श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ३१ वा

अप्रमत्तो गभीरात्मा धृतिमाञ्जितषड्‍गुणः ।

अमानी मानदः कल्यो मैत्रः कारुणिकः कविः ॥३१॥

जंववरी वृत्तिशून्य नव्हे मन । तंववरी विश्वासे ना विचक्षण ।

वृत्तिरूपें सिंतरील जाण । यालागीं सावधान निजबोधें ॥७९॥

हां हो दुर्वासाऐसा सज्ञान । त्यासी क्षणक्षणा क्षोभवी मन ।

न विचारितां गुणागुण । शाप दारुण देवों धांवे ॥९८०॥

दुर्गंधा जन्मली मत्स्याचे पोटीं । पराशर नाडला तीसाठीं ।

नारद कौतुक पाहतां दिठी । केला गंगातटीं नारदी ॥८१॥

आपुली कन्या देखोनि गोमटी । मनक्षोभें भोगावया उठी ।

ब्रह्म धांवे सरस्वतीपाठीं । जो कां सृष्टिपितामहो ॥८२॥

या मनाऐसें नाडक । जगामाजीं नाहीं आणिक ।

छळछद्में नाडी ज्ञाते लोक । साधु घातक मनाचे ॥८३॥

म्हणाल मनेंवीण भोग घडे । तरी वृत्तीसी क्षोभु कां पां चढे ।

हे बोल बोलती ते सज्ञान वेडे । साधूसी नावडे हे गोष्टी ॥८४॥

अधिष्ठूनि सत्त्वगुण । सूक्ष्मरूपें वृत्ति जाण ।

ते क्षोभवूनियां मन । मी मुक्त म्हणोन विषयी करी ॥८५॥

मुक्ताभिमानें विषयासक्ती । हेचि मग क्षोभाची प्राप्ती ।

वृत्ति असोनियां मुक्ती । साधु न मानिती सर्वथा ॥८६॥

अतिनाटकी नाटक मन । मुक्तत्वें धरी अभिमान ।

त्याचें करावया निर्दळण । साधु सावधान निजबोधें ॥८७॥

मुखीं धरिल्या कृष्णसर्पासी । ढिलें करितां तो तत्काळ ग्रासी ।

मरे तंववरी आंवळावें त्यासी । तेवीं मनासी निर्दाळिती ॥८८॥

मन निर्दाळावे सावधानता । बोलिली ते हे साधुसंता ।

हा एकुणिसावा गुण सर्वथा । ऐक आतां विसावा ॥८९॥

वर्षाकाळीं जळबळें सरिता । आल्या समुद्र नुचंबळे श्लाघ्यता ।

उष्णकाळीं त्या न येतां । क्षोभोनि सर्वथा आटेना ॥९९०॥

तैसें जाहलिया समृद्धिधन । साधूचें उल्हासेना मन ।

सकळ जाऊनि जाल्या निर्धन । दीनवदन हों नेणें ॥९१॥

दिवसराती येतांजातां । प्रकाशें पालटेना सविता ।

तेवीं आल्यागेल्या नाना अवस्था । गंभीरता अक्षोभ्य ॥९२॥

कडकडीत विजेचे कल्लोळ । तेणें गगनासी नव्हे खळबळ ।

तैसा नाना ऊर्मींमाजीं निश्चळ । गांभीर्य केवळ त्या नांव ॥९३॥

हे संताची गंभीरता । विसांवा जीवशिवांसी तत्त्वतां ।

हे विसावी संताची अवस्था । धृतीची व्यवस्था अवधारीं ॥९४॥

मनबुद्ध्‍यादि इंद्रियें प्राण । निजधैर्यें धरोनि आपण ।

नित्य केलिया आत्मप्रवण । परतोनि जाण येवों नेदी ॥९५॥

स्वयंवरीं जिणोनि अरिरायासी । बळें आणिलें नोवरीसी ।

तो जाऊं नेदी आणिकापासी । तेवीं वृत्तीसी निजधैर्य ॥९६॥

वागुरें बांधिल्या मृगासी । पारधी जाऊं नेदी त्या वनासी ।

तेवीं धैर्यें आकळूनि मनासी । देहापाशीं येऊं नेदी ॥९७॥

देहासी नाना भोगसमृद्धी । वावूनियां गजस्कंधीं ।

ऐसें सुख होतां त्रिशुद्धी । मनासी देहबुद्धी धरूं नेदी ॥९८॥

प्रळयकाळाच्या कडकडाटीं । महाभूतां होतां आटाटी ।

तरी मनासी देहाची भेटी । धैर्यें जगजेठी होंचि नेदी ॥९९॥

तेथ काळाचेनि हटतटें । वृत्ति परब्रह्माचिये वाटे ।

लावूनियां नेटेंपाटें । चिन्मात्रपेठे विकिली ॥१०००॥

तेथ स्वानंदाचा ग्राहकु । तत्काळ भेटला नेटकु ।

त्यासी जीवेंसहित विवेकु । घालूनि आंखू संवसाटी केली ॥१॥

