श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक १७ वा

श्रीभगवानुवाच ।

स एष जीवो विवरप्रसूतिः प्राणेन घोषेण गुहां प्रविष्टः ।

मनोमयं सूक्ष्ममुपेत्य रूपं मात्रा स्वरो वर्ण इति स्थविष्ठः ॥१७॥

ऐक बापा उद्धवा । मी मायेच्या निजस्वभावा ।

अनुसरोनि जीवभावा । कर्तृत्व जीवा जीवत्वें ॥७९॥

जळीं प्रतिबिंबला सविता । तो जळकंपें दिसे कांपता ।

तेवीं अकर्ताचि मी दिसें कर्ता । जीव अहंतास्वभावें ॥२८०॥

राजा झालिया निद्रेआधीन । तो स्वप्नीं रंक होय आपण ।

तेवीं प्रकृतीस्तव मज जाण । जीवपण आभासे ॥८१॥

स्वयें राजा आहे आपण । तो स्वप्नीं रंकत्वें करी कोरान्न ।

तेथें जो दे पसाभर कण । त्यासी वानी आपण राजा रे तूं ॥८२॥

आपणचि राजा आहे । हें त्याचें त्यास ठाउकें नव्हे ।

तैसेंच जीवासही होये । पूर्णत्व स्वयें स्मरेना ॥८३॥

जेवीं स्वप्नाचिया अवस्था । राजा रंकक्रिया करी समस्ता ।

तेवीं अविद्येस्तव तत्त्वतां । कर्मकर्ता मी झालों ॥८४॥

तेथें वेदोक्त विधिविधान । जीवाअंगीं आदळे जाण ।

जंव नव्हे ब्रह्मज्ञान । तंव स्वधर्माचरण करावें ॥८५॥

राजा राजपदीं जागा नव्हे । तंव रंकक्रिया त्यासी संभवे ।

तेवीं जंव ब्रह्मज्ञान नव्हे । तंव सर्व करावे स्वधर्म ॥८६॥

राजा राजपदीं जागा झाला । तो भीक म्हणतांचि लाजला ।

तेवीं ब्रह्मज्ञान जो पावला । तो 'मी कर्ता' या बोला न बोले कदा ॥८७॥

जैसें रायास मिथ्या रंकपण । तेवीं परमात्म्यासी जीवत्व जाण ।

त्या जीवास शरीरीं संसरण । तें उपलक्षण अवधारीं ॥८८॥

जैसा जीव जडातें जीवविता । यालागीं जीवू ऐसी वार्ता ।

सहजें तरी स्वभावतां । चैतन्यरूपता जीवाची ॥८९॥

घटामाजीं दीपू घातला । तैं घटभरी प्रकाशू झाला ।

तोचि घरामाजीं ठेविला । घरभरी झाला प्रकाश ॥२९०॥

तेवीं शरीरमाजीं तरी जीवू । सहजें तरी हा सदाशिवू ।

येथ बोलणें न लगे बहू । जीवशिव‍अनुभवू तो ऐसा ॥९१॥

आरिशाचा सूर्य दिसे हातीं । तेवीं शरीरीं जीवाची प्रसूती ।

प्रकर्षेंसीं राहती स्थिती । यालागीं 'प्रसूती' बोलिजे ॥९२॥

आरसा अत्यंत लहान । तेथें सूर्य बिंबे संपूर्ण ।

तेवीं विदेहा देहधारण । 'विवरप्रवेशन' त्या नांव ॥९३॥

थिल्लरीं चंद्रासी अभिव्यक्ती । तो गगनींचा दिसे अधोगती ।

तेवीं शरीरीं जीवाची प्रसूती । अव्यक्त व्यक्तीं प्रवेशे ॥९४॥

जळीं सविता प्रतिबिंबला । परी तो जळें नाहीं ओला झाला ।

तेवीं कर्में करोनि संचरला । अलिप्त ठेला निजआत्मा ॥९५॥

जळीं प्रतिबिंब आंदोलायमान । तेवीं जीवासी जन्ममरण ।

थिल्लरीं चंद्र अडकला जाण पूर्ण । तेवीं कर्मबंधन जीवासी ॥९६॥

थिल्लरजळ आटलें । तेथें काय चंद्रबिंब निमालें ।

तें चंद्रबिंब होवोनि ठेलें । जाहलें निमालें दोनी मिथ्या ॥९७॥

