श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ३४ वा

मल्लिङ्ग मद्‍भक्तजन दर्शनस्पर्शनार्चनम् ।

परिचर्या स्तुतिः प्रह्व गुणकर्मानुकीर्तनम् ॥३४॥

नाना अवतार‍अनुक्रमा । शैवी वैष्णवी अतिउत्तमा ।

शास्त्रोक्त माझ्या प्रतिमा । तीर्थक्षेत्रीं महिमा विशेष ज्यांचा ॥ ८७॥

ज्या प्रतिमा देवीं प्रतिष्ठिलिया । ज्या नरकिन्नरीं संस्थापिलिया ।

ज्या स्वयें स्वयंभ प्रकटलिया । शास्त्रीं बोलिलिया गंडकी ॥८८॥

एकी भक्त‍अनुग्रहें आल्या । आसुरी निशाचरीं ज्या केल्या ।

आपुल्या घरीं पूजिल्या । भक्तीं करविल्या त्रैवर्णिकीं ॥८९॥

ऐशा माझ्या प्रतिमांची भेटी । पाहों धांवे उठाउठी ।

पूजा करावया पोटीं । आवडी मोठी उल्हासे ॥११९०॥

माझें स्वरूप ते माझे भक्त । मी तेचि ते माझे संत ।

त्यांचे भेटीलागी आर्तभूत । जैसें कृपणाचें चित्त धनालागीं ॥९१॥

माझ्या प्रतिमांहूनि अधिक । संतभजनीं अत्यंत हरिख ।

साधुसंगतीचें अतिसुख । सांडूनि देख घरदारां ॥९२॥

चिंतामणीसी कीजे जतन । तैसी मर्यादा राखे सज्जन ।

नीच नवें अधिक भजन । न धाये मन पूजितां ॥९३॥

सिद्ध करूनि पूजासंभार । माझे पूजेचा अत्यादर ।

पूजा करितां एकाग्र । जैं साधु नर घरा येती ॥९४॥

त्या सांधूची पूजा न करितां । जो माझी पूजा करी सर्वथा ।

तेणें मज हाणितल्या लाता । कीं तो माझ्या घाता प्रवर्तला ॥९५॥

बाळक एक एकुलता । त्यासी माथां हाणितल्या लाता ।

मग पाटोळाही नेसवितां । क्षोभली माता समजेना ॥९६॥

तेवीं अवगणुनी माझिया संतां । मीचि क्षोभें मज पूजितां ।

ते सेवा नव्हे सर्वथा । अतिक्षोभकता मज केली ॥९७॥

संत माझे लळेवाड । त्यांची पूजा मज लागे गोड ।

संतसेवकांचें मी पुरवीं कोड । मज निचाडा चाड संतांची ॥९८॥

सांडूनि माझें पूजाध्यान । जो संतांसी घाली लोटांगण ।

कोटि यज्ञांचें फळ जाण । मदर्पण तेणें केलें ॥९९॥

सकळ तीर्थी तोचि न्हाला । जपतपादिफळें तोचि लाहिला ।

सर्व पूजांचें सार तो पावला । जेणें साधू वंदिला सन्मानें ॥१२००॥

प्रतिमा माझ्या अचेतन व्यक्ती । संत सचेतन माझ्या मूर्ती ।

दृढ भावें केल्या त्यांची भक्ती । ते मज निश्चितीं पावली ॥१॥

केल्या प्रतिमा निजकल्पना उत्तम । संत प्रत्यक्ष पुरुषोत्तम ।

चालतेंबोलतें परब्रह्म । अतिउत्तम साधुसेवा ॥२॥

माझ्या प्रतिमा आणि साधुनर । तेथें या रीतीं भजती तत्पर ।

हा तंव सांगीतला निर्धार । भजनप्रकार तो ऐक ॥३॥

प्रतिमा आणि साधु सोज्ज्वळे । आवडीं न पाहती ज्यांचे डोळे ।

दृष्टि असोनि ते आंधळे । जाण केवळें मोरपिसें ॥४॥

जेवीं कां प्रिया पुत्र धन । देखोनियां सुखावती नयन ।

तैसें संतप्रतिमांचें दर्शन । आवडीं जाण जो करी ॥५॥

अतिउल्हासें जें दर्शन । या नांव गा देखणेपण ।

तेणें सार्थक नयन जाण । दृष्टीचें भजन या रीतीं ॥६॥

देखोनि संत माझीं रूपडीं । जो धांवोनियां लवडसवडी ।

खेंव देऊनियां आवडीं । मिठी न सोडी विस्मयें ॥७॥

ऐसें संतांचें आलिंगन । तेणें सर्वांग होय पावन ।

कां मूर्तिस्पर्शें जाण । शरीर पावन होतसे ॥८॥

तीर्थयात्रे न चालतां । संतांसमीप न वचतां ।

हरिरंगणीं न नाचतां । चरण सर्वथा निरर्थक ॥९॥

