श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ४३ वा

सूर्ये तु विद्यया त्रय्या हविषाग्नौ यजेत माम् ।

आतिथ्येन तु विप्राग्र्ये गोष्वङ्ग यवसादिना ॥४३॥

सविता माझें अधिष्ठान । माझेनि तेजें विराजमान ।

जेणें तेजें जगाचे नयन । देखणे जाण होताती ॥३१॥

दीपु लाविल्या गृहाभीतरीं । तो प्रकाशु दिसे गवाक्षद्वारीं ।

तैसें माझें निजतेज अंतरीं । तें सूर्यद्वारीं प्रकाशे ॥३२॥

तो सविता मंडळमध्यवर्ती । जाण नारायण मी निश्चितीं ।

त्या मज सूर्याची उपास्ती । सौर सूक्ति त्रैविद्या ॥३३॥

ऋग्वेदादि वेद तीनी । साङ्ग सौरमंत्र जाणोनी ।

सूर्यसूक्तें संमुख पठणीं । पूजा सज्ञानीं करावी ॥३४॥

हे वैदिकी उपासकता । वेदज्ञांसीचि तत्त्वतां ।

नेणत्या योग्य नव्हे सविता । ऐसें सर्वथा न म्हणावें ॥३५॥

तत्काळ प्रसन्न होय सविता । ऐसी सुगम उपासकता ।

तुज सांगेन आतां । सावधानता अवधारीं ॥३६॥

सकळ वेदांची जननी । सकळ मंत्रांचा मुकुटमणी ।

ते गायत्री उत्तमवर्णी । सकळ ब्राह्मणीं जाणिजे ॥३७॥

तिचा अर्थ विचारितां । तीअधीन असे सविता ।

त्रिपदा त्रिकाळीं अर्घ्य देतां । त्रैविद्या तत्त्वतां त्या नांव ॥३८॥

अर्धमात्रा अर्धबिंबध्यान । त्रिपदा त्रिकाळीं अर्घ्यदान ।

तेणें संतोषे चिद्धन । आपणासमान भक्त करी ॥३९॥

हें प्रथम माझें अधिष्ठान । सूर्यपूजा याचि नांव जाण ।

आतां अग्निपूजेचें लक्षण । सांग संपूर्ण तें ऐक ॥१३४०॥

सर्वांगां मुख प्रधान । तें माझें मुख अग्नि जाण ।

ये अर्थी वेदशास्त्रपुराण । साक्षी संपूर्ण गर्जती ॥४१॥

ब्राह्मण माझे आवडते । माझे मुखीं होआवया सरते ।

म्यां लाविले अग्निसेवेतें । तेही तेथें चूकले ॥४२॥

घालूनि मजमुखीं अवदान । इंद्राय स्वाहा म्हणती जाण ।

कर्मकांडें ठकिले ब्राह्मण । शुद्ध मदर्पण चूकले ॥४३॥

केवळ मजमुखीं अर्पितां । आड आली त्यांची योग्यता ।

इंद्र यम वरुण सविता । नाना विकल्पता अवदानीं ॥४४॥

देवो देवी मीचि आहें । हेंही सत्य न मानिती पाहें ।

मजवेगळा विनियोग होये । नवल काये सांगावें ॥४५॥

जें जें सेविजे तिहीं लोकीं । तें तें अर्पे माझ्या मुखीं ।

हें न मनिजे याज्ञिकीं । कर्माविखीं विकल्पू ॥४६॥

विकल्पबुद्धि ब्राह्मण । अद्यापि संशयीं पडिले जाण ।

करूनि वेदशास्त्रपठण । शुद्ध मदर्पण न बोलिती ॥४७॥

माझें मुख वैश्वानर । येणें भावें विनटले नर ।

सांडूनि भेद देवतांतर । मजचि साचार अर्पिती ॥४८॥

त्याचें समिधेनीं मन तृप्त झालें । तेथही जरी हविर्द्रव्य आलें ।

तरी माझें निजसुख सुखावलें । सर्वस्व आपुलें त्यांसी मी दें ॥४९॥

मज नैराश्यतेची आस । त्यांच्या हाताची मी पाहें वास ।

त्यांलागीं सदा सावकाश । अल्पही ग्रास जैं देती ॥१३५०॥

