श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ३ रा व ४ था

सत्सङ्गेन हि दैतेया यातुधाना मृगाः खगाः ।

गन्धर्वाप्सरसो नागाः सिद्धाश्चारणगुह्यकाः ॥३॥

विद्याधरा मनुष्येषु वैश्याः शूद्राः स्त्रियोऽन्त्यजाः ।

रजस्तमःप्रकृतयः तस्मिंस्तस्मिन् युगेऽनघ ॥४॥

पाहतां केवळ जडमूढ । रजतमयोनीं जन्मले गूढ ।

सत्संगती लागोनि दृढ । मातें सुदृढ पावले ॥६४॥

दैत्य दानव निशाचर । खग मृग गंधर्व अप्सर ।

सिद्ध चारण विद्याधर । नाग विखार गुह्यक ॥६५॥

खग मृग सर्प पावले मातें । मानव तंव सहजें सरते ।

वैश्य शूद्र स्त्रियादि समस्तें । पावलीं मातें सत्संगें ॥६६॥

जे सकळवर्णधर्मांवेगळे । ज्यांच्या नामास कोणी नातळे ।

छाया देखूनि जग पळे । अत्यंत मैळे अंत्यज ॥६७॥

तिंहीं धरोनि सत्संगती । आले माझिया पदाप्रती ।

देवद्विज तयांतें वंदिती । अभिनव कीर्ति संतांची ॥६८॥

धरिलिया सत्संगती । निंद्य तेही वंद्य होती ।

उद्धवा तूं निष्पाप निश्चितीं । तरी सत्संगती करावी ॥६९॥

सोनें साडेपंधरें चोखडें । त्यासी रत्‍नाची संगती जोडे ।

तैं अधिकाधिक मोल चढे । मुकुटीं चढे महेंद्रा ॥७०॥

तैंसी पुण्य पुरुषा सत्संगती । जाहल्या अनंत सुख पावती ।

सुरवर त्यांतें वंदिती । शिवादि येती भेटीसी ॥७१॥

यमधर्म पायां लागती । तीर्थें पायवणी मागती ।

भावें धरिल्या सत्संगती । एवढी प्राप्ती पुरुषासी ॥७२॥

दैत्य राक्षस स्त्री शूद्र पाहीं । अंत्यज तरले म्हणसी कायी ।

त्या त्या युगाच्या ते ते ठायीं । बहुसाल पाहीं उद्धरिले ॥७३॥