श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ११ वा

तास्ताः क्षपाः प्रेष्ठतमेन नीता मयैव वृन्दावनगोचरेण ।

क्षणार्धवत्ताः पुनरङ्ग तासां हीना मया कल्पसमा बभूवुः ॥११॥

नवल गोपिकांचा हरिख । मज वृंदावना जातां देख ।

माझें पाहोनि श्रीमुख । प्रातःकाळीं सुख भोगिती ॥३९॥

गायी पाजोनियां पाणी । गोठणीं बैसवीं मध्यान्हीं ।

तेथें उदकमिषें गौळणी । पहावयालागूनी मज येती ॥१४०॥

तेथें नाना कौतुकें नाना लीला । नाना परींच्या खेळतां खेळां ।

तो तो देखोनि सोहळा । सुखें वेल्हाळा सुखावती ॥४१॥

मज सायंकाळीं येतां देखोनी । आरत्या निंबलोण घेऊनी ।

सामोर्‍या येती धांवोनी । लागती चरणीं स्वानंदें ॥४२॥

ऐसी त्रिकाळ दर्शनें घेतां । धणी न पुरे त्यांचे चित्ता ।

त्याहीवरी वर्तली कथा । एकांतता अतिगुह्य ॥४३॥

त्या गुह्याचें निजगुज । उद्धवा मी सांगेन तुज ।

महासुखाचें सुखभोज । मी अधोक्षजा नाचिंनलों ॥४४॥

तें सुख गोपिका जाणती । कीं माझें मी जाणें श्रीपती ।

जे रासक्रीडेच्या रातीं । झाली सुखप्राप्ती सकळिकांसी ॥४५॥

त्या सुखाची सुखगोडी । रमा काय जाणे बापुडी ।

ब्रह्मादिकें केवळ वेडीं । त्या सुखाची गोडी नेणती ॥४६॥

पावावया त्या सुखासी । सदाशिव झाला योगाभ्यासी ।

तरे प्राप्ती नव्हे तयासी । भुलला मोहिनीसी देखतां ॥४७॥

उमा होऊनि भिल्लटी । तिने भुलविला धूर्जटी ।

त्या सुखाची हातवटी । नेणती हटी तापसी ॥४८॥

जवळी असोनि निश्चितीं । संकर्षण महामूर्ती ।

त्यासी त्या सुखाची प्राप्ती । नव्हे निश्चितीं उद्धवा ॥४९॥

रासक्रीडा गोपिकांप्रती । कोणी म्हणेल कामासक्ती ।

तेथ कामाची कैंची प्राप्ती । ऐक निश्चितीं उद्धवा ॥१५०॥

शिवातें जिणोनि फुडा । काम म्हणे मी सबळ गाढा ।

माझी भेदावया रासक्रीडा । वाऊनि मेढा चालिला ॥५१॥

जेथ माझ्या स्वरूपाचें वोडण । तेथ न चले कामाचें कामपण ।

मोडले मदनाचे बाण । दृढ वोडण स्मरणाचें ॥५२॥

काम कामिकां चपळदृष्टी । निजक्षोभाची तीक्ष्ण बाणाटी ।

संधि साधूनि विंधे हटी । ते नव्हेचि पैठी हरिरंगीं ॥५३॥

जेथ मी क्रीडें आत्मारामू । तेथ केवीं रिघे बापुडा कामू ।

माझे कामें गोपिका निष्कामू । कामसंभ्रमू त्यां नाहीं ॥५४॥

जो कोणी स्मरे माझें नामू । तिकडे पाहूं न शके कामू ।

जेथ मी रमें पुरुषोत्तमू । तेथ कामकर्मू रिघेना ॥५५॥

कामू म्हणे कटकटा । अभाग्य भाग्यें झालों मोटा ।

रासक्रीडेचिया शेवटील गोटा । आज मी करंटा न पवेंचि ॥५६॥

देखोनि रासक्रीडा गोमटी । काम घटघटां लाळ घोटी ।

लाज सांडूनि जन्मला पोटीं । त्या सुखाचे भेटीलागोनि ॥५७॥

तो काम म्यां आपुले अंकीं । केला निजभावें निजसुखी ।

तें माझें निजसुख गोपिकीं । रासमिषें कीं भोगिलें ॥५८॥

ते रासक्रीडेची राती । म्यां ब्रह्मषण्मास केली होती ।

गोपिका अर्धक्षण मानिती । वेगीं कां गभस्ती उगवला ॥५९॥

जेथ माझा क्रीडासुखकल्लोळ । तेथ कोण स्मरे काळवेळ ।

गोपिकांचें भाग्य प्रबळ । माझें सुख केवळ पावल्या ॥१६०॥

ऐशा माझिया संगतीं । भोगिल्या राती नेणों किती ।

तरी त्यांसी नव्हे तृप्ती । चढती प्रीती मजलागीं ॥६१॥

गोपिका करूनि माझी भक्ती । मी प्रसन्न केलों श्रीपती ।

रास मागीतला एकांतीं । माझी सुखप्राप्ती पावावया ॥६२॥

त्या जाण वेदगर्भींच्या श्रुती । श्रुतिरूपें नव्हे मत्प्राप्ती ।

तैं परतल्या म्हणोनि 'नेति नेति' । माझी सुखसंगती न पवेचि ॥६३॥

विषयबुद्धी तें मुख्य अज्ञान । तें असतां मी न भेटें जाण ।

असतां वेदोक्त जाणपण । तेणेंही संपूर्ण न भेटें मी ॥६४॥

जाणीवनेणीव गेलिया निःशेष । माझें पाविजे निजात्मसुख ।

श्रुति जाणोनि हें निष्टंक । गोकुळीं त्या देख सुखार्थ आल्या ॥६५॥

त्याचि जाण समस्त श्रुती । गोपिकारूपें गोकुळा येती ।

रासक्रीडामिसें एकांतीं । माझी सुखप्राप्ती पावल्या ॥६६॥

हाही असो अभिप्रावो । उद्धवा ज्यासी जैसा भावो ।

त्यालागीं मी तैसा देवो । यदर्थीं संदेहो असेना ॥६७॥

उद्धवा मी भक्तांसी देख । कोणे काळीं नव्हें विन्मुख ।

जो तैसा भावी भाविक । तैसा मी देख तयासी ॥६८॥

मी जनांसी सदा सन्मुख । जनचि मजसी होती विन्मुख ।

यासी कांहीं न चले देख । दाटूनि दुःख भोगिती ॥६९॥

मी सकाम सकामाच्या ठायीं । निष्कामासी निष्काम पाहीं ।

नास्तिका मी लोकीं तिहीं । असतूचि नाहीं नास्तिक्यें ॥१७०॥

असो हे किती उपपत्ती । ऐक गोपिकांसी माझी प्रीती ।

माझे सुखसंगें भोगिल्या राती । त्या मानिती निमेषार्ध ॥७१॥

माझ्या वियोगें त्यांसी राती । ज्या आलिया यथास्थिती ।

त्या गोपिका कल्पप्राय मानिती । सन्निध स्वपती असतांही ॥७२॥

त्यांच्या दुःखाची अवस्था । बोलें न बोलवे सर्वथा ।

माझेनि वियोगें मातें स्मरतां । समाधिअवस्था पावल्या ॥७३॥