श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक २३ वा

अदंति चैकं फलमस्य गृध्रा ग्रामेचरा एकमरण्यवासाः ।

हंसा य एकं बहुरूपमिज्यैः मायामयं वेद स वेद वेदम् ॥२३॥

दुःखफळाचे भोक्ते । अत्यंत विषयासक्त जेचि ते ।

गीध गृहस्थ कां जे येथें । अविधीं विषयांतें सेविती ॥४८॥

ग्राम्य विषयीं अतितत्पर । यालागीं बोलिजे ग्रामचर ।

ग्रामगीध जैसे घार । तैसे सादर विषयांसी ॥४९॥

जेवीं कां घार गगना चढे । तेथूनि आविसा उडी पडे ।

तेवीं नरदेह पावोनि चोखडे । विषयीं झडपडे झोंबती ॥४५०॥

एवं विषयासक्त जे चित्तें । जे अधोगतीतें पावते ।

ते दुःखफळाचे भोक्ते । जाण निश्चिते उद्धवा ॥५१॥

सांडोनियां गार्हस्थ्य । वनवासी वानप्रस्थ ।

त्यांसचि सुखफल प्राप्त । जाण निश्चित उद्धवा ॥५२॥

त्या सुखफळाचे विभाग । ब्रह्मसदनांत इतर स्वर्ग ।

कर्में करूनियां साङ्ग । जेथींचा मार्ग चालिजे ॥५३॥

ब्रह्मचर्यें वेदाध्ययन । गार्हस्थ्यें पूजिते अग्निब्राह्मण ।

वानप्रस्थाश्रमीं जाण । वन्यफळभोजन वनवासी ॥५४॥

येणें क्रमेंचि क्रममुक्तिस्थान । जिंहीं ठाकिलें ब्रह्मसदन ।

सुखफळाचे भोक्ते ते जाण । ब्रह्मभुवननिवासी ॥५५॥

इतर स्वर्गीं सुखप्राप्ती । जेथें आहे पुनरावृत्ती ।

ब्रह्मसदनीं पावल्या वस्ती । त्यांसी क्रमें मुक्ती होईल ॥५६॥

मूळींचें पद 'अरण्यवासी' । तेणें द्योतिलें वानप्रस्थासी ।

तेथ नाहीं घेतला संन्यासी । त्यासी वनवासी म्हणों नये ॥५७॥

संन्याशांसी निवासस्थान । वेदीं बोलिलें नाहीं जाण ।

तिंहीं स्वदेहाचें केलें दहन । नेमिलें स्थान त्यां नाहीं ॥५८॥

जे अविद्यादिकर्मप्रवृत्ती । विरजाहोमीं स्वयें जाळिती ।

ते भववृक्षाचीं फळें खाती । हेही युक्ती घडेना ॥५९॥

जागृतीच्या पाहुण्यासी । जेवूं धाडावें स्वप्नगृहासी ।

तेवीं न्यस्तसंकल्प संन्यासी । संसारसुखासी केवीं भोक्ते ॥४६०॥

स्वकर्म जाळोनि विरजाहोमीं । जिंहीं साध्य केलें ब्रह्माहमस्मि ।

त्यांसी निवासस्थान कोण नेमी । वनीं ग्रामीं नेमस्त ॥६१॥

बिढार द्यावया आकाशासी । कोण घर नेमावें त्यासी ।

तेवीं न्यस्तसंकल्प संन्यासी । त्यांच्या निवासासी कोण नेमी ॥६२॥

जे न्यस्तसंकल्प संन्यासी । त्यांसी कोण म्हणे अरण्यवासी ।

मायिक भववृक्षींच्या फळासी । भोक्ते त्यांसी म्हणों नये ॥६३॥

मूळींचें पद 'अरण्यवासी' । तें भागा आलें वानप्रस्थासी ।

वानप्रस्थ सदा वनवासी । दुसर्‍या फळासी तो भोक्ता ॥६४॥

ऐक संन्याशांची सुखप्राप्ती । दोनी फळें मिथ्या जाणती ।

मीचि एक त्रिजगतीं । हे प्रतीति निश्चितीं त्यां झाली ॥६५॥

जो हा बहुरूपें विस्तारू । तो मी चिदात्मा साचारू ।

जाणोनि गुरुमुखें निर्धारू । माझें सुख साचारू पावले ॥६६॥

ते मद्रूपे मज पावले । माझेनि सुखें सुखरूप झाले ।

सुखदुःखफळांतें मुकले । येवों चुकले संसारा ॥६७॥

संसार मायामय मिथ्याभास । जाणे तोचि वेदज्ञ विद्वांस ।

त्यासीच बोलिजे परमहंस । विश्वनिवासनिवासी ॥६८॥

ऐसी होआवया पदप्राप्ती । सुदृढ करावी गुरुभक्ती ।

तेणें होय संसारनिवृत्ती । तेंचि श्रीपती सांगत ॥६९॥

पहिली सांगितली संतसंगती । तेणें जाहली मत्पदप्राप्ती ।

तेचि अध्यायाच्या अंतीं । करावी गुरुभक्ती सांगतू ॥४७०॥