जो कां नाना विषयस्वार्था । न लाजे नीचापुढें पिलंगतां ।

तो हरिरंगणीं नाच म्हणतां । आला सर्वथा उठवण्या ॥१२१०॥

तीर्थयात्रा क्षेत्रगमनता । हरिकीर्तना जागरणा जातां ।

संतसमागमें चालतां । कां नृत्य करितां हरिरंगीं ॥११॥

या नांव गा सार्थक चरण । इतर संचार अधोगमन ।

चरणाचें पावनपण । या नांव जाण उद्धवा ॥१२॥

सर्वभावें अवंचन । कवडी धरूनि कोटी धन ।

जेणें केलें मदर्पण । माझें अर्चन या नांव ॥१३॥

धनधान्य वंचूनि गांठीं । माझी पूजा आहाच दृष्टीं ।

ते नव्हे अर्चनहातवटी । तो जाण कपटी मसजी पैं ॥१४॥

लोभें खावया आपण । ठेवी प्रतिमेपुढें पक्कान्न ।

अतीत आलिया न घाली कण । मदर्चन तें नव्हे ॥१५॥

कर पवित्र करितां पूजा । ते आवडती अधोक्षजा ।

जे न पूजिती गरुडध्वजा । त्या जाण भुजा प्रेताच्या ॥१६॥

न करितां हरिपूजनें । न देतां सत्पात्रीं दानें ।

जडित मुद्रा बाहुभूषणें । तें प्रेतासी लेणें लेवविलें ॥१७॥

वाचा सार्थक हरिकीर्तनें । कां अनिवार नामस्मरणें ।

जयजयकाराचेनि गर्जनें । केलीं त्रिभुवनें पावन ॥१८॥

रामनामाच्या गजरीं । सदा गर्जे ज्याची वैखरी ।

तेथ कळिकाळाची नुरे उरी । दुरितें दूरी पळाली ॥१९॥

हरिनाम सांडूनि करंटीं । मिथ्या करिताती चावटी ।

जेवीं हागवणी पटपटी । तैशा गोठी जल्पती ॥१२२०॥

हरिनामाचा सुखसुरवाड । ज्याचे मुखीं लागला गोड ।

त्याचें मजपाशीं सरतें तोंड । मी अखंड त्याजवळी ॥२१॥

गद्यपद्यें स्तवनमाळा । नाना पदबंधाची कळा ।

छंदें कुसरीं विचित्र लीळा । स्तुति गोपाळा अर्पावी ॥२२॥

धैर्य स्थैर्य औदार्य । घनश्याम अतिसौंदर्य ।

शौर्य वीर्य अतिमाधुर्य । गुणगांभीर्य गोविंदू ॥२३॥

त्रिविक्रम उभा बळीच्या द्वारीं । द्वार न सांडूनि द्वारकरी ।

तेणें द्वारें द्वारकेभीतरीं । येऊनि उद्धरी कुशातें ॥२४॥

तो अद्यपि श्रीहरि । स्वयें उभा समुद्रतीरीं ।

शोभा विराजमान साजिरी । असुरसुरनरीं वंदिजे ॥२५॥

मत्स्य झाला तो सागरीं । वराह झाला नासिकद्वारीं ।

उपजला खांबा माझारीं । यशोदेघरीं पोसणा ॥२६॥

जरठपाठी झाला कमठू । बळिच्छळणीं तो खुजटू ।

वेदवादें अतिवाजटू । फुरफुराटू निःश्वासें ॥२७॥

बाईल चोरीं नेली परदेसी । तीलागीं रडे पडे वनवासीं ।

एकही गुण नाहीं त्यापाशीं । शेखीं दासी कुब्जेसीं रातला ॥२८॥

स्तुतिगुणकर्मानुकीर्तन । तें या नांव गा तूं जाण ।

प्रह्व म्हणिजे तें नमन । तेंही व्याख्यान अवधारीं ॥२९॥

माझे प्रतिमांचें दर्शन । कां देखोनि संतजन ।

जो भावें घाली लोटांगण । देहाभिमान सांडूनि ॥१२३०॥

साधुजनांसी वंदितां । धणी न मनी जो चित्ता ।

पुनःपुन्हा चरणीं माथा । विनीततां अतिनम्र ॥३१॥

भागवताचें रजःकण । जो मस्तकीं वंदीना आपण ।

तो जीवें जीतां प्रेत जाण । अपवित्र तैसें तया ॥३२॥

सांडूनि लौकिकाच्या लाजा । जो वैष्णवांच्या चरणरजा ।

गडबडां लोळे वोजा । हा भक्तीचा माझा उल्हास ॥३३॥

या आवडीं करितां भजन । सहजें जाती मानाभिमान ।

हें मुख्य भक्तीचें लक्षण । जे मानाभिमान सांडावे ॥३४॥

त्यजावया मानाभिमान । करावें मत्कीर्तनश्रवण ।

श्रवणादि भक्तीचें लक्षण । ऐक संपूर्ण उद्धवा ॥३५॥