त्यांचेनि हातें निर्विकल्पें । मद्‍भावें जें अग्नीस अर्पे ।

तृण काष्ठ तिळ तुपें । तें म्यां चिद्‌रूपें सेविजे ॥५१॥

यापरी अग्नीची उपास्ती । जे दुजे स्थानींची पूजास्थिती ।

सांगीतली म्यां तुजप्रती । ब्राह्मणभक्ती अवधारीं ॥५२॥

पूजेमाजीं अतिश्रेष्ठ जाण । शीघ्र मत्प्राप्तीचें कारण ।

ब्राह्मण माझें पूजास्थान । अतिगहन उद्धवा ॥५३॥

त्यांचिया भजनाची नवलपरी । आड पडावें देखोनि दूरी ।

मस्तक ठेवावा चरणावरी । चरणरज शिरीं वंदावे ॥५४॥

आवाहनविसर्जनेंवीण । शालिग्राम माझें अधिष्ठान ।

परी तें केवळ अचेतन । ब्राह्मण सचेतन मद्‌रूपें ॥५५॥

मी अव्यक्तरूप जनार्दन । तो मी व्यक्त ब्राह्मणरूपे जाण ।

धरातळीं असें मी नारायण । धरामर ब्राह्मण यालागीं ॥५६॥

ब्राह्मणमुखें वेदांसी महिमा । ब्राह्मणें यज्ञदानतपतीर्थगरिमा ।

ब्राह्मणें वेदासी परम प्रेमा । ब्रह्मत्व ब्रह्मा ब्राह्मणमुखें ॥५७॥

त्या ब्राह्मणांसी अपमानितां । अपमानिल्या यज्ञदेवता ।

वेदादि तपदानतीर्था । परब्रह्म तत्त्वतां अपमानिलें ॥५८॥

मज त्रिलोकीं नाहीं सांठवण । मजहूनि अधिक माझे ब्राह्मण ।

त्यामाजीं मी वेदरूप नारायण । सगळा जाण सांठवलों ॥५९॥

ब्राह्मणपद हृदयीं धरितां । मज आली परम पवित्रता ।

लक्ष्मी पायां लागे उपेक्षितां । चरणतीर्थ माथां शिवू धरी ॥१३६०॥

यालागीं ब्राह्मण पूज्य जाण । अंगें मी करीं चरणक्षालन ।

त्यांचें उच्छिष्ट मी काढीं आपण । पाड कोण इतरांचा ॥६१॥

मुख्य माझें अधिष्ठान । सर्वोपचारपूजास्थान ।

दान मान मिष्टान्न । विधिपूजन विप्रांचें ॥६२॥

एका नेमू शालिग्रामाचा । एका स्थावर लिंगाचा ।

एका नेमू गणेशाचा । एका सूर्याचा दर्शननेमू ॥६३॥

एका नेमू तुळसीचा । एका बांधिल्या अनंताचा ।

नित्य नेम ब्राह्मणाचा । सभाग्य तो भाग्याचा दुर्लभ ॥६४॥

नित्य नेमस्त द्विजपूजा । षोडशोपचार करी वोजा ।

माझे भक्तीचा तो राजा । आत्मा माझा तो एकू ॥६५॥

जो देवतांतरा नुपासित । जीवेंभावें ब्राह्मणभक्त ।

त्याचा चुकवूनियां अनर्थ । निजस्वार्थ मी कर्ता ॥६६॥

ऐसे जे ब्राह्मणभक्त । त्यांच्या पायीं पृथ्वी पुनीत ।

गंगा चरणतीर्थ वांछित । शिरीं वंदीत मी त्यांसी ॥६७॥

त्यांचे सेवेचा सेवक । मोलेंवीण मी झालों देख ।

ब्राह्मणसेवेचें मज सुख । अलोकिक अनिवार ॥६८॥

नित्यनेम द्विजपूजा । करी तो आवडे अधोक्षजा ।

त्यालागीं पसरूनि चारी भुजा । आलिंगनीं माजा जीव निवे ॥६९॥

ब्राह्मणांच्या स्नानप्रवाहतळीं । जेणें भावार्थें केली आंघोळी ।

कोटि अवभृथें पायांतळीं । तेणें तत्काळीं घातलीं ॥१३७०॥

ब्राह्मणचरणतीर्थ देखतां । पळ सुटे दोषदुरिता ।

तें भावार्थें तीर्थ घेतां । दोष सर्वथा निमाले ॥७१॥

जो कोणी नित्य नेमस्त । सेवी ब्राह्मणाचें चरणतीर्थ ।