थिल्लरींचा चंद्र काढूं जातां । तो मिथ्यात्वें न ये हाता ।

तेवीं देहीं मिथ्या जीवता । ते सत्य मानितां अतिदुःखी ॥९८॥

आरसा थोर अथवा लहान । तेथें सूर्य बिंबे संपूर्ण ।

तेवीं मी अंतर्यामी जाण । सर्वांभूतीं समान समग्र असें ॥९९॥

सूर्य थिल्लराआंतौता । अडकला दिसे समस्तां ।

तेवीं जीवासी कर्मबद्धता । मूर्ख तत्त्वतां मानिती ॥३००॥

गगनींचा सूर्यो न देखती । थिल्लरीं अडकला मानिती ।

तेवीं निर्गुणीं जया नाहीं प्रतीती । ते बद्ध म्हणती जीवातें ॥१॥

अग्निज्वाळा जाळीं आकळितां । जाळें जळे आकळूं जातां ।

तेवीं आत्मया कर्मीं बांधतां । कर्मीं कर्मता निर्धर्म ॥२॥

नाद उत्पत्तीसी ठावो । मुख्य वावो कां दुसरा घावो ।

या दोहीं वेगळा नित्य निर्वाहो । तो नादू पहा हो अनुहत ॥३॥

अनुहताचा सोलींव शब्दू । परापरतीरीं पराख्य नादू ।

ज्याचा योगियां सदा छंदू । बोलिला अनुवादू नव्हे त्याचा ॥४॥

ज्या नादाची सुखगोडी । सदाशिवूच जाणे फुडी ।

कां सनकादिकीं चोखडी । चाखिली गाढी ते चवी ॥५॥

वायूचें शोधितां सत्त्व । त्यासी एकवटलें तें शब्दतत्त्व ।

उभयचेतनें जीवित्व । मनोमयत्व धरूं पाहे ॥६॥

जे चेतनेचें चेतनत्व । तें वायूचें शोधित सत्त्व ।

तेंचि शब्दाचें निजतत्त्व । तेणे जीवित्व मनोरूप होय ॥७॥

जीवाचा शरीरसंयोग । असे सांगे तो श्रीरंग ।

आधारादिचक्रप्रयोग । क्रमेंचि साङ्ग सांगत ॥८॥

अहमिति प्रथमाध्यासें । जीवासी जीवत्व आभासे ।

तो जे जे तत्वीं प्रवेशे । तें मी ऐसें म्हणतचि ॥९॥

तेथ मी देहो म्हणतां । तत्काळ जाय पूर्णता ।

तेव्हां एकदेशी परिच्छिन्नता । देहात्मता लागली ॥३१०॥

निर्विशेष नाद अतिसूक्ष्म प्राण । त्यासहित आधारीं प्रवेशोन ।

अतिसूक्ष्म प्रथम स्फुरण । पावोनि जाण परा झाली ॥११॥

आधारचक्रीं सूक्ष्म प्राण । परा वाचा तेथींची जाण ।

मनाचें कोंवळें स्फुरण । अतिसपूरपण सूक्ष्मत्वें ॥१२॥

स्वाधिष्ठानचक्राच्या ठायीं । मनाचें वाढतें बाळसें पाहीं ।

पश्यंती वाचा तये ठायीं । बोलूं देखे परी कांहीं बोलेना ॥१३॥

तिये चक्रीं एकवटला प्राण । पुढारां न चलेचि गा जाण ।

प्राणापानां झालें भांडण । दोघेजण रूसले ॥१४॥

घरकलहो लागला भारी । मग निघाले वेगळेचारी ।

पांचही राहिले पांचापरी । ऐक निर्धारीं विचारू ॥१५॥

मागें रुसोनि गेला जाण । त्या नांव म्हणती अपान ।

रागें पुढारां आला जाण । त्या नांव प्राण म्हणताती ॥१६॥

दोहींमाजीं समत्वें जाण । नाभीं राहिला तो समान ।

कंठीं राहिला तो उदान । व्यानासी रहावया स्थान असेना ॥१७॥

अद्यापि शरीरीं जाण । व्यानासी नाहीं एक स्थान ।

तो सर्वांगीं सर्वदा जाण । परिभ्रमण करीतसे ॥१८॥

याहून धाकटे पांच प्राण । तेही वेगळे राहिले जाण ।