या नांव धृतीचें लक्षण । हा एकविसावा साधूचा गुण ।

आतां जिंतले जे षड्गुण । तेंही लक्षण अवधारीं ॥२॥

स्वानंदें तृप्त जाला । यालागीं क्षुधेसी मुकला ।

जगाचे जीवनीं निवाला । तृषा विसरला निःशेष ॥३॥

भोगितां निजात्मसुख । विसरला शोकदुःख ।

चिन्मात्रज्ञानें निष्टंक । त्यासंमुख मोहो न ये ॥४॥

तिहीं अवस्थां बाहिरा । वसिन्नला निजबोधवोंवरा ।

तेथें जरा जाली अतिजर्जरा । कांपत थरथरां पळाली ॥५॥

मिथ्या जालें कार्यकारण । देहाचें देहपणें नेदेखे भान ।

तंव मरणासीचि आलें मरण । काळाचें प्राशन तेणें केलें ॥६॥

यापरी गा हे षड्गुण । अनायासें जिंतोन ।

सुखें वर्तती साधुजन । हें लक्षण बाविसावें ॥७॥

आपुला स्वामी देखे सर्वां भूतीं । तेथें मान इच्छावा कवणाप्रती ।

मानाभिमान सांडिले निश्चितीं । अतिनम्र वृत्तीं वर्तणें ॥८॥

आधीं देहीं धरावा अभिमान । मग इच्छावा अतिसन्मान ।

तंव देहाचें खुंटलें भान । मानाभिमान बुडाले ॥९॥

या नांव गा अमानिता । हे तेविसावी लक्षंणता ।

साधु सन्मानाचा दाता । तेही कथा अवधारीं ॥१०१०॥

ब्रह्मादि मशकवरी । सर्वांतें वंदी शिरीं ।

एकनिष्ठता चराचरीं । बुद्धी दुसरी जाणेना ॥११॥

सर्व भूतीं स्वामी देखे । लोटांगणें घाली हरिखें ।

सुर नर खर हे नोळखे । अतिसंतोखें वंदीत ॥१२॥

नाना अलंकार घडिले गुणें । सोनें सोनेपणा नव्हेच उणें ।

तेवीं नामरूपांचे विंदाणें । पालटु मनें घेऊं नेणे ॥१३॥

साकरेची निंबोळी केली । परी ते कडूपणा नाहीं आली ।

तेवीं सूकरादि योनी जरी जाली । तरी नाहीं भंगली चित्सत्ता ॥१४॥

सागरीं नाना परींचे विक्राळ । जरी उठिले अनंत कल्लोळ ।

ते जेवीं गा केवळ जळ । तेवीं वस्तु सकळ भूतमात्रीं ॥१५॥

यापरी सकळ भूतां । साधु सन्मानातें देता ।

हे चोविसावी लक्षणता । परबोधकता ते ऐक ॥१६॥

जैसा भावो जैशी श्रद्धा । तैसतैशा करूं जाणे बोधा ।

ज्ञान पावोनि नव्हे मेधा । स्वरूपश्रद्धा प्रबोधी ॥१७॥

एक ज्ञान पावोनि जाहला पिसा । पडिला अव्यवस्थ ठसा ।

नोळखेचि सच्छिष्याची दशा । योग्य उपदेशा तो नव्हे ॥१८॥

एक ज्ञानआश्चर्यें कोंदला । विस्मयें तटस्थ होऊनि ठेला ।

काष्ठलोष्ठांचेपरी पडला । नाहीं उरला उपदेश ॥१९॥

एक ज्ञान पावोनि अतिकृपण । जीव गेलिया न बोले जाण ।

भेणेंभेणें धरोनि मौन । न बोले वचन सर्वथा ॥१०२०॥

ज्यासी धनकोडी जोडी जाहली । ते पुरूनि वरी दगड घाली ।

दान न देतां वृथा गेली । संपत्ति केली भुविसवती ॥२१॥

तैसें कष्टीं जोडूनि निजज्ञान । सत्पात्रीं न करीच दान ।

हें ज्ञात्याचें कृपणलक्षण । वंचकपण स्वभावें ॥२२॥

एक ज्ञान पावोनि सांगों जाये । उपदेशीं शिष्या बोधू नोहे ।

तें ज्ञान अबीज जाहलें पाहें । अंकुरां न लाहे सत्क्षेत्रीं ॥२३॥

सधन शिष्य करावया जाण । स्वयें प्रयत्‍न करी पूर्ण ।

आमुची दीक्षा अनुभव गहन । यापरी ज्ञान विकरां घाली ॥२४॥

जैसेनि प्रलोभे त्याचें मन । तैसें निरूपी निरूपण ।

अर्थस्वार्थें उपदेश पूर्ण । धनलोभें ज्ञान निर्वीर्य होये ॥२५॥

पेंवीं रिघालिया पाणी । त्या धान्याची नव्हे पेरणी ।

तेवीं धनलोभ रिघालिया ज्ञानीं । उपदेशें कोणी सुखी नव्हे ॥२६॥