तो स्वयें झाला तीर्थभूत । त्याचेनि पुनीत जड जीव ॥७२॥

त्या ब्राह्मणाचे ठायीं जाण । अभ्यंगादि सुमन चंदन ।

आसन भोजन धन धान्य । शक्तिप्रमाण पूजेसी ॥७३॥

ब्राह्मणासी प्रिय भोजन । दानीं श्रेष्ठ अन्नदान ।

निपजवूनियां मिष्टान्न । द्यावें भोजन मद्‍भावें ॥७४॥

एक हेळसूनि देती अन्न । एक उबगल्यासाठीं जाण ।

एक देती निर्भर्त्सून । एक वसवसोन घालिती ॥७५॥

तैसें न करावें आपण । ब्राह्मण माझें स्वरूप जाण ।

त्यांसी देऊनियां सन्मान । द्यावें भोजन यथाशक्ति ॥७६॥

अज्ञान अतिथि आल्या समयीं । खोडी काढूं नये त्याच्या ठायीं ।

तोही माझें स्वरूप पाहीं । अन्न ते समयीं अर्पावें ॥७७॥

अतिथि जातां परङ्मुख । त्यासवें जाय पुण्य निःशेख ।

अन्न द्यावें समयीं आवश्यक । नातरी उदक तरी द्यावें ॥७८॥

ब्राह्मण बैसवूनि पंक्ती । जे कोणी पंक्तिभेद करिती ।

ते मोलें पाप विकत घेती । त्यांसी अधोगती निश्चितीं ॥७९॥

ब्राह्मणसेवेलागीं जाण । काया वाचा मन धन ।

यथासामर्थ्यें अवंचन । अतिथिपूजन त्या नांव ॥१३८०॥

त्रिपदाजपें पवित्र पूर्ण । यालागीं वेदांचें निवासस्थान ।

ब्राह्मण माझें स्वरूप जाण । श्रेष्ठ अधिष्ठान पूजेचें ॥८१॥

ब्राह्मणआज्ञेलागीं जाण । अतिसादर ज्याचें मन ।

देणें देववणें दान । श्रद्धा संपूर्ण या नांव ॥८२॥

ब्राह्मणसेवा धनेंवीण । सर्वथा न घडे ऐसें न म्हण ।

सेवेसी श्रद्धा प्रमाण । उल्हास पूर्ण भजनाचा ॥८३॥

एकाची शरीरसेवा जाण । एकाचे वाचिक पूजन ।

एकाचें मानसिक भजन । दया पूर्ण द्विजाची ॥८४॥

ब्राह्मणभक्तिलागीं जाण । हर्षनिर्भर अंतःकरण ।

श्रद्धायुक्त उल्हासपूर्ण । आतिथ्य जाण या नांव ॥८५॥

यापरी ब्राह्मणभजन । तिसरे पूजेचें अधिष्ठान ।

हें सांगितलें जाण । गोशुश्रूषण तें एक ॥८६॥

जे गायीच्या कैवारा । घायें सहस्त्रबाहो केला पुरा ।

तीन सप्तकें वसुंधरा । मुख्य धुरा म्यां मारिल्या ॥८७॥

रामावतारीं अतिमहिमान । तैं न घडेचि गोषुश्रूषण ।

यालागीं गोकुळीं जाण । गायींचें सेवन म्यां केलें ॥८८॥

गायीचे सेवें झाली पुष्टी । बाळपणीं मारिले जेठी ।

कंस चाणूर मारिले हटी । बैसविला राज्यपटीं उग्रसेन ॥८९॥

गायीचे सेवेची अतिगोडी । तेणें माझी कीर्ति झाली चोखडी ।

फोडिली कंसाची बांदवडी । तोडिली बेडी पितरांची ॥१३९०॥

यालागीं गायीं आणि ब्राह्मण । माझा जाण जीवप्राण ।

माझे पूजेचें अधिष्ठान । सुलभ जाण इयें दोन्ही ॥९१॥

आपत्काळीं गोरक्षण । करी तो पढियंता मज जाण ।

त्यासवें मी आपण । गोरक्षण करीतसें ॥९२॥

गायीचे सेवेचें विधान । गोग्रास द्यावा जे तृण ।

करावें अंगकुरवाळण । इतुकेनि प्रसन्न मी होयें ॥९३॥

निर्लोभ गायीची सेवा । करितां माझी प्राप्ति उद्धवा ।

ऐक वैष्णवाची सेवा । पूजा सद्‍भावा विभागू ॥९४॥