तिंहीं वेगळालें आपण । वस्तीसी स्थान योजिलें ॥१९॥

नाग कूर्म कृकल देवदत्तू । पांचवां धनंजय जाण तेथू ।

यांची वस्ती जे शरीरांतू । ऐक निश्चितू सांगेन ॥३२०॥

शिंक जांभई आणि ढेंकर । नाग कूर्म कृकलांचें घर ।

उचकी देवदत्ताचें बिढार । धनंजयासी थार मिळेचिना ॥२१॥

जीवदेहांचे आप्तवादापासीं । धनंजयो राहिला वस्तीसी ।

जीवें सांडिल्या शरीरासी । मुहूर्तार्ध देहासी तो वांचवी ॥२२॥

स्वाधिष्ठानाहोनि जाण । अनुक्रमें दशधा होती प्राण ।

त्यांचें स्थान मान उपलक्षण । तुज म्यां जाण सांगीतलें ॥२३॥

मागें म्यां सांगितली गोष्टी । प्राणापान रुसल्यापाठीं ।

दोघां अद्यापि नाहीं भेटी । महाहटी छांदस ॥२४॥

त्या दोघांसी करी बुझावण । तो माझा पढियंता तूं जाण ।

त्या सर्वस्व दें मी आपण । योगसाधन या नांव ॥२५॥

उद्धवा प्राणलक्षणें सांगतां । अवचटें प्राणापानसमता ।

प्रसंगीं आली कथा । त्वांही स्वभावतां ऐकावी ॥२६॥

स्वाधिष्ठानाहूनि मणिपुरा येता । जीवामनांची एकात्मता ।

सूक्ष्मप्राण तेथ वसतां । परेच्या ऐक्यता पश्यंती ॥२७॥

तेथ मनाचें खेळुगेपण । कुमार अवस्था बाणली जाण ।

तंव डोलत पुढें चाले प्राण । अनाहतस्थान ठाकिलें ॥२८॥

धरोनि पश्यंतीचें अनुसंधान । मध्यमा वाचा उपजे जाण ।

मौनाची मिठी न सोडून । करी गुणगुण आपणांत ॥२९॥

तेथ मनाची पौगंड अवस्था । मागें पुढें सांभाळितां ।

वांछी नाना भोग अवस्था । लाजा सर्वथा बोलेना ॥३३०॥

मग वेगें टाकिलें विशुद्धिस्थान । तेथ उसळत उदान झाला प्राण ।

तंव मनासी तारुण्यपण । पुरतें जाण बाणलें ॥३१॥

त्या विशुद्ध चक्राप्रती । परा मिळोनि आंतौती ।

पश्यंती मध्यमा एक होती । वाचा घुमघुमती झणत्कारें ॥३२॥

त्या झणत्कारापरिपाठीं । वक्त्रीं वाचा तत्काळ उठी ।

तारुण्यें उन्मत्त झाली मोठी । त्या स्वरवर्ण चावटी मांडिली ॥३३॥

आज्ञाचक्र भ्रूस्थान । तें याहूनि वेगळें जाण ।

तेथें वाचेसी नाहीं गमन । हंसलक्षण योग्यांचें ॥३४॥

हीं साही चक्रें अनुक्रमें जाण । चार मातृका अठ्ठावीस वर्ण ।

सोळाही स्वर संपूर्ण । हंसलक्षण योगियांचें ॥३५॥

कोण चक्रीं कोण वर्ण । मातृकांचें कोणतें स्थान ।

कोठें उठती स्वर संपूर्ण । तेंही लक्षण अवधारीं ॥३६॥

आधारचक्रीं चतुर्दळ उभारा । तेथ न्यसिल्या चारी मात्रा ।

व श ष स या अक्षरां । बोलिजे मात्रा शास्त्राज्ञीं ॥३७॥

स्वाधिष्ठान षड्दळ जेथ । साही वर्ण स्थापिले तेथ ।

बकरादि लकारांत । जाण निश्चित ते स्थानीं ॥३८॥

मणिपूर दशदळ निश्चित । दहा वर्ण स्थापिले तेथ ।

डकारादि फकारांत । वर्ण नांदत ते चक्रीं ॥३९॥

अनाहतचक्र द्वादशदळयुक्त । बारा वर्ण न्यसिले तेथ ।

ककारादि ठकारान्त । वर्ण विराजत ते चक्रीं ॥३४०॥

