःख संपूर्ण सर्वदा ॥६८॥

पराधीनासी सुख । आहे म्हणे तो केवळ मूर्ख ।

सोलीव दुःखाचें दुःख । अवश्य देख पराधीना ॥६९॥

ऐक प्रजांचा विवेक । एक पुत्र एक लेंक ।

एक ते केवळ मूर्ख । दुःखदायक पितरांसी ॥५७०॥

जो नरकापासोनि तारी । जो पूर्वजांतें उद्धरी ।

जो मातापित्यांची भक्ति करी । अव्यभिचारी हरिरूपें ॥७१॥

जो सांडोनियां मातापिता । जाऊं नेणे अणिके तीर्था ।

त्याचेनि चरणतीर्थें पवित्रता । मानिती सर्वथा अनिवार ॥७२॥

जैसी रमा आणि नारायण । तैसी मातापिता मानी जाण ।

चढत्या आवडीं करी भजन । नुबगे मन सेवेसी ॥७३॥

जो अतिसत्त्वें सात्त्विकु । जो पितृवचनपाळकू ।

जाणे धर्माधर्मविवेकू । हा नैसर्गिकू स्वभावो ॥७४॥

जो मातापित्यांचे सेवेवरी । आपआपणियांते तारी ।

सकळ पूर्वजांतें उद्धरी । तो संसारीं सुपुत्र ॥७५॥

ऐसिया पुत्रासी प्रतिपाळितां । सुख पावे मातापिता ।

पूर्वजांतें उद्धरिता । स्वयें तरता पितृभक्तीं ॥७६॥

जालिया सुपुत्रसंतति । एवढी होय सुखप्राप्ती ।

आतां असत्प्रजांची स्थिती । ऐक तुजप्रती सांगेन ॥७७॥

मूळींचें पद ’असत्प्रज’ । त्यांचे वर्तणुकेची वोज ।

सांगतां अत्यंत निर्लज्ज । तेही मी तुज सांगेन ॥७८॥

पोटीं उपजले जे लेंक । त्यांची वर्तणुक ऐसी देख ।

आवडे कांता आणि कनक । उपेक्षिती निःशेख मातापिता ॥७९॥

जे कुडे कुचर कुलट । जे का अत्यंत शठ नष्ट ।

जे अनाचारी कर्मभ्रष्ट । अतिदुष्ट दुर्जन ॥५८०॥

त्यांसी भांडवल लटिक । लटकी द्यावी आणभाक ।

माता पिता ठकावीं देख । सात्त्विक लोक नाडावे ॥८१॥

आपण नरका जावें ते जाती । परी पूर्वज नेले अधोगती ।

ऐसियां प्रजांतें प्रतिपाळिती । ते दुःखी होती अतिदुःखें ॥८२॥

पोटामाजीं उठिला फोडू । त्यासी करितां न ये फाडू ।

तैसा असत्प्रजीं संसार कडू । दुःख दुर्वाडू भोगवी ॥८३॥

ऐसिया पुत्रांचें जितां दुःख । मेल्यापाठीं देती नरक ।

असत्प्रजांचें कवतिक । दुखें दुःख अनिवार ॥८४॥

गांठीं असोनियां धन । जो सत्पात्रीं न करी दान ।

तें सर्व दुःखाचें मूळ जाण । दुःख दारुण धनलोभ्या ॥८५॥

धन अर्जावया अनेक । उपाय अपाय करिती लोक ।

नाना क्लेश भोगोनि दुःख । द्रव्य देख सांचिलें ॥८६॥

प्रथम दुःख द्रव्य संचितां । दूसरें दुःख द्रव्य रक्षितां ।

स्त्रीपुत्र प्रवर्ते घाता । इतर कथा ते भिन्न ॥८७॥

सत्पात्रीं न करितां दान । जेणें रक्षिलें यक्षधन ।

तेथें दुःखबाहुल्यें उठी विघ्न । धर्मरक्षण तेथ नाहीं ॥८८॥

ऐसेंही धन गेलियापाठीं । अतिदुःखें भडका उठी ।

धनवंता जन्मसाटी । दुःखकोटी भोगिती ॥८९॥

येवोनियां नरदेहासी । अविकळ वाचा असे ज्यासी ।

जो नुच्चारी हरिनामासी । पाप त्यापाशीं खतेलें ॥५९०॥

पुरिले लोहा माती खाये । तें उपेगा न ये वायां जाये ।

तैसी नामेंवीण वाचा पाहें । वृथा जाये सर्वथा ॥९१॥

आसनध्यानपरिश्रम । न करूनि म्हणे जो राम राम ।

तेणें कोटि जन्मांचा हरे श्रम । उत्तमोत्तम ते वाणी ॥९२॥

जो नित्य जपे रामनाम । तो जाणावा मजचिसम ।

तेणेंचि केले सकळही नेम । पुरुषीं पुरुषोत्तम तो जाण ॥९३॥

चतुर्वर्णांमाजीं जो कोणी । अविश्रम रामू जपे वाणीं ।

तोचि पढियंता मजलागुनी । आन त्रिभुवनीं नावडे ॥९४॥

ऐसें रामनाम नावडे ज्यासी । तैं पापमुखरोग आला मुखासी ।

तो स्वयें मुकला निजसुखासी । आपआपणासी घातकु ॥९५॥

रामनामेंवीण जें तोंड । तें जाणावें चर्मकुंड ।

भीतरी जिव्हा तें चामखंड । असत्यकांड काटली ॥९६॥

हो कां हरिनामेंवीण जे वाणी । ते गलितकुष्ठे जाली कोढिणी ।

असत्यकुष्ठाचें गळे पाणी । उठी पोहणी निंदेची ॥९७॥

ऐसिये वाचेसी रोकडे । पडती अधर्माचे किडे ।

सुळबुळीत चहूंकडे । मागेंपुढें वळवळित ॥९८॥

ते वाचा होय ज्यासमोर । देखे तो पाठिमोरा ठाके नर ।

नाक झांकूनि म्हणे हरहर । लहान थोर थुंकिती ॥९९॥

ते वाचेची जे दुर्गंधी । मजही न सहावे त्रिशुद्धी ।

हे वाचा वाहे तो दुर्बुद्धी । अनर्थसिद्धि अतिदुःख ॥६००॥

सोलींव दुःखाचें अतिदुःख । त्या नराची वाचा देख ।

केवळ निरय तें त्याचें मुख । नामीं विन्मुख जे वाणी ॥१॥

हो कां वेदशास्त्रसंपन्न वाणी । करूनि निंदकू नामकीर्तनीं ।

तो पापी महापाप्याहूनी । त्याचेन अवनी अतिदुःखी ॥२॥

नामकीर्तनें धन्य वाणी । येचि अर्थी सारंगपाणी ।

प्रवर्तला निरूपणीं । विशद करूनी सांगावया ॥३॥