श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ४५ वा

स्थण्डिले मंत्रहृदयैर्भोगैरात्मानमात्मनि ।

क्षेत्रज्ञं सर्वभूतेषु समत्वेन यजेत माम् ॥४५॥

जळामाजीं धरा अधर । विरोनि हों पाहे तें नीर ।

तीमाजीं मी प्रवेशलों धराधर । अधर ते सधर तेणें झाली ॥२८॥

यालागीं पृथ्वी माझें पूजास्थान । ऐक पूजेचें विधान ।

गोसदृश स्थंडिलीं जाण । आवाहन पैं माझें ॥२९॥

गोसदृश स्थंडिलीं कां म्हणसी । पृथ्वी आहे गायीच्या ऐसी ।

जैं पूजा करावी पडे तिसी । तैं तदाकारेंसी स्थंडिल ॥१४३०॥

ते स्थंडिलीं पूजावया धरा । आवाहन करावें धराधरा ।

तल्लिंग हृदयमंत्रा । मंत्रद्वारा पूजावी ॥३१॥

हृदय कवच शिखा नेत्र । शक्तिबीज मंत्रास्त्र ।

स्थंडिलीं रेखूनियां यंत्र । धराधरमहापूजा ॥३२॥

यापरी पृथ्वीपूजन । साङ्ग सांगीतलें जाण ।

आपुलें आपण पूजास्थान । दहावें लक्षण तें ऐक ॥३३॥

आधीं एक पुढें पूर्ण । त्या नांव दहावें लक्षण ।

आपलें आपण पूजास्थान । विचित्र विंदान पूजेचें ॥३४॥

पूज्यापुढें पूज्यकोटी । केल्या गणितासी पडे तुटी ।

पहिल्या पूज्यासी जैं फांटा उठी । तैं गणितसृष्टि असंख्य ॥३५॥

पूर्णासी फांटा काढिजे । त्या नांव एक म्हणिजे ।

एकपणेंही पूर्ण असिजे । सहज निजें परिपूर्ण ॥३६॥

पूर्णापुढें पूर्ण पडे । तैं गणित काय आतुडे ।

जैं निचाडा चाड वाढे । तैं निजनिवाडें निजपूजा ॥३७॥

एकासी एक मेळविजे । तैं दोनीपणें होय दुजें ।

जैं एकें एक भागिजे । तैं देखिजे निजपूज्यत्व ॥३८॥

आपणचि आपला देवो । आपुला पूजक आपण पहा वो ।

आपुला आपणचि भावो । नवल नवलावो पूजेचा ॥३९॥

हृदयीं भावूनि चैतन्यघन । स्वयें तद्‌रूप होऊनि जाण ।

मग जे जे भोग भोगी आपण । ब्रह्मार्पण सहजेंचि ॥१४४०॥

तो ग्रास घाली स्वमुखीं । तेणें मुखें मी होय सुखी ।

तृप्ति उपजे परमपुरुखीं । पूजा नेटकी हे माझी ॥४१॥

तो जे जे कांहीं भोग भोगी । ते अर्पती मजचिलागीं ।

मी रंगलों त्याचे रंगीं । पावे श्रीरंगीं ते पूजा ॥४२॥

मुख्य पूजेमाजीं हे माझी पूजा । तेणेंचि पूजिलें मज अतिवोजा ।

पूजामिसें गरुडध्वजा । वश अधोक्षजा तेणें केलें ॥४३॥

हे आवडती माझी पूजा । अत्यंत प्रिय अधोक्षजा ।

हे भक्ति पढिये गरुडध्वजा । जाण तो माझा प्रिय भक्त ॥४४॥

हो कां सगुण अथवा निर्गुण । दोहीं रूपें मीचि जाण ।

तेथ जो करी निजभोग अर्पण । शुद्ध पूजन तें माझें ॥४५॥

निजात्मभोगीं अधोक्षजा । पूजिजे ते हे जाण पूजा ।

सर्व भूतांतें पूजिजे वोजा । समसाम्य समजा समभावें ॥४६॥

अकरावे पूजेचा विवेक । मागां पुढां एकएक ।

अकरा इंद्रियां पडे आंख । तोचि पूजक सर्व भूतां ॥४७॥

मागां पुढां एकएक कीजे । त्या नांव एकादश म्हणिजे ।

हाचि विवेक जेणें जाणिजे । तेणें पूजिजे सर्व भूतां ॥४८॥

आत्मभोग मदर्पणें पाहीं । वस्तू जाणितली स्वदेहीं ।

तेचि सर्व भूतांच्या ठायीं । देहींविदेहीं समसाम्यें ॥४९॥

सर्व क्षेत्रांतें वागविता । मी क्षेत्रज्ञु जाण तत्त्वतां ।

देखतांही विषम भूतां । ज्यासी माझी ममता मोडेना ॥१४५०॥

उंच नीच विषमता भूतां । वस्तूसी न देखे विषमता ।

समसाम्यें समान समता । सर्व भूतां समत्वें ॥५१॥

माझिया साम्यें सर्वसमता । तेचि पूजा सर्व भूतां ।

तोचि पूजक तत्त्वतां । ज्यासी विषमता बाधीना ॥५२॥

जो भावार्थें मजमाजीं आला । तैं सर्व भूतें तोचि झाला ।

सहजे समत्व पावला । पूजूं लागला आत्मत्वें ॥५३॥

पूजूं जाणे रंक रावो । परी पालटेना समभावो ।

न खंडितां समतेचा ठावो । यथायोग्य पहा हो पूजित ॥५४॥

ऐक यदुवंशध्वजा । सर्व भूतीं माझी पूजा ।

माझेनि समत्वें निपजे वोजा । या अकराही पूजा समत्वें ॥५५॥

इयें अकराही अधिष्ठानें । मत्प्राप्तिकरें अतिपावनें ।

म्यां सांगीतलेनि अनुसंधानें । पूजा करणें यथाविधि ॥५६॥

म्यां सांगीतलें ज्या निगुतीं । पूजा करावी त्याचि स्थिती ।

न कळे तरी माझी मूर्ती । सर्वांहीप्रती चिंतावी ॥५७॥