श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक १८ वा

यथानलः खेऽनिलबन्धुरुष्मा बलेन दारुण्यधिमथ्यमानः ।

अणुः प्रजातो हविषा समेधते तथैव मे व्यक्तिरियं हि वाणी ॥१८॥

अव्यक्तरूपें ऊष्मा गगनीं । व्यापकपणें असे वह्नी ।

तो अरणीमाजीं मथितां मंथनीं । अतिसूक्ष्मपणीं प्रकटला ॥६३॥

अनळा अनिळ निजसखा । कोमळ तूळें फुंकितां देखा ।

दिसे लखलखीत नेटका । ज्वाळा साजुका कोंवळिया ॥६४॥

तेथ पावला दशा मध्यम । मग हवनद्रव्यें करितां होम ।

तेणें थोरावला निरुपम । वाढला व्योमचुंबित ॥६५॥

तैसा सूक्ष्म नाद शिवसंयोगें । प्राणसंगमें लागवेगें ।

षटचक्रादिप्रयोगें । वैखरीयोगें अभिव्यक्त ॥६६॥

मरा हे ऐकतां गोठी । ते वाचा सर्वांशें वाटे खोटी ।

तेंचि अक्षरें केल्या उफराटीं । रामनामें गोमटी निववी वाचा ॥६७॥

करितां सुष्ठु दुष्टु उच्चार । वर्ण नव्हती क्षर अक्षर ।

यालागीं नांव तें अक्षर । यापरी पवित्र ते वाणी ॥६८॥

जैशी वाचेची अभिव्यक्ती । तैसीच इतर इंद्रियप्रवृत्ती ।

संक्षेपें तेही स्थिती । उद्धवाप्रती सांगतू ॥६९॥