श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक १९ वा

एवं गदिः कर्म गतिर्विसर्गो घ्राणो रसो दृक् स्पर्शः श्रुतिश्च ।

सङ्कल्पविज्ञानमथाभिमानः सूत्रं रजःसत्त्वतमोविकारः ॥१९॥

जैसी वाचेची व्युत्पत्ती । तैसीच कर्मेंद्रियांची प्रवृत्ती ।

चरणांच्या ठायीं गती । ग्रहणशक्ती हस्तांची ॥३७०॥

विसर्ग जाण वायूचा । सुखोद्रेक तो लिंगाचा ।

कर्मेंद्रियीं पांचवी वाचा । विस्तारू तिचा सांगीतला ॥७१॥

तैसीच जाण ज्ञानकरणें । दृष्टी उठी देखणेपणें ।

रसना रसातें चाखों जाणे । श्रवण श्रवणें अधिकारू ॥७२॥

शीत उष्ण मृदु कठिण । हें त्वगिंद्रियाचें लक्षण ।

सुगंध दुर्गंध जाणतेपण । घ्राण विचक्षण ते कर्मीं ॥७३॥

संकल्प विकल्प मनाचे । निश्चयो कर्म बुद्धीचें ।

चिंतन जाण चित्ताचें । अहंकाराचें मीपण ॥७४॥

सूत्र तंव प्रधानाचें । विकार रजतमसत्वांचे ।

संक्षेपें विवरण तिहींचे । ऐक साचें सांगेन ॥७५॥

आधिदैव आधिभौत । ज्यासी अध्यात्म म्हणत ।

वाढला जो प्रपंचू येथ । ईश्वराचें अभिव्यक्त स्वरूप जाण ॥७६॥

जगाचें मूळकारण । अंगें ईश्वरचि आपण ।

त्या कारणाहूनि कार्य भिन्न । नव्हे जाण सर्वथा ॥७७॥

हो कां घृताची एके काळीं । थिजोनि झालि पुतळी ।

ते घृताहोनि वेगळी । नाहीं देखिली प्रत्यक्ष ॥७८॥

काष्ठाचा घोडा केला । अंगें ठाणें अति मिरविला ।

तो काष्ठपणा नाहीं मुकला । सर्वांगें शोभला काष्ठत्वें ॥७९॥

त्याचे पाहतां वेगळाले अवयव । खूर खांद काष्ठचि सर्व ।

तेवीं महाभूतें गुणप्रभव । स्वरूप सावेव शिवाचें ॥३८०॥

सुवर्णाचें झालें लेणें । तें जेवीं मिरवे सोनेपणें ।

तेवीं महाभूतें विषयकरणें । अभिन्नपणें शिवरूप ॥८१॥

फडा पुच्छ वांकुडा बाग । येणें आकारें म्हणती नाग ।

तो नाग नव्हे सोनेंचि चांग । तेवीं हें जग मद्रूप ॥८२॥

प्रपंच ईश्वरासी अभिन्न । येचि अर्थीं श्रीनारायण ।

उद्धवासी सांगें आपण । अभिन्नपणे जीवशिवां ॥८३॥