श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


आरंभ

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥

ॐ नमो सद्गुरु वसंतू । ऐक्यकाळीं तुझा ऋतू ।

तया ऋतुकाळींचा मारुतू । ज्ञानवनांतू जैं रिघे ॥१॥

तैं अविद्येचीं जुनीं पानें । गळूनि जाती तत्क्षणें ।

नव पल्लवीं विराजमानें । विरक्तपणें अनुरक्त ॥२॥

अत्यंत वैराग्याची हांव । खांकर झाले वृक्ष सर्व ।

त्यांसी निघाले नव पल्लव । अतिलवलव कोंवळिक ॥३॥

जाहल्या वसंताचें रिगवणें । वृक्ष आडवे फुटले तेणें ।

सोहंभावाचीं सुमनें । तेणें गुणें विकासलीं ॥४॥

कृष्णसारूप्यें कृष्णभ्रमर । तेथें झेपावले अतिसत्वर ।

आमोद सेविती अरुवार । कैसेनि केसर कुचंबे ॥५॥

सद्भावाच्या आमोदधारा । सेवितां सुख झालें भ्रमरां ।

हृदयकमळीं केला थारा । मध्यमद्वारा चालिले ॥६॥

भेदोनियां साही कमळें । द्विदळादि षोडशदळें ।

झेपावले मळयानिळें । सहस्त्रदळीं मिसळले ॥७॥

तेथ सेवूनि पराग धवळ । उन्मत्त मातलें अलिकुळ ।

करिती आनंदाचा गोंधळ । सुखकल्लोळ स्वानंदें ॥८॥

लागला अनुहताचा ध्वनी । रुणझुणिती दशलक्षणीं ।

त्याही नादातें प्राशुनी । निःशब्दपणीं निवांत ॥९॥

तेथें मोक्षसुखाचे घड । डोलतां दिसे अतिगोड ।

तेणें जीवाचें पुरत कोड । करिती धुमाड सोहंशब्दें ॥१०॥

मुमुक्षुमयुर अतिप्रीतीं । पिच्छें पसरूनि नाचती ।

येऊन वसंतवनाप्रती । टाहो फोडिती गुरुनामें ॥११॥

नेमस्त कोकिळां होतें मौन । वसंतऋतुराज देखोन ।

तिंहीं करोनि विसर्जन । मधुरस्तवनें गर्जती ॥१२॥

भक्तिसरोवरीं निर्मळ पाणी । विकासल्या नवविध कमळिणी ।

भक्त सुस्नात तिये स्थानीं । निमज्जनीं निश्चळ ॥१३॥

ते सरोवरींचे सेवितां पाणी । जीवशिव चक्रवाकें दोनी ।

सद्गुरुचिद्भानु वसंतवनीं । देखोनि मिळणीं मिळालीं ॥१४॥

वसंतें उल्हास तरुवरां । उलोनि लागल्या स्वानंदधारा ।

पारंब्या भेदूनियां धरा । धराधरा विगुंतल्या ॥१५॥

बोधमलयानिळ झळकत । तेणें वनश्री मघमघीत ।

मोक्षमार्गीचे पांथिक तेथ । निजीं निजत निजरूपें ॥१६॥

ऐसा सद्गुरु वसंतरावो । निजभक्तवना दे उत्सावो ।

तो भागवतभजन‍अध्यावो । उद्धवासी देवो सांगत ॥१७॥

बारावे अध्यायीं निरूपण । सत्संगाचा महिमा गहन ।

कर्माचा कर्ता तेथ कोण । त्यागी तें लक्षण कर्माचें ॥१८॥

संपतां अकरावा अध्यावो । गुह्य सांगेन म्हणे देवो ।

तें परिसावया उद्धवो । न्याहाळी पहा हो हरिवदन ॥१९॥

काय सांगेल गुह्य गोष्टी । कोण अक्षरें निघती ओंठीं ।

त्या वचनार्था घालावया मिठी । उल्हास पोटीं उद्धवा ॥२०॥

जैसें मेघमुखींचें उदक । वरच्यावरी झेली चातक ।

तैसें कृष्णवचनालागीं देख । पसरिलें मुख उद्धवें ॥२१॥

स्नान संध्या भोजन । आवडे या एकें काळें जाण ।

तैसें ज्ञेय ज्ञाता ज्ञान । घ्यावया सावधान उद्धव ॥२२॥

ऐसा उद्धवाचा आदरू । देखोनि हरि झाला सादरू ।

भक्तकृपाळू अतिउदारू । निजगुह्यसारू सांगत ॥२३॥