शिष्य बोधेंवीण झुरे अंतरीं । गुरु गुरुपणें गुरगुरी ।

ते बोधकता नव्हे खरी । घरच्या घरीं चुकामुकी ॥२७॥

शब्दज्ञानें पारंगत । जो ब्रह्मानंदें सदा डुल्लत ।

शिष्यप्रबोधनीं समर्थ । तो मूर्तिमंत स्वरूप माझें ॥२८॥

हो कां मी जैसा अवतारधारी । तैसाचि तोही अवतारी ।

चिद्रत्‍नाच्या अलंकारी । अलंकारी कुसरीं सच्छिष्यां ॥२९॥

तो मी या शब्दकुसरीं । नांवाचीं अंतरें बाहेरीं ।

आंतुवटें निजनिर्धारीं । एके घरीं नांदत ॥१०३०॥

एकचि बहुतांतें उपदेशी । एकाची प्राप्ती सुटंक कैसी ।

एकें अज्ञानें जैसी तेसी । हा बोलू कोणासी म्हणाल ॥३१॥

कृषीवल पेरणी करी । भूमिपाडें पिकती घुमरी ।

अंकुरेना क्षितितळीं उखरीं । तें बीज निर्धारीं अतिशुद्ध ॥३२॥

भूमिचि सखर-निखर । बीज पावन गा साचार ।

भाविकीं उपदेशा विस्तर । विकल्पी नर सुनाट ॥३३॥

जो जैसा देखे अर्थ । तोचि बोधूनि करी परमार्थ ।

ऐसा परबोधनीं समर्थ । गुण विख्यात पंचविसावा ॥३४॥

साधुची मैत्री चोखट । वोळखी सर्वांसी जुनाट ।

सर्वांचा सखा श्रेष्ठ । सर्वांसकट सारिखा ॥३५॥

सुहृद सर्वांचा सोयरा । सर्वांचा जिवलगु खरा ।

होऊनि सर्वांहीबाहिरा । मित्राचारा चालवी ॥३६॥

सांगतां अपुली गुह्य गोष्टी । अळोंचावया वेगळा नुठी ।

आप्तभावें देखे सृष्टी । अवंचक पोटीं सर्वांसी ॥३७॥

क्षीरनीरांची मैत्री जैसी । भेद नाहीं मिळणीपाशीं ।

साधू सर्व जीव समरसी । अभेदभावेंसीं मित्रत्वें ॥३८॥

परम मैत्रीचा भावो देख । दुःख हिरोनि द्यावें सुख ।

साधू जीवांचें निरसोनि दुःख । परम सुख देतसे ॥३९॥

नवल मैत्रींचें महिमान । सखा सर्वांचा पुरातन ।

सर्वांसी नीच नवें सौजन्य । अवंचकपण सर्वदा ॥१०४०॥

बंधूहूनि मित्र अधिकु । पुत्राहूनि विश्वासिकु ।

तो मित्र जैं जाहला वंचकु । तैं केवळ ठकु तो जाणावां ॥४१॥

मनें धनें कर्तव्यता । ज्याची अनन्य अवंचकता ।

त्या नांव परम मित्रता । हे खूण तत्त्वतां जाणावी ॥४२॥

समूळ मैत्रीचें निरूपण । विशद सांगितलें जाण ।

हें सव्विसावें साधुलक्षण । कारुण्यपण तें ऐका ॥४३॥

प्रत्युपकार न वांछितां । मी कारुणिक हे नाहीं अहंता ।

ऐसेनि दीनदुःख निवारितां । कारुण्य सर्वथा त्या नांव ॥४४॥

रसपूजा धरोनि पोटीं । वैद्य वोखदांच्या सोडी गांठी ।

कां संभावना सूनि दिठी । सांगे गोठी पुराणिक ॥४५॥

ऐसी वर्तणूक सर्वथा । ते लागली विषयस्वार्था ।

साधूची नव्हे तैसी कथा । नैराश्यता दयाळू ॥४६॥

दयार्णवें द्रवली दृष्टी । तन मन धन वेंचूनि गांठी ।

अनाथावरी करुणा मोठी । उद्धरी संकटीं दीनातें ॥४७॥

जैसा कळवळा निजस्वार्था । त्याहून अधिक अनाथभूतां ।

तिये नांव परम कारुणिकता । जाण तत्त्वतां उद्धवा ॥४८॥

हें सत्ताविसावें लक्षण । साधूचें जाण संपूर्ण ।

कविपदाचें व्याख्यान । सावधान अवधारीं ॥४९॥

वेदशास्त्रांचा मथितार्थ । जाला करतळामळकवत ।

तैसाच ब्रह्मानंदें डुल्लत । कवि निश्चित या नांव ॥१०५०॥

उपनिषदांचा मथितार्थ । ज्याच्या मुखाची वास पाहत ।

परोक्षापरोक्ष ज्याचेनि सत्य । कवि विख्यात त्या नांव ॥५१॥

कवि या पदाचे व्याख्यानें । झालीं अठ्ठावीस लक्षणें ।

उरलीं दोनी अतिगहनें । तें दों श्लोकीं श्रीकृष्णें आदरिलें सांगों ॥५२॥