विशुद्धिचक्रींच्या सोळा दळां । अ इ उ ऋ लृ हे वर्ण सोळा ।

कंठस्थानीं मीनला मेळा । यांचा वेदीं आगळा प्रताप ॥४१॥

आज्ञाचक्र अतिअवघड । नुघडे काकीमुखाचें कवाड ।

न चले प्राणांची चडफड । मार्ग अतिगूढ लक्षेना ॥४२॥

तें आज्ञाचक्र गा द्विदळ । केवळ हंसाचें राउळ ।

तेथ पावावया योगबळ । अतिप्रबळ पाहिजे ॥४३॥

हें स्थान पावावयासाठीं । योगी झाले महाहटी ।

अभ्यास करितां अतिसंकटीं । तेही शेवटीं न पावती ॥४४॥

हें पावावया माझें स्थान । अतिगुह्य आहे अनुष्ठान ।

सोहंहंसाचें साधन । सावधान जो साधी ॥४५॥

प्राणाचेनि गमनागमनें । सोहंहंसाचेनि स्मरणें ।

सावधानें जो साधूं जाणे । तेणें पावणें हें स्थान ॥४६॥

त्यासीचि पवनजयो घडे । तोचि आज्ञाचक्रामाजीं चढे ।

तेथूनिही मार्ग काढी पुढें । अतिनिवाडें अचूक ॥४७॥

तेथ नानाभोगसमृद्धिफळें । आणिती ऋद्धिसिद्धींचें पाळें ।

तें डावलूनियां सकळें । निघे निर्मळें निजपंथें ॥४८॥

जो कां ऋद्धिसिद्धींसी भुलला । मी सिद्ध ये श्लाघे आला ।

तो आज्ञाचक्रावरोनि च्यवला । केल्या मुकला कष्टासी ॥४९॥

ज्यासी वैराग्य असे सपुरतें । तो कदा भुलेना सिद्धीतें ।

लाता हाणोनि भोगमान्यतेतें । निगे निजपंथें मजलागीं ॥३५०॥

तैं औट पीठ गोल्हाट । सांडूनि भ्रमरगुंफा कचाट ।

शोखूनि सहस्त्रदळाचे पाट । मजमाजीं सुभट मिसळले ॥५१॥

सांगतां आज्ञाचक्राची संस्था । पुढें गोडी लागली योगपंथा ।

मागील विसरलों जी कथा । क्षमा श्रोतां करावी ॥५२॥

म्हणाल वाहवटीं पडला मासा । तो परतेना जेवीं सहसा ।

ग्रंथनिरूपणीं तूं तैसा । जल्पू वायवसा कां करिसी ॥५३॥

जेवीं चुकलिया बाळकातें । माता शिकवण दे त्यातें ।

तेवीं तुमचें वचन मातें । निजहितातें द्योतक ॥५४॥

करितां चक्रांचें निरूपण । योगारूढ झालें मन ।

विसरोनि मागील निरूपण । गेलें निघून शेवटां ॥५५॥

हें ऐकोनि हांसिले श्रोते । तूं कर्ता नव्हसी येथें ।

हें कळोनि गेले आमुतें । नको परिहारातें उपपादूं ॥५६॥

आलोडितां ग्रंथकोडी । न कळे योगज्ञानाची गोडी ।

ते तुवां विशद केली फुडी । निजपरवडीविभागें ॥५७॥

तुझेनि मुखें कृष्णनाथें । श्रीभागवत जें कठिण होतें ।

तें अर्थविले यथार्थें । सत्य आमुतें मानलें ॥५८॥

हा बारावा अध्यावो । अतिगूढ बोलिला देवाधिदेवो ।

तेथींचाही त्वां अभिप्रावो । विशद पहावो विवरिला ॥५९॥

ऐसा संतीं करोनि आदरू । निर्भय दिधला नाभीकारू ।

एका जनार्दनीं हर्षनिर्भरू । केला नमस्कारू संतांसी ॥३६०॥

'वैखरी मात्रा स्वर वर्ण' । या पदांचें आलें व्याख्यान ।

तेंचि दृष्टांतें श्रीकृष्ण । उद्धवासी जाण सांगतू ॥६१॥

सूक्ष्म जीवशिवांचे मूळ । तोचि वाग्द्वारा झाला स्थूळ ।

येचि अर्थीं अति विवळ । करूनि प्रांजळ सांगत ॥६२॥